शिलालेखांमध्ये ‘आर्य’

23 May 2020 21:13:32


ARYA SHILALEKH_1 &nb


प्राचीन भारतीय वाङ्मयात आर्य शब्द एखाद्या वंशाचा वाचक नव्हे, तर सद्गुणांचा वाचक म्हणूनच सगळीकडे वापरला गेल्याचे मागच्या लेखात आपण पाहिले. इतिहासाच्या अनेक संशोधकांना असे वाङ्मयीन संदर्भ पुरावाया अर्थाने मान्य नसतात. त्यांना भौतिक पुरावेलागतात. भौतिक पुरावे म्हणजे विविध शिलालेख, स्तंभलेख, ताम्रपट, नाणी, राजपत्रित अस्सल कागदपत्रे, इत्यादि. त्यांच्याही समाधानासाठी असे काही निवडक भौतिक पुरावे आता या लेखात आपण पाहूया.




HATHIGUINFA_1  

 

खारवेल राजाचा हाथीगुंफा शिलालेख


प्राचीन कलिंग म्हणजे आताचा ओरिसाचा प्रदेश. इथे पूर्वी
खारवेल’ (इ.स.पूर्व दुसरे शतक) नावाचा एक पराक्रमी आणि नीतिमान राजा होऊन गेला. ओरिसामध्ये भुवनेश्वरजवळ उदयगिरी नावाच्या डोंगररांगेत खंडगिरी नावाचा एक डोंगर आहे. त्यावर हाथीगुंफा नावाच्या एक गुहेत खारवेलाची प्रशंसा करणारा एक दीर्घ शिलालेख सापडतो. याची लिपी मौर्यकालीन ब्राह्मी’, तर भाषा मागधी प्राकृतआहे. त्यामध्ये खारवेलाच्या बालपणापासून ते त्याच्या राज्याभिषेकानंतर त्याने काय काय पराक्रम केले आणि लोककल्याणाची कामे केली, त्यांचे तपशीलवार वर्णन आहे. त्यातले सर्व तपशील आपण आत्ता इथे पाहणार नाही, इच्छुकांनी ते मुळातूनच वाचणे योग्य होईल. पण आपल्या विषयापुरता मर्यादित मजकूर इथे आपण पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच मंगलाचरणात राजमुकुट आणि स्वस्तिक चिह्ने आहेत. त्यानंतर पुढचा मजकूर आहे. नमो अरहंतानं | नमो सव सिधानं || ऐरेण महाराजेन महामेघवाहनेन चेतिराजवंसवधनेन पसथसुभलखनेन चतुरंतलुठणगुणउपितेन कलिंगाधिपतिना सिरिखारवेलेन पंदरसवसानि सीरिकडारसरीरवता कीडिता कुमारकीडिका ||”




अर्थ
: अर्हतांना नमस्कार असो. सर्व सिद्ध पुरुषांना नमस्कार असो. महामेघवाहनकुळात जन्मलेला, ‘चेदिवंशाची वृद्धी करणारा, ज्याच्या गुणांची कीर्ती चारी दिशांना पसरली आहे, जो उत्तम शुभलक्षणांनी युक्त आहे, कलिंगाचा अधिपती आहे, अशा आर्यमहाराज खारवेलाने वयाच्या पंधरा वर्षांपर्यंत बालसुलभ क्रीडा केली.इथे खारवेल राजाचा उल्लेख आर्यम्हणून केला आहे. भारताच्या अगदी पूर्वेला असलेला कलिंग आणि तिथले महामेघवाहन कुळ यांचा उल्लेख करताना मध्य-आशियातून इराणमार्गे भारतात भटकत आलेले उपरे लोकअशा अर्थाने केलेला असण्याची शक्यता अगदीच शून्य आहे. थोर’, ‘श्रेष्ठ’, ‘सद्गुणीअशा अर्थानेच हा शब्द वापरलेला लक्षात येतो.



