कार्यकर्ता

    दिनांक  27-May-2020 14:19:52
|


madanbhai_1  H


“भाई, जरा काम होते .”
शेजारच्या खेड्यातून आलेला
एखादा गरीब कार्यकर्ता भाईना सांगे़
‘बोलना, काय काम होते ?’
‘थोडे पैसे हवे होते.’
‘किती ? ‘ ‘तीन रुपये़’


भाई दुकानात बसलेले असत़ त्यांचा गल्ला म्हणजे एक लाकडी पेटी होती़ पेटी कसली? अर्धा हात लांबीचा लाकडी खोका. त्यातून भाई चिल्लर काढत, मोजत त्याला लागणारे पैसे देत़ त्यातून त्या माणसाची नड भागली जाई. अशा असंख्य माणसांना हात देऊन भाईंनी उभे केले. त्याकाळात सामाजिक काम करणे म्हणजे खरेच लष्कराच्या भाकर्‍या भाजणे होते आणि त्यातून जनसंघाचे काम करणे फारच कठीण़. मात्र, त्याकाळातही भाईंनी लष्कराच्या भाकर्‍या भाजल्या़ न थांबता न थकता आणि अतिशय प्रसन्नपणाने व समाधानाने़ आजच्या राजकारणात मदनभाई असते. तर, आजच्या राजकीय व्यवस्थेतून केव्हाच बाहेर फेकले गेले असते़. आताचे राजकारण पैसा, सगेसोयरे, गटबाजी हयातच गुंतून गेले आहे़. राजकारणात राहून स्वच्छ राहिलेला माणूस कस्तुरी मिळण्याइतके अवघड झाले आहे़. त्यामुळे आजच्या काळातील कार्यकर्त्यांना मदनभाई कळणे. अशक्य, तर दिसणेही दुरापास्त़ याकाळात आमच्या पडघ्यात संघ शाखा सुरु झाली, तेव्हापासून मदनभाईंची जडणघडण होत होती़. जुने लोक सांगतात, त्या काळात आमच्या गावात असा एकही माणूस नसेल जो शाखेत गेला नाही़. अठ्ठेचाळीसच्या सत्याग्रहात त्यांची तलाठ्याची नोकरी गेली़ त्यांनी व्यापार चालू केला़. तोही त्याकाळात तुक्या वाण्याला लाजवणारा होता़ आमच्या पाहण्यातला त्यांचा व्यापार म्हणजे गोळ्या बिस्किटांचे दुकान आणि वह्या-पुस्तके़ येणार्‍या सिझनला लागणार्‍या वस्तूंचा व्यापार करणे, हाच व्यापार आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक काम कसे करायचे याचा मदनभाई म्हणजे एक वस्तुपाठ होता़.
 

१९६० सालापासुन १९८५ पर्यंत पडघा परिसरात ‘जनसंघ म्हणजे मदनभाई आणि मदनभाई म्हणजे जनसंघ’ असे समीकरणच तयार झाले होते़ गावातील चार माणसे हाताशी धरुन भाई जनसंघाचे काम करीत़ त्यात चार-दोन खेड्यातली माणसे असत़ तेव्हा भिवंडीच्या ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते़ परिसरातील सारी गावे ‘खटारा’ या निशाणीला मानणारी़ एकाही गावात जनसंघाची पणती लागत नव्हती़ मात्र, त्याही काळात भाईंच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या काळात सर्व ठिकाणी जनसंघाचे पोलिंग एजंट असत़ वांद्रे गावातील महादु पाटील, वाफाळे गावचे नथु विषे, वारक्या मुकणे, आमणे गावचे नकुल पाटील आणि पडघ्यातील कार्यकर्ते यांना हाताशी धरुन भाई जनसंघाचे काम करीत असत़ आताच्या पिढीला कोण मदनभाई हे सांगावे लागेल़ त्यात काही चूक नाही़ तो काळाचा महिमा़ पण, जुन्या माझ्यासारख्या माणसांना भाई आठवतात़, ते एका जुन्या घरात राहणारे़ तेव्हा पातकरांचे एकत्र कुटुंंब होते़ आमणे गावातून ते कुटुंब पडघ्यास आले व तेथेच स्थायिक झाले़ रोज सकाळी आठ-साडे आठ वाजता स्वच्छ धोतर, नेहरु शर्ट अशा वेषात भाई घरुन दुकानात जात़ धोतराचा सोगा ते हातात धरत़ कपडे साधे पण स्वच्छ असत़. गोरेपणाच्या झाकीने कपडे त्यांना उठून दिसत़ दुकानात त्यांचा व्यापार सुरु होई़ मग बारा-साडे बारा वाजले की घरी जाणे़ दुपारचे जेवण उरकुन मग भिवंडी - कल्याण जनसंघाच्या बैठकीसाठी जाणे सहा-साडेसहा वाजता परत येऊन दुकानात आठपर्यंत थांबणे़ मग दुकान बंद झाल्यावर आठ वाजता नाक्यावरील दिगू काकांच्या दुकानात जाणे़.

