देवनागरी लिपीचे पुरस्कर्ते- सावरकर आणि भगतसिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Bhagat Singh And Savarkar





सावरकर आणि भगतसिंग या दोघांचेही भाषिक विचार बघितले की, हे लक्षात येते की, या दोन्ही महान विचारवंतांना परकीय भाषांविषयी आकस अथवा तिरस्कार नव्हता. स्वतंत्र भारताच्या संघटित, एकात्म, स्वतंत्र वाटचालीसाठी भाषा धोरण काय असावे, याबाबत दोघांमध्येही बर्‍यापैकी एकवाक्यता होती.


महाराष्ट्रात बहुतेकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषाशुद्धीचे कार्य किमान ऐकून तरी माहीत असते. इंग्रज, अरब, तुर्क, अफगाण इत्यादी परकीय राज्यकर्ते व आक्रमकांच्या प्रभावामुळे भारतीय भाषांमध्ये तुर्की, फारसी, अरबी, इंग्रजी व अन्य परभाषिक शब्द मिसळले. त्या शब्दांपासून सुटका करणे म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीचे एक अंग आहे, हा सावरकरांचा विचार होता. १३ शतके विविध राज्यकर्त्यांच्या गुलामीत घालवल्यानंतर स्वतःचे राज्य स्वतः मिळवलेल्या भारतीयांनी फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरते मर्यादित न राहता, सर्व क्षेत्रांमधून गुलामगिरीच्या सर्व खाणाखुणा मिटवून टाकाव्यात व आत्मविश्वासाने जगातील आव्हानांना भिडावे ही त्यांची कळकळ व तळमळ होती. यासाठीच मराठीत रुजलेल्या अनेक इंग्रजी, फारसी व अरबी शब्दांना अतिशय सोपे, सुटसुटीत, चपखल व अर्थवाही मराठी प्रतिशब्द वीर सावरकरांनी तयार केले. आजच्या मराठीत दैनंदिन व्यवहारात रुजलेले शेकडो शब्द ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेली देणगी आहे. उदा. ’मूव्ही’साठी ’चित्रपट’, ’तारीख’ साठी ’दिनांक’, ’शहीद’साठी ’हुतात्मा’ इ.
 
 
 
त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताची राष्ट्रीय भाषा (केंद्र सरकारची राजभाषा) कोणती असावी, असा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा ‘हिंदी’ ही भारतीय भाषा व ‘देवनागरी’ ही भारतीय लिपी यांचा पुरस्कार ‘राष्ट्रभाषा’ व ‘राष्ट्रलिपी’ म्हणून सावरकरांनी केला. सावरकर म्हणतात की, “भाषाशुद्धीचेच नव्हे, तर सर्व सुधारणांचे मर्म असावे की स्वकीय संस्कृतीत जे उत्तम, कार्यक्षम वा हितकारक आहे, त्याचा निष्कारण त्याग करु नये आणि विदेशी संस्कृतीतील आपल्यात नाही असे जे उत्तम, जे कार्यक्षम आणि जे हितकारक ते सकारण स्वीकारण्यास कचरू नये.” स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श मानून क्रांतिकार्य करणार्‍या भारतभरच्या अनेक युवकांमध्येही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या भाषिक विचाराचा ठसा उमटलाच. याचे उदाहरण म्हणजे हुतात्मा भगतसिंग यांनी मांडलेला भाषिक विचार.
 
 
भगतसिंग इयत्ता अकरावीमध्ये शिकत असताना तत्कालीन पंजाब प्रांतात ‘पंजाबी भाषा व लिपीची समस्या’ या विषयावर निबंध स्पर्धा झाली होती. ज्यात भगतसिंगांचा राज्यात पहिला क्रमांक आला. त्याकाळी पंजाबी शीख हे गुरुमुखी लिपीत लिहिलेल्या पंजाबी भाषेचे खंदे पुरस्कर्ते होते. हिंदू (विशेषतः आर्य समाजी) हे देवनागरी लिपीत लिहिलेल्या संस्कृतप्रचुर हिंदीबाबत आग्रही होते; तर पंजाबी मुम हे अरबी लिपीत लिहिलेल्या उर्दूचा अधिकाधिक वापर करत असत. म्हणजेच १ प्रांत, ३ भाषा, ३ लिप्या.
 
