लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री जुही चावलाचा शेतकऱ्यांना मदतीचा हात!

    दिनांक  22-May-2020 14:39:51
|
Juhi Chawala_1  

भूमिहीन शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली स्वतःची जमीन!


मुंबई : देशावर पसरलेला कोरोनाचा अंधःकार दूर कारणासाठी अनेक कलाकार सामान्य नागरिकांना, गरजूंना मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेत्री जुही चावलानेदेखील या मदत कार्याला हातभार लावण्याचा निर्णय घेतला असून तिने तशी घोषणा केली आहे. स्वतःची जमीन नसलेल्या शेतकऱ्यांना तिने मोठा आधार दिला आहे.


मुंबईपासून जवळ असलेली स्वतःची शेतजमीन जुहीने शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. या शेत जमीनीवर तज्ज्ञांची एक टीम जैविक शेतीचा अभ्यास करत होती. ही जमीन आता भूमिहीन शेतकाऱ्यांना कसण्यासाठी देण्यात येणार आहे.


याबाबत बोलताना जुहीने सांगितले की,’सध्या संपूर्ण देश समस्येत आहे. सगळ्याच स्तरांतून मदतीचा ओघ सुरु आहे. मी सुद्धा माझ्या वाटचे मदत कार्य करणार आहे. या शेतजमिनीत अनेक प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात. हवामानानुसार इथे पिक घेता येईल. अन्न धान्य पिकवता येईल. यात जे काही उगवेल त्याचा काही भाग शेतकरी स्वतःसाठी ठेवून उर्वरित इतरांना मदतीसाठी वापरू शकतील. पूर्वी आमच्याकडे याच जमिनीवर शेती केली जायची. शेतकऱ्यांनी इथे शेती केल्यास त्याचा त्यांना आणि इतरांना फायदाच होईल’, असे तिने म्हंटले आहे. जुहीच्या या निर्णयामुळे चाहत्यांकडून तिचे कौतुक केले जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.