 

राजकीय विषयांवर चर्चा करणे़ मग रात्री संघ शाखा़ असा त्यांचा दिनक्रम असे़ त्यांचा दिनक्रम ठराविक चाकोरीबध्द मात्र जनसंघाच्या कामाला अग्रक्रम देणारा होता़ जवळ पैसे नाहीत, वाहन नाही, प्रवासाची काही सोय नाही, अशा परिस्थितीत चार-दोन जीवाभावाच्या कार्यकर्त्यांबरोबर भाई जनसंघाचे काम करीत व नेटाने वाढवित होते़ गोहत्या बंदी आंदोलन, कच्छ सत्याग्रह, ग्रामपंचायत निवडणुका, परिसरातील तालुक्यातील जनसंघाच्या कामात भाईंचा शब्द प्रमाण मानला जात असे़ काहीही मते मिळत नसताना कार्यकर्ते मन लावून काम करत़ कार्यकर्त्याला आपण निवडणूक जिंकणार, असा आत्मविश्वास ते देत़ हवा निर्माण करत असत़ मात्र, निकाल लागले की जनसंघाच्या उमेदवाराला विधानसभेला तीन-एक हजार मते मात्र पडलेली असत़ त्याकाळात निवडणूक संपली म्हणजे पोलिंग एजंट म्हणून नेमलेले कार्यकर्ते पडघ्यात परत आले की, बैठक होत असे़ मग कार्यकर्ते एकमेकांमध्ये चर्चा करीत असत़ मग एखादा कार्यकर्ता विचारी “अरे वाहुलीला आपल्याला किती मते पडतील? ” मग तेथे गेलेला पोलिंग एजंट सांगत असे, “रुपयात दहा आणे आपल्याला!” दुसरीकडून पोलिंग एजंट उत्साहाने सांगे,’ अरे तिकडे आपल्याला सव्वा रुपया!’ काय म्हणतोस ? सारे अवाक होऊन जात़ प्रत्यक्षात सव्वा रुपया काय सव्वा आणादेखील पदरात पडलेला नसे़ पण तेव्हा माणसात जिद्द होती़ काम करण्याची ‘खाज’ होती़. पराभवातदेखील माणसे निराश होत नसत़. आपुलकी, जिव्हाळा, आपलेपणा यातून कार्यकर्ते बांधलेले असत़ त्यांना एकटेपणा, भकासपणा, निराशा जाणवत नसे़. आजच्या बदलत्या माहोलमध्ये भाईंसारखा कार्यकर्ता दिसत नाही़ आठवतात तेव्हा मन भकास होऊन जाते़ काळाने सारे बदलले़. काळाबरोबर सारे बदलते, हा निसर्गाचा नियम आहे़ पण काळ चांगुलपणा, आपुलकी, आपलेपणा, प्रामाणिकता खाऊन मुजोर होतो, हे सहन होत नाही, पाहावत नाही म्हणून भाई आठवतात़ सतत़… निरंतर... 

 
- महेश वैद्य

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.