अभिनयाची सात्विक मूर्ती

    दिनांक  23-May-2020 22:53:18
|

sulochna didi_1 &nbs


हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा प्रदीर्घ काळ ज्यांनी ’याचि देही याचि डोळा’ जगला अशा फार थोड्या दिग्गज कलाकारांपैकी एक. आपल्या सोज्ज्वळ, निरागस अभिनयाद्वारे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या साक्षात प्रेमस्वरूप आई अर्थात दीदी सुलोचना लाटकर...


मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात महाराष्ट्र दिनानिमित्त एक विलक्षण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज व ज्येष्ठ अभिनेत्री यांचा सन्मान होणार होता. मी या कार्यक्रमाचा साक्षीदार होतो, याचा मला आजही अभिमान वाटतो. याच कार्यक्रमात तेव्हा माझी भेट अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वाशी झाली की, ती भेट मी कधीच विसरू शकत नाही. त्यांना उपजत लाभलेले सोज्वळ सौंदर्य आणि अतिशय भावदर्शी चेहरा या बाबींमुळे त्यांना चरित्र अभिनेत्रीच्या अप्रतिम भूमिका सादर करण्याची संधी मिळाली. प्रेमळ सोशीक आई, सालस बहीण, समजूतदार वहिनी या त्यांनी सादर केलेल्या व्यक्तिरेखा कसदार अभिनयासाठी वाखाणण्यात आल्या. शालीनता, सात्त्विकता व भूमिकेशी समरस होण्याची वृत्ती, अपार कष्ट करण्याची मानसिकता, अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटसृष्टीत अजरामर झाल्या. त्या भूमिका लीलया निभावणार्‍या दिग्गज अभिनेत्री म्हणजे सुलोचना लाटकर.प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२९या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील खडकलाट गावी झाला. सुलोचनादीदींविषयी शोधायला गेलं तर नाव समोर येतं सुलोचना लाटकर! खरं तर, ते ना त्यांच्या माहेरचं नाव आहे ना सासरचं. ते नाव आहे त्यांच्या गावाचं! त्यांचे पाळण्यातील नाव रंगू. त्यांच्या आईचे नाव तानीबाई आणि वडिलांचे नाव शंकरराव दिवाण होते. त्यांचे बालपण जन्मगावी खडकलाट येथे व्यतीत झाले. फौजदार असलेल्या शंकररावांनी सुलोचनादीदींच्या लहानपणापासून आवडी-निवडी जोपासल्या. गावातील तंबूमध्ये दाखविले जाणारे अनेक चित्रपट त्यांनी त्याकाळी पाहिले आणि याच काळात त्यांच्या मनात अभिनयाची व कलेची आवड रुजली. लहानपणीच त्यांचे आईवडील निवर्तले व नंतर त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या मावशी बनुबाई लाटकर यांनी केला. या मावशीला त्यांच्याबद्दल एवढा विश्वास होता की ही मुलगी नाव काढणार! त्यामुळे तिच्याबरोबर आपल्या गावाचं नावही मोठं होऊ दे, म्हणून त्यांनी तिचं आडनाव लावलं ‘लाटकर.’ मावशीचा अंदाज खरा ठरला. त्या मुलीनं खरोखरच नाव काढलं आणि त्या मुलीबरोबर गावाचं नावही मोठं झालं. अमर झालं!मास्टर विनायक यांनी आपल्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या संस्थेत सुलोचना यांना सुरूवातीच्या म्हणजे १९४३साली ‘ज्यूनियर आर्टिस्ट’ म्हणून नोकरीस घेतले. १९४३साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’च्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून सुलोचनाजींनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पहिल्यांदा छोटीशी भूमिका साकारली. त्यांची भाषा सुरुवातीच्या काळात ग्रामीण ढंगाची होती. त्यामुळे त्यांना बरेचदा टीका सहन करावी लागत असे. याच सुमारास त्यांचा परिचय लता मंगेशकर यांच्याशी झाला व त्यांनी सुलोचनादीदींना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षण अवघं चौथीपर्यंतच झालं असलं तरी सुलोचनादीदींनी चित्रपटसृष्टीत आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले आहे.दरम्यानच्या काळात सुलोचनाबाईंचा परिचय कोल्हापूरमधील प्रभाकर स्टुडिओचे मालक आणि चित्रमकर्षी भालजी पेंढारकर यांच्याशी झाला. भालजींनीच त्यांचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण ‘सुलोचना’ असे केले व हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. दिग्दर्शक भालजी पेंढारकरांना गुरुस्थानी मानून त्यांनी त्यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले. चित्रीकरणासाठी पुण्यात आल्यावर चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात त्यांनी भरपूर वाचन केले. नागरी भाषा आत्मसात करुन उच्चारशुद्घीसाठी संस्कृत श्लोकांचे पठण देखील केले. १९४९च्या सुमारास प्रदर्शित झालेल्या भालजींच्या ‘मीठभाकर’ व ‘जिवाचा सखा’ या चित्रपटांतील सुलोचना यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले. ‘वहिनीच्या बांगड्या’ या चित्रपटातील त्यांची अविस्मरणीय भूमिका खूपच गाजली. त्यांची रुपेरी पडद्यावर सात्त्विक, सोज्वळ, वात्सल्याची प्रतिमा अशी ओळख निर्माण झाली व त्यामुळे त्यांच्या अभिनय-कारकिर्दीला नवे वळण लाभले. ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ या मराठीत गाजलेल्या चित्रपटावरुन हिंदीतील ‘औरत ये तेरी कहानी’ या चित्रपटासाठीही त्यांचीच निवड केली गेली. हिंदी भाषेवर त्यांनी विलक्षण प्रभुत्व मिळविले.


