पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून 'ही' गावे वगळू नका; 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'चे पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020   
Total Views |
tiger_1  H x W:
 
 
 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश

 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावे वगळू नयेत, असे विनंतीपर पत्र 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' प्रशासनाने लिहले आहे. हे पत्र वन्यजीव विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले जाणार आहे. या गावांमध्ये 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' आणि 'राधानगरी अभयारण्या'चे गाभा (कोअर) व झालर (बफर) क्षेत्र, तसेच तिल्लारी ते राधानगरी अभयारण्यादरम्यान असलेल्या वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. 'मुंबई तरुण भारत'ने (महा MTB) या गावांच्या बाबतीत दिलेल्या बातमीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने वन्यजीव विभागाकडे त्यासंदर्भात खुलाशाची मागणी केली होती.
 
 
 
 
(३८८ गावांमधील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण गावांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील बातमीवर क्लिक करा)
 
 
 
 
गेल्या आठवड्यात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबत व्हिडीओ काॅन्फरन्सव्दारे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राबाबत राज्य सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी २०९२ गावांची अंतिम यादी प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला. ही यादी गेल्या सरकाराच्या काळातच तयार करण्यात आली होती. मात्र, नव्या सरकारने त्यामध्ये छाणणी न करता ती प्रस्तावित केली. वगळलेल्या ३८८ गावांमध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव भ्रमणमार्गाच्या (वाघ-हत्ती) अनुषंगाने महत्त्वाच्या गावांचा समावेश होता. शिवाय वगळलेल्या गावांमध्ये 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' आणि 'राधानगरी अभयारण्या'च्या गाभा व बफर क्षेत्रातील गावे देखील होती. या गावांचे महत्त्व अधोरेखित करणारी बातमी 'महा MTB'ने गुरुवार, दि. २१ मे रोजी प्रकाशित केली. त्यानंतर या बातमीत नमूद केलेल्या गावांबाबतचे वास्तव सत्यापित करण्याची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने वन्यजीव विभागाकडे केली. यावर 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' प्रशासनाने पत्राव्दारे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करुन त्यांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून न वगळण्याची विनंती केली आहे. हे पत्र 'महा MTB'ला मिळाले आहे.
 
 
 

tiger_1  H x W: 
 
 
 
या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ गावांचा समावेश होतो. तर बफर क्षेत्रात याच जिह्यातील ८४ गावे समाविष्ट आहेत. या गावांमधील ११ गावांचा समावेश पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमध्ये करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी ते राधानगरीदरम्यान असलेल्या वाघ व हत्तींच्या भ्रमणमार्गातील १६ महत्त्वाच्या गावांचा समावेश वगळण्याच्या यादीत केला आहे. त्यामुळे अशा एकूण २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशी विनंती आम्ही वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केल्याची माहिती 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'चे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांनी 'महा MTB'ला दिली. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' आणि 'राधानगरी अभयारण्या'च्या गाभा व बफर क्षेत्रात येणारी ११ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळली तरी, त्यांना अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत लाभलेलासंवदेनशील क्षेत्राचा दर्जा अबाधित राहणार आहे. मात्र, तिल्लारी ते राधानगरी दरम्यानच्या वाघ व हत्तींच्या भ्रमणमार्गातील गावांना केवळ पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्राचे संरक्षण लाभले आहे. अशा परिस्थितीत ही गावे वगळ्यास त्याचा परिणाम या भागातील वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षणावर होईल. त्यामुळे या पट्ट्यातील १६ गावे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामधून न वगळण्याबाबतची विनंती केल्याचे गुजर यांनी सांगितले. दशकभरापासून सह्याद्रीमध्ये व्याघ्र अधिवासावर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी ही यादी तयार करण्यास तांत्रिक सहाय्य केले.  यासंदर्भात आम्ही राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पश्चिम घाट संवदेनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमधील वन्यजीवांसंदर्भातील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीवांच्या अनुषंगाने महत्त्वाची असणाऱ्या गावांची यादी आम्ही मंगळवारी पाठवणार आहोत.
 
 
 
 
२७ गावांची नावे पुढील प्रमाणप्रमाणे :
 
 
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र - कोल्हापूर शाहुवाडी तालुक्यातील निवळे (गाभा क्षेत्र), उदगिरी (बफर क्षेत्र) आणि सांगली शिराळा तालुक्यातील मणदूर (बफर क्षेत्र)
 
 
 
व्याघ्र संवर्धन आराखडा - केंद्राने २०१३ साली मंजूर केलेल्या व्याघ्र संवर्धन आराखड्यामधील वाघांच्या भ्रमणमार्गात कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ गावांचा समावेश होतो. त्यामधील कोल्हापूर शाहुवाडी तालु्क्यामधील मानोली, धनगरवाडी, येळवणजुगाई
 
 
राधानगरी अभयारण्य क्षेत्र - कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील सावर्दे, रामणवाडी, पाटपन्हाळा, पडसाळी
 
 
राधानगरी अभयारण्य पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र - राधानगरी तालुक्यातील पडसाळी
 
 
तिल्लारी ते राधानगरी वन्यजीव भ्रमणमार्ग - कोल्हापूर चंदगड तालुक्यातील भोगोली, पिलानी, कानुर खुर्द आणि सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील असनिये, बाबळाट, दाभिल, कोणास, देगवे, फणसवडे, केसारी, आंबेगाव, कुणकेरी, माडखोल, पाडवेमाजगाव, सारमाले, तांबोळी
 
 
@@AUTHORINFO_V1@@