हाऊज द जोश.. ‘कोरोना’ला हरवणारच!

    दिनांक  27-May-2020 15:42:32   
|

 

 
sf_1  H x W: 0
 

 

 


दि. १६ मे ते २४ मे रा. स्व. संघाने ‘निरामय फाऊंडेशन’च्या माध्यमातून महानगरपालिकेशी समन्वय साधत विलेपार्लेच्या नेहरूनगर वस्तीमध्ये कोरोना स्क्रिनिंग आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. संघ स्वयंसवेक, पदाधिकारी, डॉक्टर्स, वस्तीपातळीवरील कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने या शिबिरातील सेवाकार्यात सहभागी झाले होते. हे काम म्हणजे आजच्या भाषेत जीवावर उदार होणेच होय. पण हे काम करण्यास संघ स्वयंसेवक आणि त्या प्रेरणेने डॉक्टर्स, वस्तीपातळीवरील कार्यकर्ता तयार झाला आहे. त्या दैवी कार्याचा घेतलेला हा शब्दवेध...

 

 


कोरोना काळात कुठेही गेले तरी अस्वस्थ व्हायला होते. कोरोनाचा विषाणू आपल्याला नक्की पकडेल, अशी सूक्ष्म भावना मनात असते. पण विलेपार्ले येथील ‘युथ हॉस्टेल’ला पोहोचले आणि मी या भीतीवर, या अस्वस्थेतवर मात केली. विलेपार्लेमधील नेहरूनगर वस्तीमध्ये आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या सगळ्यांची निवास व्यवस्था इथे होती. या शिबिराची जबाबदारी रा. स्व. संघ, मुंबई महानगरचे कार्यवाह संजयजी नगरकर यांच्यावर होती. त्यामुळे शिबिराबाबत त्यांच्याकडून माहिती घ्यायची होती. ते तिथे बसलेल्या काही लोकांना सांगत होते. “त्यांना आताच ‘क्वारंटाईन’ करून उपचार सुरू केले. ते म्हणत होते, काही दिवसांत आम्ही पटकन बरे होऊ, आम्हाला परत काम करायचे आहे.” आता एकणार्‍या कोणालाही वाटेल की असे कोणते हिरे मोती मिळवण्याचे काम आहे की हे लोक ‘क्वारंटाईन’ असून उपचार घेत आहेत. पण त्यांना बिल्कूल खंत नाही की भीती नाही. नुसते कोरोनाचे नाव जरी एकले तरी पाचावर धारण बसण्याची स्थिती आहे. या अशा परिस्थितीमध्ये या लोकांना पुन्हा कोणते काम करायचे आहे? तर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये स्वत:ला प्रचंड हतबल समजणार्‍यांसाठी सांगायलाच हवे की हे लोक आहेत, नेहरूनगरच्या आरोग्य शिबिरात नि:स्वार्थी भावनेने सहभागी झालेले संघ स्वयंसेवक, डॉक्टर्स. त्यांना बरे झाल्यावर पुन्हा वस्तीपातळीवर नि:स्वार्थीपणे आरोग्यसेवा करायची आहे. असो, संजय म्हणतात की, “संघशक्ती राष्ट्रशक्ती आहे. आज समाजासमोर संकट असताना आपल्या समाजाला, देशाला कुणी दुसरे येऊन वाचवेल किंवा कुणीच वाचवले नाही तर आपण दुरूनच ही आपत्ती पाहत बसणे हा संघ स्वयंसेवकांचा स्वभाव नाही. कोरोनाची आपत्ती कोसळली आणि या काळात आपल्या समाजाला आपण कशी मदत करू शकतो, याबाबत आम्ही विचार करू लागलो. मुंबई पातळीवर नियोजन सुरू झाले. सुरुवातीला रा. स्व. संघाच्या माध्यमातून लाखो लोकांना अन्न वितरण करणे सुरू झाले. पण कोरोनाचा संसर्ग काही थांबत नव्हता. प्रशासन यंत्रणा सर्वतोपरी काम करत होती.
 

