सायंकाळी रानांत चुकलेलं कोकरूं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
24_1  H x W: 0






एक व्यक्ती आयुष्यात काय काय करू शकते? तर विचारणार्‍याला तुम्ही सावरकरांचे तुम्हाला माहिती असलेले वर्णन करा. उत्तम लेखक, कवी, भाषांतरकार, क्रांतिकारक, भाषाशुद्धी, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक आणि अजून बरंच काही...


त्यांनी अनेक कविता लिहिल्या. फटके, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, पोवाडे, नाट्यपदे आणि बरंच काही. सावरकरांनी १९०० साली ‘सायंकाळी रानांत चुकलेलें कोकरूं’ ही कविता लिहिली, त्याचा अर्थ समजून घेऊया...
--


कां भटकसि येथें बोलें? कां नेत्र जाहले ओले?
कोणिं कां तुला दुखवीलें? सांग रे॥



तात्याराव येथे एका काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या कोकराशी संवाद साधत आहेत. त्याची विचारपूस करत आहेत. ते विचारत आहेत, “तू सांग मला असा का भटकत आहेस? तुझे डोळे ओले का आहेत? तू रडत का आहेस? तुला कोणी काही बोललं आहे

का? सांग मला,” असं हरतर्‍हेने विचारत आहेत.

धनि तुझा क्रूर कीं भारी। का माते रागें भरली।

का तुझ्यापासूनी चुकली? सांग रे॥

तुझा मालक खूप क्रूर आहे का? तुला तुझी आई ओरडली का? का ती हरवली आहे? मला सांग तू.

हा हाय कोंकरूं बचडें! किति बें बें करूनी अरडे?

उचलोनि घेतलें कडे। गोजिरें॥

अरे हे बिचारे कोकरू! किती बें बें करून ओरडत आहे. म्हणून ते कोकराला कडेवर उचलून घेत आहेत.

कां तडफड आतां करिसी? मीं कडे घेतलें तुजसी

चल गृहीं चैन मग खाशी। ऐक रे॥

उचलून प्रेमाने कुरुवाळल्यावरही त्याची हालचाल, तडफड अजून चालूच होती. ते चुळबुळ करतच होतं. तेव्हा तात्याराव परत

विचारतात, ‘’का चुळबुळ करतो आहेस? मी तुला कडेवर घेतले आहे. माझ्या घरी चल. छान आरामात राहशील. ऐक माझं.”

मी क्रूर तुला का वाटे? हृदय हें म्हणुनि का फाटे?

भय नको तुला हें खोटें। ऐक रे॥

मी तुला क्रूर वाटत आहे का? म्हणून तुला भीती वाटत आहे का? पण तुझी ही भीती खोटी आहे रे.

हा चंद्र रम्य जरि आहे। मध्यान रात्रिमधिं पाहे

वृक वारुनि रक्षिल ना हें। जाण रे॥

हा चंद्र रम्य जरी असला, मध्यरात्री तो डोकावत असला. परंतु लांडग्यापासून तुझे रक्षण नाही होणार, हे ओळख.

तोें दूर दिसतसे कोण? टपतसे क्रूर बघ यवन

गोजिरी कापण्या मान। जाण रे॥

दूर तिथे कोण दिसतो आहे? कोणी यवन मान कापण्यासाठी टपून बसला आहे. हे ओळख रे.

कमि कांहिं न तुजलागोनी। मी तुला दुध पाजोनी

ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे॥

मी तुला काही कमी पडून देणार नाही. हे घे. तुला दूध देतो आहे. रात्री तू माझ्या घरी राहा. मग ठरवू आपण.

उदईक येथ तव माता। आणीक कळपि तव पाता

देईन तयांचे हातां। तुजसि रे॥

उद्या तुझी आई येथे येईल आणि कळपात तुला बघेल. मी तुला तिच्याकडे देईन.

मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें
 
तो नवल मंडळींना तें। जाहलें॥

माझ्या हाताने थोपटून त्या कोकराला घरी आणले. तर आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले.
 
कुरुवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते
 
कुणि अरसिक मजला हसते। जाहले॥
 
कोणी त्याला कुरवाळत आहे. कोणी त्याचे चुंबन घेत आहे. पण ज्या लोकांना हे आवडत नाही, ते मला हसत आहेत. (जगात
सगळे जण समान नसतात.)

