‘नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन’ - नमो

    दिनांक  27-May-2020 15:16:38
|

 

NAMO_1  H x W:

 
 

रुग्णांचे वय एक महिन्याच्या बाळापासून, तर ७० वर्षांच्या वरिष्ठ नागरिकांपर्यंत होते. आजारात व लक्षणांतही विविधता होती. सर्दी, खोकला, बारीक ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे, हातपाय थंड पडणे, उदास वाटणे इत्यादी लक्षणे तर डायबेटीस, क्षय रोग, दमा, ब्लडप्रेशर, थायरॉईड, मिरगी इत्यादी आजार होते. हे सर्व रुग्ण बरे कसे झाले? कदाचित रुग्णांचा माझ्यावर व माझ्या बोलण्यावर दृढ विश्वास होता.

 
 
 
 
 
नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशनही अ‍ॅलोपॅथी डॉक्टर व डेंटल डॉक्टरांची संस्था १९८८ साली स्थापन झाली. हिचे मुख्यालय दिल्लीत असून संस्थेचे कार्य गेल्या ३० वर्षांत संपूर्ण भारतभर पसरत आहे. डॉक्टरांना सेवाभावी वृत्तीने काम करण्यासाठी ही संस्था मार्गदर्शन करते, प्रोत्साहन देते. समाजातील वंचित वर्ग, खास करून दुर्गम भागातील आदिवासी पाडे, बकाल झोपडपट्टी वस्ती यांना दत्तक घेऊन त्या भागांमध्ये वैद्यकीय सुविधा पुरविणे, त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश होणार्‍या भावी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्यात आत्मविश्वास व सेवाभाव निर्माण करणे, वैद्यकीय महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षक-विद्यार्थी संबंध सुधारणे इत्यादी अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संस्था डॉक्टरांमध्ये स्वयंशिस्त व राष्ट्रप्रेम जागृत करण्यास मदत करते.


संस्थेतर्फे देशाच्या विविध भागात प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र, विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. धन्वंतरी सेवा यात्रा, जम्मू-काश्मीर साहाय्य यात्रा, शबरीमाला यात्रा, ऋषी चरक सप्ताह, धन्वंतरी पूजन, स्वामी विवेकानंद जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसारखे स्तुत्य उपक्रम देशभर राबविले जातात. हे सर्व कार्य करत असताना कोरोनासारखी जीवघेणी वैश्विक साथ जेव्हा देशावर आक्रमण करते तेव्हा संस्थेतर्फे शिस्तबद्ध रितीने शहरात, दुर्गम भागात व झोपडपट्टी विभागात वैद्यकीय साहायता पोहचविले जाते. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, रुग्णसेवा, ऑनलाईन वैद्यकीय सल्ला इत्यादी अनेक उपक्रम संस्थेने देशभर प्रभावीपणे राबविले. संस्थेची ध्येयधोरणेदेखील विशेष आहेत.


) स्वदेशी आरोग्य मॉडेल तयार करून ज्यात अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीबरोबर आपल्या परंपरागत उपचार पद्धतीचाही वापर केला जावा. जीवनशैली सुधारण्याकडे व राहणीमान सुधारावे, यासाठी प्रयत्न करणे.


) आयुर्वेदिक औषधी कंपन्यांना प्रोत्साहन देणे.


) महागड्या औषधांच्या किमतीच्या नफ्यात मर्यादा ठेवणे.


) स्वतंत्र वैद्यकीय विद्यापीठ व स्वतंत्र वैद्यकीय ग्रॅण्ड कमिशन स्थापन करणे.


) वैद्यकीय शासकीय सेवामध्ये समानता आणणे. डॉक्टरांचे वेतन सुधारणे.


) राष्ट्रीय बजेटचा १० टक्के हिस्सा हा आरोग्य सेवेसाठी असावा.