 

वस्तीपातळीवर नियोजन करून सगळया वस्तीला कोरोनापासून मुक्त करण्याची योजना केली तर त्यासाठी मनुष्यबळ आवश्यक होते. सेवाभाव हा नित्यभाव असल्याने संघ स्वयंसेवक हे काम करण्यास तयार होतेच. यासाठी ‘निरामय फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेतला. महानगरपालिकेने सूचवल्याप्रमाणे ‘के वेस्ट’ प्रभागामधली नेहरूनगर वस्ती सेवेसाठी निवडली. प्रशासनाने, महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी उत्तम सहकार्य दिले. त्यातूनच नेहरूनगरच्या २० हजार लोकांची तपासणी आम्ही करू शकलो.संजयजी शांतपणे बोलत होते. पलीकडे प्रांत प्रचारक सुमंत आमशेकरजी, विकास देशमुख, डॉ ज्ञानेश्वर गव्हाणकर, तसेच संघ स्वयंसेवक बसले होते. तसेच काही डॉक्टर्स वैद्यकिय क्षेत्रातले विद्यार्थीही होते. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर विलक्षण शांतात आणि आत्मीयता. पण या सगळ्यापलीकडे जाऊन मला ‘उरी’ चित्रपटातील वाक्य आठवले ‘हाऊज द जोश..’ हो ! या सगळ्यांमध्ये तो लढाऊ, देशप्रेमाचा जोश होता. तो जोश सांगत होता की आम्ही कोरोनाला हरवणारच, समाजाला कोरोनामुक्त करणारच. या केवळ वल्गना नव्हत्या! कारण, कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीच्या काळातच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रा. स्व. संघाने समाजासाठी काम करायला सुरुवात केली होती. लाखो लोकांना दोन वेळचे अन्न, तितकेच रेशन किट वितरण, औषधी सामुग्रीचे वाटप केले होते. हे सगळे आजही सुरू आहे. इतकेच काय? वस्तीपातळीवर डॉक्टर्सनी दवाखाने का बंद केले? डॉक्टर्सना कोरोनाविरूद्घ लढण्यासाठी ‘पीपीई किट’, ‘हॅण्ड ग्लोव्हस’, ‘मास्क ’पुरसे उपलब्ध नव्हते. रूग्णांना तपासणार तरी कसे? ही अडचण ओळखून संघाने मुंबईतील कोरोना ‘हॉटस्पॉट’ आणि उद्या कदाचित ‘हॉटस्पॉट’ होऊ शकतील अशा वस्त्यातील डॉक्टरांशी बोलणे सुरू केले. त्यांना उत्कृष्ट गुणवत्तेचे ‘पीपीई किट’ आणि इतर साहित्य विनामूल्य वितरीत केले. तुम्ही तुमच्या वस्तीमध्ये पुन्हा दवाखाने सुरू करा, आम्ही सर्व सोबत आहेात असा आत्मविश्वास दिला. त्याचा परिणाम असा झाला की, मुंबईतील ७५४ खासगी दवाखाने ११ नर्सिंग होम पुन्हा सुरू झाले. या कामी विकास देशमुख आणि टीम, तसेच ‘सेवांकुर’ संस्था, ‘निरामय फाऊंडेशन’चे रामेश्वर यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणकर यांनी आणि डॉ. मकरंद शिंदे या संघस्वयंसेवकांनी ‘कम्युनिटी क्लिनिक्स’ही उघडले. अर्थात संघप्रेरणा असेल तिथे काय उणे असणार म्हणा.

 


 
दररोज हजारो लोकांची तपासणी तीही ‘नेहरूनगर’च्या कोरोना ‘हॉटस्पॉट’ वस्तीमध्ये केल्यावर या शिबिरात सहभागी झालेल्या एकालाही एकदाही वाटले नाही का की, सेवा करताना आपल्यालाही कोरोना होऊ शकतो? मग मी का करू? पण छे! या उपक्रमात सहभागी झालेले डॉक्टर्स,‘सेवांकुर’ संस्थेच्या माध्यमातून आलेले वैद्यकीय प्रशिक्षणार्थी यांचे म्हणणे होते की, “साधारण शेकडो वर्षांनी अशी आपत्ती जगावर येते. या आपत्तीकाळात न भीती समाजबांधवांसाठी काम करण्याची संधी पुण्यवंतांना मिळते. आपण या काळात जन्मलो आपण भाग्यवंत आहोत आणि आम्ही कोरोनाला हरवणारच.” ’या कॅम्पचे मुंबई प्रमुख आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक विकास देशमुखने म्हणाले, “आजार कोणालाही होऊ शकतो. पण या आजारावर आपण मिळून लढलो तर त्यावर मात करू शकतो. ‘हा आजार झाला म्हणजे मरणारच’ ही जी भीती लोकांच्या मनात आहे, जो गैरसमज आहे तो दूर व्हायला हवा. व्यवस्थित काळजी घेतली तर या आजाराचा संसर्ग आपण टाळू शकतो. आजारी पडलोच तर व्यवस्थित आणि वेळीच उपचार घेऊन बरेही होऊ शकतो हा आत्मविश्वास लोकांमध्ये येणे गरजेचे आहे. मला वाटते ‘नेहरूनगर’च्या स्क्रिनिंग कॅम्पचे हे यश आहे की आम्ही या कोरोना ‘हॉटस्पॉट ’वस्तीतील २० हजार लोकांची तपासणी करू शकलो. त्यातील ८७ संशयित रूग्णांना वेळीच उपचारासाठी पाठवू शकलो. त्यातील १६ जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आहेत. त्यांना वस्तीतून तात्काळ विलग केल्यामुळे वस्तीपातळीवरील कोरोनाची राक्षसी साखळी आम्ही रोखू शकलो. रामेश्वरजी, मेडिकल ऑफिसर गुलनार मॅडम, विनय सोमणजी, स्थानिक कार्यकर्ते गोपाल, दिनेश देवेंद्र आणि वस्ती कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केले.”

