चीन सीमेवरील परिस्थितीचा संरक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा

26 May 2020 19:37:29


rajnath singh_1 &nbs



नवी दिल्ली :
लडाख परिसरात चीनकडून सुरू असलेल्या आगळीकीसंदर्भात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी आढावा घेतला. यावेळी चीन सीमेवर सैन्य वाढविण्यासोबतच तेथील बांधकामेही सुरु ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत झाल्याचे समजते.



चीनकडून सध्या लडाख सीमेवर आगळीक करण्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय सैन्य चीनच्या आगळीकीस चोख प्रत्युत्तर देत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, वायुसेनाप्रमुख आर.के.एस.भदौरिया आणि नौदलप्रमुख करमबीर सिंह यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला.


यावेळी भारतीय सैन्याकडून चिनी सैन्याच्या कारवायांना देण्यात आलेले प्रत्युत्तर, चीन सीमेवरील सद्यस्थिती, सीमावर्ती भागात भारत करीत असलेली पायाभूत सुविधा आणि अन्य बांधकामे यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी चीन त्यांच्या सैनिकांची वाढवित असलेली संख्या पाहता भारतीय सैनिकांचीदेखील संख्या वाढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. मात्र, भारतीय सैनिक आहे तेथेच राहतील, अशी भूमिका घेतानाच चीनसोबत चर्चेद्वारे मार्ग काढण्यावर बैठकीत एकमत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनप्रमाणे नेपाळनेही भारताविरोधात भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी झालेल्या डोकलाम प्रकरणी भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून चीनकडून सातत्याने आगळीक केली जात आहे. त्यासाठी आता नेपाळचा वापरही चीनकडून होत आहे.
Powered By Sangraha 9.0