कोरोनाचा जीवघेणा थरार, सत्ताधारी फरार

    दिनांक  22-May-2020 19:43:42
|adv ashish shelar_1 


मुंबई : मुंबईत कोरोनाचा जीवघेणा थरार, महापालिका उलटीपालटी, सत्ताधारी फरार अशा शब्दात भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. ८० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या श्रीमंत मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करत मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या विरोधात भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपने
महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आज राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त केला. भाजप नेते माजी मंत्री आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम येथील त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारचा निषेध केला. तर तसेच वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, भाजप समर्थक यांनी आपापल्या घराच्या अंगणात, परिसरात उभे राहून आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.आमदार आशिष शेलार म्हणाले की
, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ते रोखण्यास राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. तसेच या राज्यातील शेतकरी, गरीब कष्टकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत या सरकारने केलेली नाही, त्यासाठी पॅकेज जाहीर करा, यासाठी आमचे आंदोलन आहे. मुंबई महापालिकेच्या कारभाराविषयी आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, 80 हजार कोटीचा ठेवी असलेल्या श्रीमंत मुंबई महापालिकेचा कारभार उघडा पडला आहे. रुग्णांची अवस्था अत्यंत वाईट असून नर्स नाहीत, ॲम्बुलन्स नाहीत, डॉक्टर नाहीत, हॉस्पिटलमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, अशा अवस्थेत मुंबईकरांना सोडून पालिकेतील सत्ताधारी फरार आहेत, असे दुर्दैवी चित्र मुंबईत पाहायला मिळते आहे. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईकरांचा आवाज पालिकेतील सत्ताधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आंदोलन केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमचे आंदोलन सामान्य माणसाला, सामान्य मुंबईकराला ज्या वेदना होत आहेत, त्या वेदना मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी, सामान्य माणसाचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितलेदरम्यान
, सामनातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार शेलार म्हणाले की, दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी, भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे? अशा शब्दात शेलार यांनी पत्रपंडितांना तोडीस तोड उत्तर दिले. सत्तेची फळे खायची, त्याच झाडाची मुळे खणायची! त्यांची अशीच गत व्हायची! आता बोलून नाही, महाराष्ट्रात करून दाखवा, असेही शेलार यांनी सुनावले!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.