सुलोचनाबाईंनी २५०पेक्षाही अधिक मराठी चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा सादर केल्या. यामध्ये त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट म्हणजे ‘साधी माणसं’, ‘बाळा जो जो रे’, ‘दूध भात’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘मोलकरीण’, ‘एकटी’, ‘वर्‍हाडी आणि वाजंत्री’, ‘प्रपंच’, ‘धाकटी जाऊ सांगत्ये ऐका’, ‘आहेर’, ‘ओवाळणी’, ‘सुखाचे सोबती’, ‘भिंतीला कान असतात’ या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या व त्यांना राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. मराठीत सर्वाधिक चित्रपटांतून त्यांनी नायिकेची भूमिका, तर उर्वरित चित्रपटांतून वहिनी, आई, सासू, अशा चरित्र-व्यक्तिरेखा साकारल्या. ‘भाऊबीज’ या चित्रपटासाठी ‘चाळ माझ्या पायात’ ही सुलोचनादीदींनी सादर केलेली लावणी आणि ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटासाठी त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका तर इतकी लक्षवेधी ठरली की, प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेले आदराचे स्थान अधिकच बळकट झाले. अभिनेत्री सुलोचना यांनी सुमारे १५०हिंदी चित्रपटांमधून चरित्र-अभिनेत्री सोबतच आईच्या भूमिका साकारुन, त्या लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवल्या आहेत. ‘सुजाता’ या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच लक्षणीय ठरली. त्याचशिवाय ‘झुला’, ‘नयी रोशनी’, ‘बंदिनी’, ‘मेरा घर मेरे बच्चे’, ‘कटी पतंग’, ‘मैं सुंदर हुं’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘साजन’, ‘देवर’, ‘संघर्ष’, ‘अब दिल्ली दूर नही’, ‘काला धंदा गोरे लोग’, ‘सरस्वती चंद्र’, ‘आयी मिलन की बेला’, ‘आदमी’, ‘प्रेमनगर’ चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या.१९४३ साली हिंदी चित्रपटसृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसर्‍या पिढीबरोबर व त्यानंतर, कपूर घराण्याच्या तिसर्‍या पिढीतील रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही सहकलाकार म्हणून त्यांनी काम केले आहे.मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवणार्‍या सुलोचनाजींना आजपर्यंत शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम पुरस्कार’, केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या ‘पद्मश्री’ किताबाने १९९९साली, तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणार्‍या ‘चित्रभूषण पुरस्कारा’ने २००३ रोजी सन्मानित करण्यात आले. त्यांना उपजत लाभलेले सोज्वळ सौंदर्य आणि अतिशय भावदर्शी चेहरा या जमेच्या बाबींमुळे त्यांना चरित्र अभिनेत्रीच्या अप्रतिम भूमिका सादर करण्याची संधी मिळाली


दीदींना भेटलं की असे सुंदर किस्से ऐकायला मिळतात. तिथे क्षुद्र उखाळ्यापाखाळ्याच काय, आत्मचरित्रात्मक आठवणींना आणि भूतकाळालाही थारा नसतो. त्यांनी मराठीतल्या किती जणांना काय काय मदत केली, हे जगजाहीर आहे. त्यांच्या निखळ चांगुलपणाचा उल्लेख करायलाच हवा. त्यामुळे आणि माणसांच्या लळ्यामुळेच आयुष्याच्या नव्वदीपर्यंत येणं जमलं असणार त्यांना! पण, सगळ्या चांगल्या गोष्टींत एक अपूर्णता असते, तशी इथेही आहेच. शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा असलेल्या सुलोचनादीदींनी असंख्य भूमिका मनात कोरून ठेवल्या आहेत. त्यांनी गुजराती, भोजपुरी चित्रपटांतही काम केलंय. त्यांना चित्रपटनिर्मितीचीही इच्छा होती. मात्र, बाबांनी ‘नाही’ सांगितल्यानं त्यांनी ते धाडस केलं नाही. दिग्दर्शन करावंसंही त्यांना वाटत होतं. ते शिकायला तेवढा वेळ मिळाला नाही. त्या म्हणाल्या, “ज्या भूमिका मिळाल्या त्यांनीच मला मोठं केलं. मी स्वतःला भाग्यवान समजते. जिजाऊ साकारायचं माझं स्वप्न तर पूर्ण झालं, पण, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, पानिपतावर गेलेल्या सदाशिवरावभाऊंच्या पत्नी पार्वतीबाई आणि स्मृतिचित्रं लिहिणार्‍या लक्ष्मीबाई टिळक यांच्या भूमिका साकारायची खूप इच्छा होती.” नव्वदाव्या वर्षांनंतर इतकी अद्भुत स्मरणशक्ती व ही प्रामाणिक वृत्ती ठेवायला किती जणांना जमत असेल? अशा मनस्वी प्रेमळ सुलोचनादीदींना खरोखर मानाचा मुजरा!

- आशिष निनगुरकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.