 

 


याच कॅम्पमध्ये ‘सेवांकुर’ संस्थेचे वैद्यकीय १६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. त्यापैकी डॉ. स्वाती कजबजे, डॉ रोहित गुप्ता, डॉ. सागर झा, डॉ काव्या पारेख, रूचिता कडली, सानिका कोटकर यांना भेटले. त्यांच्याशी बोलले. वैद्यकीय प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे समाजभान जागृत राहावे, त्यांनी पुढे जाऊन वैद्यकीय क्षेत्रात काम करताना मानवी संवेदनशीलतेने आणि आत्मियतेने काम करावे यासाठी सेवांकुर संस्था काम करते. औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रूग्णालयाचे सीइओ डॉ. अश्विनीकुमार तुपकरी ‘सेवांकुर’शी संबंधित. ‘सेवांकुर’ संस्थेच्या सागर झा यांच्याशी बोलले. ते म्हणाले, “आमच्यामध्ये खूप शक्ती आहे आम्ही सर्वकाही करू शकतो पण तरीही आम्ही काहीही करू शकत नाही, अशा प्रकारची निराशात्मक स्थिती आम्हा मेडिकल क्षेत्रातील लोकांची झाली होती. समाजासाठी देशासाठी नि:स्वार्थीपणे काम करण्याची सगळ्यांची तयारी आहे. नेहरूनगरच्या कॅम्पमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही काम करू शकत होते. वस्तीपातळीवरील थेट आरोग्य सेवेसाठी आम्ही ‘सेवांकुर’तर्फे गुगल फॉर्म बनवला. शेकडो विद्यार्थ्यांनी यासाठी नामाकंन केले. ‘सेवांकुर’चा जो उद्देश होता की आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींची नाळ समाजाशी जुळावी, तेा उद्देश या कॅम्पमुळे सफल झाला.” सागर आणि विशाल झा तसेच या कॅम्पमध्ये सहभागी झालेले विशी बावशीतली ही मुलं मुली, या सर्वांची सामाजिक तळमळ पाहून वाटले की, ज्या देशाचे युवा इतके संवेदनशील आणि ध्येयशील असतील त्या देशाला कोणतीही महामारी हरवू शकत नाही.

 

 