गोजिरें कोकरूं काळें। नऊ दहा दिनांचें सगळें

मऊमऊ केश ते कुरळे। शोभले॥

गोंडस, गोजिरे काळे कोकरू. ते अगदीच ९-१० दिवसांचे आहे. त्याचे मऊ आणि कुरळे केस शोभत आहेत. ते कोकराचे वर्णन
करत आहेत.

लाडक्या कां असा भीशी। मी तत्पर तव सेवेसी

कोवळी मेथि ना खासी। कां बरे॥

ते पुन्हा कोकराला विचारत आहेत, लाडक्या, तू का असा भितो आहेस? मी तुझ्या सेवेसाठी तत्पर आहे. कोवळी मेथी जी तुला
आवडते तीही तू खात नाही आहेस. असं का करतो आहेस?

बघ येथें तुझियासाठी। आणिली दुधाची वाटी

परि थेंब असा ना चाटी। कां बरें॥

बरं. बघ तुझ्यासाठी दुधाची वाटीही आणली आहे. पण एकही थेंब तू पित नाहीयेस. असं का करत आहेस?

तुझी माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली

माझीही माता नेली। यम करे॥

तुझी आई क्षणभर चुकली. म्हणून तू उदास आहेस का? मग मी काय करावे? माझी तर आई कधीच यमाने नेली. (इथे सावरकर
त्यांच्या आईविषयी हळवे झालेले दिसतात.)
भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला

कल्पांतकाल जरि आला। हाय रे॥

ते पुढे म्हणत आहेत, उद्या तुझी आई तुला भेटेल. प्रलय जरी आला तरी मला माझी आई कधीच भेटणार नाही. किती हे दुर्दैव!

मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्चरचि सारा।

ममताही करिते मारा। वरति ते॥

हे सर्व खोटं आहे. मिथ्य आहे. हा सगळा व्याप नश्वर आहे.

ह्या जगीं दुःखमय सारें। हीं बांधव पत्नी पोरें

म्हणुनियां शांतमय हो रे। तूं त्वरें॥

या जगात बांधव, पत्नी, मुले सगळेच दुःखी आहेत. म्हणून म्हणतो तू तरी लगेच शांत हो.

तरि कांहिं न जेव्हां खाई। धरूनियां उग्रता कांही

उचटिलें तोंड मीं पाही। चिमुकलें॥

एवढं करूनही तो काही खात नाही हे पाहून त्याचं चिमुकलं तोंड थोडंसं उघडलं.

हळू दूध थोडकें प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें

कोकरूं बावरून गेलें। साजिरें॥

तेव्हा थोडं तरी दूध प्यायलं. मग त्याने लगेच तोंड फिरवले. ते बिचारं कोकरू बावरून गेलं.

स्वातंत्र्य जयांचें गेलें। परक्यांचे बंदी झाले

त्रिभुवनी सुख न त्यां कसलें। कीं खरें॥

ज्यांचे स्वातंत्र्य गेले. जे परक्यांचे बंदी झाले आहेत. त्यांना कुठेही सुख नाही. (इथे तात्याराव पारतंत्र्याविषयी बोलत आहेत.)

लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले

विश्व हें मुदित मग केलें। रविकरें॥

मग ते छातीशी कवटाळून झोपले. वेळ पटापट गेला. संपूर्ण विश्व सूर्यदेवामुळे आनंदित झाले. (सकाळ झाली.)

घेऊनी परत त्या हातीं। कुरुवाळित वरचेवरती

कालच्या ठिकाणावरती। सोडिलें॥

मग त्या कोकराला हातात घेऊन, त्यांनी कुरवाळत जिथे ते सापडलं तिथे सोडलं.

तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं

दगडांचें तरूंचें पाठीं। हाय रे॥

एवढ्यात त्याची आई त्याला शोधतच होती. कुठे मोठ्या दगडांच्या मागे, झाडाच्या मागे.

हंबरडे ऐकूं आले। आनंदसिंधु उसळले

स्तनि शरासारखें घुसलें। किति त्वरें॥

मग या कोकराचा आवाज ऐकू आल्यावर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ते कोकरू पटकन तिच्या कुशीत शिरले.

डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षि हा गातो।

तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें॥

झाडावर बसून पक्षी आनंदाने गातो आहे. हाही आनंदाने प्रतिसाद देतो आहे.

हे प्रभो हर्षविसी यासी। परि मला रडत बसवीसी

मम माता का लपविसी। अजुनि रे॥

हे देवा, याला त्याचा आनंद मिळवून दिलास. पण मला मात्र अजून रडत, दुःखी ठेवलं आहेस. माझ्या आईला अजून का लपून
ठेवलं आहेस?

या कवितेत तात्यारावांनी कोकराशी संवाद साधला आहे. आपणां सर्वांना माहिती आहेच की, त्यांनी सागराशी, ’वृषोक्ती’ या
कवितेत एका बैलाशी संवाद साधला आहे. एखाद्या प्राण्यांशी किंवा निर्जीव गोष्टींशी संवाद साधताना आधी त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, तरच त्याच्या मनात काय आहे हे समजतं. तात्यारावांनी हेच अगदी योग्य पद्धतीने मांडलं आहे. त्यात त्यांनी पारतंत्र्य किती टोचतं, बोचतं याविषयी सांगितले आहे आणि त्यातील त्यांच्या भावना या आपल्यापर्यंत पोहोचतातच.

त्याचप्रमाणे या कवितेतही स्वातंत्र्य-पारतंत्र्याचा उल्लेख आहे. ते कोकराची उत्तम काळजी घेत आहेत. त्याला दूध देत आहेत. त्याची प्रेमाने विचारपूसही करत आहेत. त्याला आपल्या घरी नेत आहेत. त्याला कोवळी मेथी खायला देत आहेत. पण हे कितीही आरामदायी असलं, सुखवस्तू असलं, तरीही कोकरू उदास आहे. कारण, ते त्याच्या आईवडिलांपासून, कळपापासून दूर आहे. त्या कोकराच्या दृष्टीने काही अंशी त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आलीच ना!!! इथे तात्यारावांना असे सुचवायचे आहे की, आज इंग्रज आपल्याला त्यांचे उत्तम शिक्षण देत आहेत. नोकरी देत आहेत. पगार देत आहेत. बढती देत आहेत. पण, आपण मात्र आपल्या 
स्वातंत्र्यापासून वेगळे होत आहोत. अशाच संदर्भाचा उल्लेख त्यांनी ’सागरास’ या कवितेत केला आहे.

’नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा। मज भरतभूमिचा तारा॥

प्रासाद इथे भव्य परी मज भारी। आईची झोपडी प्यारी॥

तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा। वनवास तिच्या जरि वनिचा॥’

त्याच प्रमाणे ’वृषोक्ती’तही या प्रकारचा उल्लेख आहे-

’किंवा तू म्हणशील कीं तव धनी आभार भारी वदे

राजे रावबहादुरादिक तुला मोठ्या किताबांसि दे

ऐसे शुष्क किताब घेऊनि तुवां स्वातंत्र्यसंपत् दिली

हा हा! गर्दभ घेऊनी सुरभिला वेड्या कशी अर्पिली॥’

अजून पुढे ते असंही म्हणतात, हे सगळं मिथ्या आहे, नश्वर आहे. फक्त प्रेम, माया, ममता ह्यांनीच आपण तरु शकू.
याशिवाय ते त्यांच्या आईबद्दलही या कवितेत खूप हळवे झाले आहेत. आपण हे विसरून चालणार नाही की ही कविता त्यांनी १९०० साली लिहिली आहे. म्हणजेच वयाच्या अगदीच १७-१८व्या वर्षी. या कवितेत कोकरू अगदीच नऊ-दहा दिवसांचे आहे. तो त्याच्या आईपासून हरवला आहे. पण, तेव्हाच तात्याराव त्याला म्हणताहेत, ‘’तुझी आई हरवली आहे. जी उद्या तुला भेटणार आहे. तू नको दुःखी होऊ. पण, माझी आई तर लहानपणीच गेली. मी काय करावे???” तात्याराव अगदीच नऊ वर्षांचे असताना त्यांची आई गेली. आईच्या मायेने वहिनीने त्यांचा सांभाळ केला. हे आपल्याला ’सांत्वन’ या कवितेत दिसून येतंच.

- अपूर्वा बापट-भोपळे
@@AUTHORINFO_V1@@