राष्ट्रपती राजवट लागू करा ! महाविकास आघाडी सरकारला 'नारळ' द्या!

25 May 2020 18:05:43
Rane  _1  H x W





मुंबई : 'महाविकास आघाडी सरकारला नारळ द्यावा, राष्ट्रपती राजवट लागू करावी, मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांच्या ताब्यातील रुग्णालये लष्कराकडे सुपूर्द करावी, राज्याची हाताबाहेरील परिस्थिती लक्षात घेता केंद्राने हस्तक्षेप करावा', अशी प्रतिक्रीया भाजप राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. सोमवारी दिवसभरात शरद पवार यांच्या पाठोपाठ राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नारायण राणे ठरल्या वेळेनुसार, सायंकाळी ४.३० वाजता राजभवनावर पोहोचले. त्यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रीया देताना त्यांनी ही मागणी केली आहे. 

राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत जी काही आश्वासने दिली त्यापैकी कुठलेही वचन पाळले नाही. आत्तापर्यंस सर्व मदत केंद्राकडून मिळालेली आहे. हे सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नाचता येईना अंगण वाकडे, अशी स्थिती सध्याच्या सरकारची आहे. पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत, हे आमचे सरकार नाही मग काँग्रेसचे मंत्री आहेत ते कुठल्या सरकारमधील आहेत."

राज्य सरकार अपयशी ठरत आहे, कोकण असो किंवा उर्वरित महाराष्ट्र तिथल्या कोरोना रुग्णांची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे केंद्राने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाही, त्यांच्याकडे राज्याला महसूल उभा कसा करावा याबद्दल कुठलीच योजना नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.






Powered By Sangraha 9.0