 
स्वयंसेवक आणि ‘सेवांकुर’चे डॉक्टर्स, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी आपले अनुभव सांगत होते. या सगळ्यांचा अविस्मरणीय अनुभव एकच होता तो असा, तेथील लोकांशी यांचा स्नेहभाव जुळला. पहिल्यांदा तपासणीसाठी लोक घराबाहेर पडत नसत. पण दुसर्‍या दिवसापासून लोक स्वत:हून येऊ लागली. अशातच स्क्रिनिंगचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता हे कार्यकर्ते जाणार दुसर्‍या दिवसापासून दुसरे कार्यकर्ते येणार होते. कार्यकर्ते आपापली टेबल आवरू लागले. इतक्यात काही महिल्या आल्या. “जाते क्या? रूको” असे तोडक्या मोडक्या हिंदीत म्हणू लागल्या. कारण, ही वस्ती तशी तामिळ भाषिकबहुल. कार्यकर्ते संभ्रमात की आता यांनी का थांबवले? थोड्याच वेळात महिला आरतीची थाळी घेऊन आल्या, या सगळ्यांचे औक्षण केले, पीपीई किटवर तिलक लावले आणि पायही धुतले. तुम भगवान हो. आम्हाला वाटले होते आम्हाला पण कोरोना होणार आम्ही सगळे मरणार. पण तुम्ही लोकांनी वाचवले असे म्हणत त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. सगळे कार्यकर्ते,डॉक्टर्स, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अचंबित आणि गदगद झाले. इतके प्रेम इतका आदर आणि स्नेह, समाजाने त्यांना दिला. हा अनुभव सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आज आपण पाहतोय की भलेभले कोरोनाला घाबरून घरी बसलेत, लोकांमध्ये दिसायलाच पाहिजे म्हणून फेसबुक लाईव्ह करतात आणि कोरडे सल्ले देतात. या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवक आज कोरोना ‘हॉटस्पॉट’मध्ये ‘कोरोना योद्धा’ म्हणून लढायला सिद्ध झाला आहे. स्वत:ची पुर्णत: काळजी घेत सेवाकार्य, त्यानंतर काही दिवस विश्रांती, त्या दरम्यान कोरोना टेस्ट करून घेणे अशा दिनक्रमात हे ‘कोरोना योद्धा’ सेवाकार्य करत आहेत. या सार्‍यांना याबद्दलचे प्रशिक्षणही दिले गेले आहे. असो, संघाचे वरिष्ठ पदाधिकारी अतुलजी लिमये, सुमंतजी आमशेकर, विपीन कुमारजी, संजयजी नगरकर, सध्या भाजपचे महाराष्ट्र संघटनमंत्री असलेले पण स्वयंसेवक असलेले विजयराव पुराणिकजर हे हा कॅम्प सुरळीतपणे सुरू झाला नाही तोपर्यंत जातीने या कोरोना ‘हॉटस्पॉट’ वस्तीमध्ये स्वयंसेवकांसोबत उपस्थित होते. स्वत: व्यवस्थेमध्ये लक्ष घालत होते. नाहीतर कार्यकर्त्यांना आपत्ती काळात ‘तुम लढो हम कपडा संभालते है’ असे म्हणणारे खूप जण असतात. मात्र, रा. स्व. संघाच्या वरिष्ठांनी स्वयंसेवकांचे आणि या शिबीराचेही पालकत्व तेवढेच यशस्वीपणे निभावले. या सगळ्यांसाठी शब्दच नाहीत.. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती...

 
‘के वेस्ट’ वॉर्डमधील काही कोरोनाबाधित रूग्ण मृत्यू पावले. प्रत्येकवेळी मनाला वाटत असे की जर या कोरोनाबाधित रूग्णांची ओळख वेळीच झाली असती तर कदाचित त्यांचे आणि त्यांच्या संपर्कातील इतरांचेही नुकसान वाचले असते. अशातच निरामय फाऊंडेशनआम्हाला वस्तीमध्ये स्क्रिनिंगसाठी मदत करायला तयार झाली. तसेही कोणताही उपक्रम, योजना जर लोकांसाठी असेल तर ती लोकसहभागाशिवाय अपूर्णच असते. त्यामुळे निरामय फाऊंडेशन’ तसेच संघाचे संजय नगरकर, विकास देशमुख, अंधेरीचे आमदार अमित साटम आणि वस्तीतील सेवाभावी लोकांच्या सहकार्याने आम्ही ‘नेहरूनगर ’वस्तीचे स्क्रिनिंग सुरू केले. सुरूवातीला असे दृश्य होते की प्रशासन,लोकं कोरोनाच्या पाठी पळत होतो. पण आता आम्ही कोरोनाच्या पुढे जाऊन कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो असा आत्मविश्वास आला.

 

 


- विश्वास मोटे, सहआयुक्त के वेस्ट वॉर्ड

मुंबईत कोरोनाने कहरच माजवला. आम्हालाही वाटायचे की, पुण्यासारखे मुंबईतही काम सुरू करावे. आता समाजाला आपली गरज आहे. त्याचवेळी नेहरूनगर वस्तीमध्ये काम सुरू झाले. जास्तीत जास्त अभाविप कार्यकर्त्यांना या उपक्रमामध्ये जोडावे अशी ‘अभाविप’चा पदाधिकारी म्हणून माझ्यावर जबाबदारी होती, तसेच वस्तीपातळीवर शिबीर सुरू असताना प्रत्यक्ष नियोजन, व्यवस्था यामध्येही काम करण्याची जबाबदारी होती. ‘युथ फॅार नेशन’ आणि ‘एबिवीपी फॅार सोसायटी’ हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मंत्र आहे. हा मंत्र जगत असल्याची अनुभूती मला येत आहे.

 

 


- अनिकेत ओव्हाळ, अभाविप राष्ट्रीय मंत्री

 

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.