स्वा. सावरकरांचे गाईविषयक विचार

27 May 2020 17:09:49
savarkar _1  H




सावरकरांच्या गाईवरील अनेक लेखांपैकी पहिल्या लेखाचे नावच होते ‘गाय एक उपयुक्त पशू आहे, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे!’ या लेखातील मूळ अर्थ न समजता आणि महत्त्वाचे म्हणजे तो लेख पूर्ण न वाचता ‘सावरकर वीर, पण सैनिक नव्हे, हिंदुहृदयसम्राट तर नव्हेच नव्हे!’ असे प्रतिपादन केले जाते. अर्थात, सावरकरांच्या हयातीतसुद्धा अशी टीका होत होती आणि स्वतः सावरकरांनी त्याला उत्तर दिले आहे.



राष्ट्रपुरुषांनी मांडलेले विचार तोडून-मोडून स्वहितासाठी आणि समाज विघातासाठी वापरण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या ऐतिहासिक व्यक्तीने काय लिहिलं आहे? त्याच्या पुढचा-मागचा संदर्भ काय आहे? त्या वेळची परिस्थिती काय होती? याचा विचार न करता, कधीतरी ते लिखाण पूर्ण न वाचता एक-दोन शब्दांचा भलताच तर्क लावून आपले अर्धवट विचार ठोकून देणार्‍या स्वयंघोषित विचारवंतांची परंपरा सुरू झाली आहे. त्यात बळी पडतात ते सामान्य जन. या मंडळींच्या निशाण्यावर असणार्‍या अनेकांपैकी एक तेजस्वी नाव स्वातंत्र्यवीर सावरकर.

स्वातंत्र्यवीरांवर त्यांच्या साहित्याचा विपर्यास करून अनेक आरोप करताना आपल्याला काही मूढमती दिसतात. ‘गाय एक उपयुक्त पशू आहे, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे!’ या एका शीर्षकावरून सावरकर गोहत्याचे समर्थक होते, असा निराधार तर्क लावणारे अनेक दिसतात. पण, ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे’ हा सावरकरांचा लेख तर कोणी बघतच नाही किंवा सोयीस्करपणे दुर्लक्षितात. स्वातंत्र्यवीरांचे गाईवर अनेक लेख आजही उपलब्ध आहेत. आपल्या एका लेखाची सुरुवातच ते अशी करतात - “पूर्वी भारतासोबत अनेक देशात गोपूजन व्हायचे. गोपूजनाची रूढी सामान्यांच्या मनात एवढी रुजली होती की, ज्याचे लोक सगळं ऐकतात अशा अधिकारी पुरुषाने जरी गोपुजनाविरुद्ध मोहीम सुरू केली तरी ती लोकांस मुळापासून पटत नसे.
आपण भारतापूरता विचार केला, तर भारत हा कृषिप्रधान आणि गोपालकांचा देश आहे. आपल्याला कोणी मदत करत असेल, तो मनुष्य असो वा निसर्ग त्याचे आभार मानणे हा भारतीयांचा मूलतः स्वभाव आहे. परंतु त्याचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा तो घातास कारणीभूत ठरतो.”

सावरकर गोहत्येचे समर्थक?


सावरकरांनी कधीही ’गाय कापून खा’ असे म्हटले नाही. “जी गाय मनुष्याची आज युगानुयुगे अत्यंत प्रामाणिक सोबतीण झालेली आहे आणि शेतीचे खालोखाल जिच्या दूध, दही, लोणी, तूपवार मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अत्युपयुक्त पशूचे आम्हा मनुष्यास एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे, हे अगदी माणुसकीस धरून आहे. अशा त्या गाईचे रक्षण करणे, पालन करणे, हे आपले वैयिक्तक नि कौटुंबिकच नव्हे, तर एक राष्ट्रीय कर्तव्य आहे,” असे ते म्हणत.

