नाट्याभिनयाचा 'साक्षी'दार प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

actor sakshi vyavhare_1&nहौशी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील भूमिका गाजविणार्‍या साक्षी रवींद्र व्यवहारे यांच्याबद्दल...अहमदनगर शहराला ऐतिहासिक वारशासोबतच लाभली आहे ती मोठी नाट्यचळवळ. येथील हौशी रंगभूमीने नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देत त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला. प्रेक्षकांनीही त्यांच्या कलेला भरभरून दाद दिली. अशाच एका हौशी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील भूमिका गाजविणार्‍या साक्षी रवींद्र व्यवहारे यांच्याबद्दल जाणून घेऊया.

खरंतर भविष्यात आपण एका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा एक भाग असू असे साक्षीला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. नाटकांमध्ये अभिनय करावा, ही साक्षीची शालेय जीवनापासूनची इच्छा. परंतु, शालेय स्नेहसंमेलनात तिला नाटकात काम करण्याची संधी मिळाली नाही. घरात नाट्यकलेची कोणतीही परंपरा नसताना जे काही करायचं, ते स्वतःच्या हिंमतीवरच. शालेय शिक्षण पूर्ण होताच साक्षीने २००३मध्ये पेमराज सारडा महाविद्यालयात प्रवेश घेतला. नाट्यक्षेत्रात काम करायचे या निश्चयावर ठाम राहत मिळेल त्या संधीचे सोने करायचे ठरविले. सुरुवातीला मिळेल ती भूमिका करायची, हे ठरवून साक्षीने रंगभूमीवर आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. २००३ साली सारडा महाविद्यालयातील १५ते १७ जणांच्या गटाने एकत्र येत ‘अल्फा करंडक’ स्पर्धेसाठी नाटकाच्या तालमी सुरु केल्या. साक्षीने अभिनय केलेले हे पहिलेच नाटक. बारावीत असताना तिने ‘जांभूळवाही’ या नाटकात भूमिका साकारली. या नाटकातील तिच्या भूमिकेबद्दल सांगताना ती म्हणाली की, “हे नाटक केले त्यावेळी मी केवळ १८ वर्षांची नवोदित कलाकार आणि मी साकारलेले पात्र होते ६०वर्षाच्या वयस्कर महिलेचे.” एकूणच काय तर मिळेल ती भूमिका स्वीकारत त्या भूमिकेला न्याय देत साक्षीची रंगभूमीशी नाळ अधिक घट्ट होत गेली. महाविद्यालयात असताना तिने ‘खोटं नाटक’, ‘माधुरीचा राम नेने’, ‘अनोळखी ओळख’, ‘तदैव लग्नम’, ’आधे-अधुरे’, ‘विभावंतर’ यांसारख्या एकांकिकामध्ये सहभाग घेतला. तिची मेहनत आणि एखाद्या भूमिकेसाठी जीव ओतून काम करण्याची तयारी बघता तिला अनेक वेगवेगळ्या भूमिका, नवनवीन प्रयोगाच्या संधी मिळत गेल्या. यातूनच तिने स्वतःला घडविले आणि शहरातील नाट्यक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. पुढे ‘रंगकर्मी प्रतिष्ठान’ या नगरच्या नावाजलेल्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून साक्षीने ‘विच्छा माझी पुरी करा’ हे व्यावसायिक नाटक केले. या नाटकाचे तब्बल ७५ व्यावसायिक प्रयोग झाले. पुढे ‘२६/११ ’, ‘तो येणारेय’, ‘स्मशानयोगी’, ‘कोणी घर देता का घर’, ‘शापित’, अलीकडेच राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेले नाटक ‘बाईपण’ यांसारख्या नाटकांतून राज्यनाट्य स्पर्धेत विविध भूमिका साकारल्या आणि पारितोषिकेही मिळवली.


sakshi theater_1 &nb
आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरील सदानंद देशमुख लिखित ‘बारोमास’ या कादंबरीच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमात साक्षीने ‘शेवंता माय’ ही भूमिका साकारली. साक्षीचा हा कार्यक्रम प्रचंड गाजला. या नभोनाट्याचे 50 भाग आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते. या अभिवाचनातील ‘शेवंता माय’ने संपूर्ण जिल्ह्यातील श्रोत्यांच्या मनात घर केले. ‘बारोमास’ कादंबरीचे लेखक सदानंद देशमुख यांनी त्यावेळी साक्षीचे कौतुक करताना ‘साक्षी ही माझी आईच वाटली’ अशा शब्दांत तिच्या कार्याची प्रशंसा केली.
sakshi theater_1 &nbनाटक आणि रंगभूमी कलाकाराला घडवते तर चित्रपट, मालिका आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकता. न्यू आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असताना साक्षीने ‘नंदी’, ‘पाणी’, ‘जाहिरात’, ‘कोयना’, ‘चव’, ‘टरफल’ यांसारख्या लघुपटांतून मध्यवर्ती भूमिका साकारल्या. तिने पुण्याच्या ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) लघुपटांमधूनही अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्यापैकी अनेक लघुपट हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजले व पारितोषिकास पात्र ठरले. साक्षीने रंगभूमीबरोबरच मोठा पडदाही गाजवला. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या २०१३साली प्रदर्शित झालेल्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटात साक्षीने ‘धुरपा’ ही जब्याच्या बहिणीची भूमिका साकारली. या चित्रपटाने अनेक जागतिक आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळविले. ‘गणवेश’, ‘राक्षस’, ‘भॉ’, ‘चिवटी’, ‘नऊ पूर्णांक अकरा दशांश’ यांसारख्या चित्रपटांतून भूमिका साकारल्या. साक्षी केवळ अभिनेत्रीच नाही तर उत्तम नृत्यांगनाही आहे. नृत्यशिक्षिका सुरेख डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भरतनाट्यम’ या नृत्यप्रकारात गांधर्व कला महाविद्यालयांतून ’नृत्यविशारद’ पूर्ण केले. शालेय जीवनात अभिनयाची आवड असूनही संधी न मिळालेल्या साक्षीने उच्चशिक्षण घेताना समोर आलेल्या अभिनयातील प्रत्येकच संधीचं सोनं केला. यावेळी शांत न बसता तिने आपली नृत्याची आवड जोपासायचे ठरविले.ग्रामीण भागातून अभिनय क्षेत्राकडे वळणार्‍या तरुणांची संख्या आज वाढते आहे. या तरुणांनी केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता आपला पाया पक्का करावा. मोठ्या पडद्यावरही आज या तरुणांसाठी अनेक संधी आहेत. फक्त त्यासाठी मिळेल ती भूमिका आणि काम करण्याची जिद्द तुमच्यात असावी, असे साक्षी सांगते. आज मराठी चित्रपटांतून रोजच्या जगण्यातले विषय, सामाजिक परिस्थिती हाताळणारे कथानक उत्तमपणे हाताळले जात आहेत. येत्या काळात हेच विषय सर्वसामान्यांच्या जाणीवा जागरूक करण्यास हातभार लावतील यात शंका नाही. रंगभूमी, चित्रपट, आकाशवाणी, एकांकिका आणि लघुपट यांसारख्या सर्वच माध्यमातून प्रभावी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणार्‍या साक्षी रवींद्र व्यवहारेला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!
@@AUTHORINFO_V1@@