दिलासादायक : दादरमधील ८२ वर्षीय आजींची कोरोनावर मात!

26 May 2020 19:17:42

corona_1  H x W



शेजाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात केले आजींचे स्वागत!



मुंबई : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. रोज अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. अनेक मृत्यूदेखील होत आहेत. मात्र या कोरोनारुपी संकटावर मात करून परतणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. मुंबईतल्या दादर भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक बातमीने सगळ्यांनाच आनंद झाला आहे. दादरमध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय आजी कोरोनावर मात करत, पुन्हा घरी परतल्या आहेत.


या आजीबाई भाऊ आणि भावासोबत दादर येथील प्लाझा परिसरात वास्तव्यास होत्या. ७ मे रोजी संध्याकाळी त्यांचा भावाचा मृत्यू झाला होता. त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने आजींना आणि त्यांच्या वहिनींना धारावी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्या दोघींचीही कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने १२ मे रोजी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर चाचणी अहवाल नकारात्मक आल्याने सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी परतल्यानंतर शेजाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आजींचे स्वागत केले. या आजाराला न घाबरता वेळेवर उपचार घेतल्यास व प्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोरोना पूर्णतः बरा होऊ शकतो, याचेच हे उत्तम उदाहरण आहे.



Powered By Sangraha 9.0