‘नमो’ या संस्थेच्या कार्यात भाग घेण्याचा योग २४ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात झाला. साठी ओलांडलेल्या व डायबेटीस, ब्लडप्रेशरसारखे आजार असणार्‍या फॅमिली डॉक्टरांना दवाखाना न उघडण्याचा सल्ला देण्यात आला. घरी बसून करायचे तरी काय, असा प्रश्न ४० वर्षे फॅमिली डॉक्टर म्हणून व्यवसाय करणार्‍या माझ्यासारख्या समोर उभा राहिला. नमोचे मुंबई अध्यक्ष डॉ. अविनाश सिन्हा व राष्ट्रीय सहसचिव डॉ. अर्चना शर्मा यांनी मला ‘मोफत ऑनलाईन आरोग्य सल्ला’ देण्यासाठी सुचविणे. हे कार्य संस्थेतर्फे फक्त मुंबईतच नाही, तर सर्व देशभर सुरू झाले. यासाठी नियमावली तयार करण्यात आली. रुग्णाचे नाव, वय, पत्ता, व्याधी लक्षणे, केलेल्या चाचण्या हे सर्व व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यास सांगण्यात आले. त्या सर्वांना अभ्यास करून डॉक्टर स्वतः रुग्णांशी संपर्क करत असे व त्यांच्याशी चर्चा करून त्याला धीर देऊन, व्हॉटस्अ‍ॅपवरच त्याला प्रीसक्रिप्शन दिले जायचे. दोन दिवसांनी डॉक्टर स्वतः फोन करून वा व्हॉट्सअ‍ॅपवर रुग्णांची चौकशी करायचे. मुख्य म्हणजे याचा सारा तपशील नोंद करून तो मुंबई अध्यक्षांना पाठविला जायचा.


२४ मार्च ते १३ मे असे ५० दिवस मी मोफत ऑनलाईन आरोग्य सल्ला देण्याचे काम मी नमोसाठी केले, याचा मला अभिमान वाटतो व समाधान वाटते. या काळात माझा दवाखाना बंद होता व उत्पन्न शून्य होते. परंतु, कोरोना प्रतिबंधात आपला खारीचा वाटा आहे, याचे मला समाधान होते. रुग्णांशी संवाद साधताना कोरोनाची भीती, मृत्यूंची भीती, नैराश्य, अवास्तव भीती, एकटेपण, मुला-बाळांची चिंता, रोजगार सुटण्याची चिंता त्यांच्या संभाषणातून प्रकट होत होत्या. माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद व ४० वर्षे वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव उपयोगी पडला. या सर्व रुग्णांना मी फक्त औषधे लिहून नाही दिली, तर त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या व त्यांचे दुःख व भीती कमी करण्याचा माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न केला. या सर्वांचा परिणाम अतिशय सकारात्मक होता. माझ्याकडे सल्ला घेणार्‍या एकाही रुग्णाला कोरोनाची टेस्ट करावी लागली नाही की, कुणाला रुग्णालयात भरती करावे लागले नाही. रुग्णांचे वय एक महिन्याच्या बाळापासून, तर ७० वर्षांच्या वरिष्ठ नागरिकांपर्यंत होते. आजारात व लक्षणांतही विविधता होती. सर्दी, खोकला, बारीक ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे, हातपाय थंड पडणे, उदास वाटणे इत्यादी लक्षणे तर डायबेटीस, क्षय रोग, दमा, ब्लडप्रेशर, थायरॉईड, मिरगी इत्यादी आजार होते. हे सर्व रुग्ण बरे कसे झाले? कदाचित रुग्णांचा माझ्यावर व माझ्या बोलण्यावर दृढ विश्वास होता. आर्थिक देवाणघेवाण नव्हती. म्हणून या दूरभाषिक सल्ल्यातही खरी मंगलमैत्री होती. ५० दिवस दवाखाना बंद ठेवला होता. तो आता मर्यादित वेळेसाठी चालू करण्याचा विचार आहे. त्यामुळे अनिच्छेने ‘मोफत वैद्यकीय व्हॉट्सअ‍ॅप’ सल्ला मला बंद करावा लागत आहे. मला संधी दिल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे आभार. संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!


- मिलिंद शेजवळ
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.