“गोपालन हा भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी अतिशय उपयुक्त व्यवसाय आहे. भारतात गाईपासून प्राप्त होणार्‍या पदार्थांचे महत्त्व आपल्याला सर्वत्र दिसते. पण, तीच गाय जर राष्ट्रहिताच्या आड आली, तर आपली भावना बाजूला ठेवावी,” असेही सावरकर म्हणतात. इतिहासात मुसलमान बादशाहांनी जेव्हा हिंदुस्थानवर आक्रमण केले तेव्हा हिंदू सैन्याला पराभूत करण्यासाठी त्यांनी अनेक युक्त्या लढवल्या त्यातली एक - आपल्या सैन्यापुढे गाई उभ्या करायच्या. याचा दुष्परिणाम काय झाला? तर हिंदू सैन्याने त्या गाई मरु नये म्हणून तलवारी खाली टाकल्या आणि राष्ट्र मरु दिले. इथे सावरकर आपला राग व्यक्त करतात. आजही जर भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने गायी उभ्या केल्या, तर भारतीय सैन्याने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत पाकिस्तान सैन्याला पराभूत करण्यासाठी आधी त्या गाईंवर गोळ्या झाडल्या तरी कोणी त्यांना दूषणे देणार नाहीत, पण जर त्यांनी माघार घेतली तर ते कृत्य गौरवास्पद नसून दूषण देण्यासारखेच असेल. काही गाईंसाठी राष्ट्र मरू देणे हे चूकच. पण, या विचारांची तोडमोड करून कोणी असे म्हणत असेल की ‘सावरकर हे गोहत्येचे समर्थक होते’ तर ते त्यांस काय म्हणावे?

सावरकरांवर आरोप

सावरकरांच्या गाईवरील अनेक लेखांपैकी पहिल्या लेखाचे नावच होते ‘गाय एक उपयुक्त पशू आहे, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे!’ या लेखातील मूळ अर्थ न समजता आणि महत्त्वाचे म्हणजे तो लेख पूर्ण न वाचता ‘सावरकर वीर, पण सैनिक नव्हे, हिंदुहृदयसम्राट तर नव्हेच नव्हे!’ असे प्रतिपादन केले जाते. अर्थात, सावरकरांच्या हयातीतसुद्धा अशी टीका होत होती आणि स्वतः सावरकरांनी त्याला उत्तर दिले आहे.
गाय ही देवता आहे हे पटवण्यासाठी लोक आधी तिची उपयुक्तता सांगतात, स्वतः सावरकर ती नाकारत नाही. पण, जी गाय मनुष्याहून प्रगती-इच्छा-बुद्धी-शक्तीने हीन आहे, ती मनुष्याची देवता कशी असू शकते? सावरकर म्हणतात, “मनुष्याहून सर्व गुणांत अत्युच्च असलेल्या प्रतीकासच मनुष्याच्या देवाचे प्रतीक मानणे उचित. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देवी मानावे, पण मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये.” तर कोणी विचारेल, ‘सर्व खलविदं ब्रह्मा’ या प्रमाणे गाय का देव असू शकत नाही? याला उत्तर देताना सावरकर आधी प्रतिप्रश्न विचारतात - “हा प्रश्न ब्रह्मसृष्टीच्या विचारांचा की मायासृष्टीच्या व्यवहाराचा? कारण, ब्रह्मसृष्टीत गाय, गाढव, भक्ष, अभक्ष समान आहेत. मग असा प्रश्न विचारणार्‍यांनी गाईचे पंचगव्य आणि गाढवाचे पंचगाढव्य यात फरक का करावा?


जे लोक गाय ही ब्रह्मसृष्टीनुसार ‘माता’ म्हणतात, ते लोक जोडे डोक्याला आणि पागोटे पायात का बांधत नाहीत?” पुढे ते म्हणतात की, “अशा लोकांच्या दुधाळ गायी कुंभाराच्या गोठ्यात आणि कुंभाराची लाथाळ गाढवे त्यांच्या गोठ्यात बांधली तर ते त्यांना खपेनासे होईल. पुराणादी ग्रंथांचा गाईच्या दैवत्वाच्या समर्थनार्थ पुरावा देणारे वराहाची पूजा का करत नाही? कारण, पोथ्यांनुसार वराह हा एक अवतार आहे. मायासृष्टीचे म्हणाल, तर प्रत्येक गोष्ट मोजमापाने ठरवली पाहिजे. आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर जे खरे उतरते ते स्वीकारून जीवन भाबड्या प्रवृत्तीतून मुक्त नि प्रगतिशील करावे.

या भोळसट वृत्तीमुळे आपण आपल्या देशबांधवांची हेटाळणी करतो, हेही आपल्याला समजू नये? भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आहे, पण काळाच्या ओघात त्यात अनेक अनिष्ट रूढी समाविष्ट झाल्या. कदाचित विशेषकाळी त्या महत्त्वाच्या असतील, पण आता अनुपयुक्त झाल्या तर त्या सोडून द्याव्यात.” भेदी विचारापाई आपण आपल्या देशबांधवांना कसे दूर करतो, याची जाणीव सावरकर दोन उदाहरणांवरून करून देतात- “आम्ही असे अनेक प्रामाणिक, प्रख्यात नि सच्छिल गोभक्त पाहिले आहे की, जे ब्रह्मवादाच्या आधारे ‘गाय ही देवता का नाही’ म्हणून आव्हानपूर्वक विचारीत भरसभेत पंचगव्य पितात, गोमूत्र ओंजळ ओंजळभर देवळात शिंपडतात, पण डॉ. आंबेडकरांसारख्या एखाद्या शुद्ध नि त्याहूनही सुप्रज्ञ पूर्वास्पृश्याच्या हातचे स्वच्छ गंगोदक पिण्याचे राहोच, पण त्यांच्या अंगावर शिंपडले जाताच विटाळ झाला म्हणून स्नान करू लागतात. त्यांचा वाद तिथे मूग गिळून का बसतो? ते ब्राह्मक्षात्र जीवन की जे तुकारामांसारख्या संतांच्या नुसत्या पंक्तीस बसून सत्वस्थ दहीभात खाल्ला असताही भ्रष्टावे! मनुष्याच्या बुद्धिहत्येचे आणखी दुसरे समर्पक उदाहरण ते कोणते द्यावे?”