जुनागढ शिलालेख_1 &nb

रुद्रदामन राजाचा जुनागढ शिलालेख

 


सम्राट चंद्रगुप्त मौर्याने (इ. स. पूर्व चौथ्या शतकाचा उत्तरार्ध) सौराष्ट्र (गुजरात) मध्ये गिरिनगर (गिरनार) येथे एक
सुदर्शननावाचे धरण बांधले. पुढे इ.स.च्या दुसऱ्या शतकात, म्हणजे त्यानंतर सुमारे साडेचारशे वर्षांनी, ते धरण जोराचा पाऊस पडून पूर आल्याने फुटले. तत्कालीन शकराजा रुद्रदामन्याने मग आपला सौराष्ट्रातला अमात्य सुविशाखयाच्या करवी त्याची दुरुस्ती करून घेतली आणि ते अजून मजबूत केले. हा सगळा इतिहास जुनागढ येथे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका शिलालेखात आढळतो. इ.स.च्या दुसऱ्या शतकातला हा रुद्रदामन राजाचा शिलालेख. याची लिपी ब्राह्मीआणि भाषा संस्कृतआहे. याच्या शेवटी अमात्य सुविशाख याचे वर्णन केले आहे: अमात्येन सुविशाखेन यथावदर्थ-धर्म-व्यवहार-दर्शनैरनुरागमभिवर्धयता शक्तेन दान्तेनाचपलेनाविस्मितेन आर्येण आहार्येण स्वधितिष्ठता धर्म-कीर्ति-यशांसि भर्तुरभिवर्धयतानुतिष्ठितमिति |”



अर्थ
: अमात्य आहार्य (प्रांताधिकारी) आर्यसुविशाख हा धार्मिक आणि व्यावहारिक बाबतीत चोख कारभार ठेवून लोकांचे प्रेम वाढवणारा, समर्थ, शांत, दृढनिश्चयी आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त होता. त्याने हे (धरणाच्या दुरुस्तीचे) काम पूर्ण करून आपल्या स्वामीचे पुण्य, कीर्ति आणि यश वृद्धिंगत केले.राजांचे विशेषण असंख्य ठिकाणी आर्य म्हणून आलेले आपण मागे पाहिलेच, पण इथे त्याचा सेवक अमात्य सुद्धा आर्यच आहे. त्याचे पुढचे सद्गुणी कारभारीम्हणून केलेले वर्णन बघता इथेही आर्य शब्द गुणवाचकच असल्याचे दिसते.



नागर्जुनी _1  H

वीरपुरुषदत्त राजाचा नागार्जुनीकोंडा स्तंभलेख


आंध्रप्रदेशात गुंटुर जिल्ह्यात मन्चेरिअलजवळ नागार्जुनसागर येथे एक संगमरवरी स्तंभावर कोरलेला शिलालेख आहे. इ.स.च्या तिसऱ्या शतकात तिथला इक्ष्वाकुवंशीय राजा वीरपुरुषदत्त याने हा लेख कोरवून घेतला. याची लिपी
ब्राह्मीआणि भाषा प्राकृतआहे. त्यानुसार : पंणगामवथवानं दीघ-मझिम-पंदमातुक-देसक-वाचकानं अचरयान अयिरहघान अंतेवासिकेन दीघ-मझिम-निगय-धरेन भदन्तानंदेन निठपितं इमं नवकमं महाचेतीयं खंभा च ठपिता |”


अर्थ
: पर्णग्रामात राहणारे, दीर्घ-मध्यम इत्यादि पाच मूळ ग्रंथ (बौद्ध त्रिपिटक पाच निकाय ग्रंथ) वाचणारे आणि शिकवणारे जे आचार्य आहेत, त्यांच्यासाठी आणि आर्यसंघासाठी, दीर्घ-मज्झीम निकाय ज्याला पाठ आहेत अशा भदंत आनंद नामक शिष्याने हा नवीन चैत्य आणि हा स्तंभ स्थापन केला.हा लेख नागार्जुनसागर इथला, अर्थातच दक्षिण भारतातला आहे. परंतु तरीही इ.स.च्या तिसऱ्या शतकात इथल्या लोकांना आर्यशब्दाचे वावडे असल्याचे दिसत नाही! इतकेच नव्हे, तर तिथल्या एका स्थानिक बौद्ध संघाचे नावही आर्यसंघअसल्याचे इथे दिसते! बौद्धमतात आर्यशब्दाचे स्थान आपण मागच्या लेखात पाहिले. तीच गोष्ट इथे पुन्हा एकदा अधोरेखित होते.