 
हा भाषा आणि लिपीचा तिढा सोडवण्यासाठी काय उपाय असला पाहिजे, यावर भगतसिंगांनी आपले अभ्यासपूर्ण मत ‘पंजाबी भाषा व लिपीची समस्या’ या निबंधात मांडले आहेत. त्यासाठी भगतसिंगांनी देवनागरी, गुरुमुखी, अरबी या तिन्ही लिप्यांच्या त्रुटी व बलस्थानांचे मूल्यांकन केले आहे. गुरुमुखी लिपी शीखांसाठी धार्मिक महत्त्वाची असली तरीही त्यामध्ये जोडाक्षरे लिहिण्याची सोय नाही. त्यामुळे ’आर्य’, ’स्वराज्य’ असे शब्दसुद्धा गुरुमुखी लिपीत लिहिताना ’आरय’, ’सवराजय’ असे लिहावे लागतात, त्यामुळे अर्थ व्यक्त होण्यात मर्यादा येते. उर्दू भाषा ज्यात लिहिली जाते त्या अरबी लिपीमध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार यातले काहीच न लिहिता नुसतीच अक्षरे (व्यंजने) एकाला एक जोडून लिहिण्याची पद्धत आहे. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच आपल्या धार्मिक व प्रांतिक अस्मिता बाजूला ठेवून पंजाबी भाषेसाठी हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीचा स्वीकार करावा जेणेकरून पंजाबी भाषेत अर्थ व्यक्त करणे अधिक अचूक होईल व उर्वरित भारतीय साहित्यविश्वाशी पंजाबी साहित्यविश्व अधिक दृढपणे जोडले जाईल.
 
 
 
सावरकर व भगतसिंग यांसारखे विचारवंत असा भाषिक विचार मांडत असताना, इतर भारतीय नेत्यांचे याबाबत विचार काय होते याकडे नजर टाकणे अधिक उद्बोधक ठरेल. राष्ट्रभाषा व राष्ट्रलिपीवर महात्मा गांधींचे मत असे होते की, मुस्लिमांना हा देश परका वाटू नये यासाठी अरबी लिपीत लिहिलेल्या उर्दू भाषेचा राज्यभाषा म्हणून सर्व भारतीयांनी स्वीकार करावा. पंडित नेहरू व मौलाना आझाद यांचे असे मत होते की, अति-संस्कृत-प्रचुर अथवा अति-फारसी-प्रचुर नसलेली हिंदुस्तानी नावाची बोलीभाषा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली जावी व तिचा एकच मजकूर देवनागरी व अरबी या दोन्ही लिप्यांमध्ये लिहिला जावा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मत असे होते की, हिंदीसकट सर्व भारतीय भाषांसाठी रोमन लिपी वापरली जावी. पुढे स्वातंत्र्यानंतर गठित झालेल्या संविधान सभेने उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करून देवनागरी लिपीत लिहिली जाणारी संस्कृतनिष्ठ हिंदी ही केंद्र सरकारची राजभाषा म्हणून स्वीकारली.
 
 
सावरकर आणि भगतसिंग या दोघांचेही भाषिक विचार बघितले की, हे लक्षात येते की, या दोन्ही महान विचारवंतांना परकीय भाषांविषयी आकस अथवा तिरस्कार नव्हता. स्वतंत्र भारताच्या संघटित, एकात्म, स्वतंत्र वाटचालीसाठी भाषा धोरण काय असावे, याबाबत दोघांमध्येही बर्‍यापैकी एकवाक्यता होती. अरबी, रोमन वगैरे लिप्यांपेक्षा देवनागरी लिपी अधिक शास्त्रशुद्ध व अचूक असल्यामुळे तिचा अंगीकार करावा, असा शास्त्रीय दृष्टिकोन दोघांच्याही विचारात होता. भारतीय संस्कृती व समाजमनाच्या विविध पैलूंमध्ये ओतप्रोत भरलेले भारतीयत्व भाषेमध्ये व साहित्यात कसे प्रतिबिंबित होते, याची त्यांना चांगलीच जाणीव होती. त्यामुळे ते भारतीयपण भाषा व लिपीमधून टिकविण्यासाठी काय पावले उचलावीत, याची सुस्पष्ट कल्पना त्यांना होती. स्वतंत्र भारताचे भाषिक धोरण ठरवण्यामध्ये सावरकर आणि भगतसिंग या दोघांचाही प्रत्यक्ष सहभाग नसूनही स्वतंत्र भारताने देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदी भाषेचा स्वीकार केलेला आहे. सावरकर आणि भगतसिंग या दोघांचेही भाषिक विचार किती मूलगामी व दूरदर्शी होते याचा प्रत्यय येण्यासाठी हेच तथ्य पुरेसे आहे. आपली व यापुढील पिढ्यांची ही जबाबदारी आहे की आपल्यातले भारतीयपण भाषिक क्षेत्रातही जपावे व वृद्धिंगत करावे.
 
- तन्मय केळकर
@@AUTHORINFO_V1@@