गाईला देव म्हणणे देवाचा अपमान!


गोभक्त राहूद्या, पण जी लोक कधी गाईची सोडा, पण देवाचीही ‘देव’ म्हणून पूजा करत नाहीत, तेही या विषयात तारे तोडताना दिसतात. सावरकरांचे नाव घेऊन गोहत्येचे समर्थन करणार्‍यांचीही हीच गत आहे. एका चित्रात गाईच्या अंगात अनेक देवता दर्शविल्या होत्या. सावरकर त्या चित्रासाठी असे म्हणतात की, “सर्व देवता, महर्षींना त्या गाईत कोंबता, ते चित्र विकता, त्याला गंधफूल वाहून पूजता, त्या पशूला देवाहून मोठे मानता तेव्हा खरे पावित्र्यविडंबन कोण करतो बरे? त्या देवांची तिच्या सर्व अवयवात एवढी दाटी झाली आहे की, वाळत घातलेले गहू खाताना त्या गाईला पाहून कोणी गोभक्ताने तिच्या पाठीत एक लाकूड मारले की दहापाच तरी लंबे झाल्यावाचून राहणार नाही.”

एका भाबड्या नि संशोधनात आडकाठी घालणार्‍या प्रसंगाचा सावरकर एका लेखात समाचार घेतात. मुंबई कांदिवली भागात ‘गीर’ जातीच्या गायीचे वीण सुधारण्याचे कार्य चाललेले होते. तिथे एक गाय अशी आढळली जी व्यालेली नसतानाही पाव शेरापर्यंत दूध द्यायची आणि ते ४८ तासांपर्यंत बिघडत नसे. ही बातमी गोस्वामी गोकुळनाथजींना कळताच त्यांनी त्या गाईचे दूध मनुष्याला न देता देवाला अर्पावे आणि तिच्यासाठी मंदिर बांधावे असे आज्ञापिले, जे ऐकून काही श्रीमंतांनी मिळून ते बांधून रामनवमीस उद्घाटन केले. गाईला देवता आणि उपयुक्त पशू मानण्यात हा फरक आहे. पुढे सावरकर म्हणतात, “अशी न व्यालेली तरी दूध देणारी गाय पाश्चिमात्य देशात आढळली असती, तर तिला वैज्ञानिकांकडे पाठवून तिची तपासणी करून अशा गाईची प्रजाती वाढवता येते का, याचा प्रयत्न झाला असता. पण इथे तिला ‘दैविक’ मानून तिची पूजा सुरू झाली आणि तिच्यावर संशोधन तर झाले नाहीच, पण तिचे दूधही मनुष्याला मिळाले नाही. ते दूध जर दीन अर्भकास लाभले असते, तर ते त्या गाईच्या कामधेनूपणास साजेसे नि देवास अधिक मानवले असते. पण जर ती गाय वेळेत व्यात नसेल आणि आमच्या इतर गाईंसारखी वासरे जन्माला घालून आमचे गोधन वाढवत नसेल, तर ती सामान्य गाईंपेक्षा हीन मानली पाहिजे.”



राष्ट्राचा सशक्त पाया!

सावरकरी विचारांना आपण कोणत्याही चौकटीत बांधू शकत नाही. वैज्ञानिकदृष्ट्या गोपालनाने देशाचे आर्थिक स्थितीस साहाय्य करावे, अशा संस्थांना सावरकरांची सहानुभूती आहे. शूर गोरक्षक कसा असावा, हे सांगताना ते वीर हरिसिंहाचे उदाहरण देतात. पण, गाईची पूजा करून हिंदवासी गाईंसारखे न होता, त्यांनी हे राष्ट्र सिंहाप्रमाणे सशक्त पायावर उभारले पाहिजे.
- हर्षल देव








Powered By Sangraha 9.0