अलाहाबाद _1  H

सम्राट समुद्रगुप्ताचा अलाहाबाद स्तंभलेख


अलाहाबाद येथील किल्ल्यात मूळचा कौशाम्बी (कोसम) येथून आणलेला एक अशोकस्तंभ आहे. त्यावर गुप्त सम्राट समुद्रगुप्त (इ.स.चे चौथे शतक) याच्या प्रशंसेचा एक लेख आहे. याची लिपी
ब्राह्मीआणि भाषा संस्कृतआहे. हा बराचसा पद्यमय आणि बाकी गद्य आहे. यातला चौथा श्लोक असा आहे : आर्यो हीत्युपगुह्य भावपिशुनैरुत्कर्णितै: रोमभि:, सभ्येषूच्छ्वसितेषु तुल्य-कुलज-म्लानाननोद्वीक्षित: | स्नेहव्यालुळितेन बाष्पगुरुणा तत्त्वेक्षिणा चक्षुषा, य: पित्राभिहितो निरीक्ष्य निखिलां पाह्येव मुर्वीमिति ||”


अर्थ
: बरोबरीच्या कुलोत्पन्न व्यक्तींनी ज्याला खिन्नपणे पाहिले, सभासदांनी ज्याला पाहून आनंदाचे नि:श्वास सोडले, ‘आर्य (योग्य / श्रेष्ठ) आहेअसे म्हणून पित्याने ज्याला पुलकित होऊन मिठी मारली, त्या समुद्रगुप्ताला प्रेमभावनेने आणि अश्रुपूर्ण अशा नजरेने पाहत पित्याने पृथ्वीचे पालन करम्हणून आज्ञा दिली.इथे सम्राट समुद्रगुप्ताचा जन्मदाता पिता (चंद्रगुप्त - पहिला) त्याला आर्य आहेसअसे म्हणत आनंदाने मिठी मारताना मध्य आशियातून भटकत आलेल्या लोकांच्या वंशाचा आहेस”, असे म्हणत असल्याची शक्यता आपल्याला कितपत वाटते?


तात्पर्य


प्राचीन आणि मध्ययुगीन सुद्धा अनेक शिलालेख
, ताम्रपट, दानपत्रे, राजाज्ञा, इत्यादि साधनांमध्ये हा आर्यशब्द असा जागोजागी आढळतो. हा शब्द केवळ वाङ्मयापुरता आणि साहित्यिकांपुरता मर्यादित राहिलेला नसून सर्वसामान्य लोकांनी सुद्धा व्यवहारात थोरपणा आणि गुणीपणा दाखवण्यासाठी स्वीकारलेला दिसून येतो. फक्त राजेच नाही, तर त्यांचे मंत्री, अमात्य, व्यापारी-श्रेष्ठी, दान देणारे (दाते), दान घेणारे (प्रतिगृहीते), अशा सर्वच जणांसाठी आर्य शब्दाचा वापर या भौतिक साधनांमध्ये सुद्धा आढळतो. हे शिलालेख म्हणजे शब्दश: दगडावरच्या रेघाअसतात. या अशा सहजासहजी मिटत नाहीत, अनेक सहस्रके सहजपणे टिकतात. या रेघा भविष्यातही शतकानुशतके विद्वत्तेच्या या क्षेत्रातली पाश्चात्त्यांची ही भामटेगिरी जगाला ओरडून ओरडून सांगत राहतील.

- वासुदेव बिडवे

(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -

अर्थात भारतविद्याअथवा प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

Powered By Sangraha 9.0