संभ्रमावस्था काय कामाची?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020
Total Views |


BMC_1  H x W: 0


कोणतेही युद्ध जिंकायचे तर लढवय्यांचे मन खंबीर पाहिजे. विजय कोणाचा आणि पराभव कोणाचा, हे रणनीतीवर आणि योद्ध्यांच्या मनोबलावर अवलंबून असते. म्हणून योद्ध्यांचे मनोबल सतत उंचावण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. पण, सध्या त्याचीच शासनात उणीव आहे. यापूर्वीचे महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या डोक्यावरचा भार हलका व्हावा, त्यांचे केवळ आरोग्यसेवेवरच लक्ष राहावे म्हणून रुग्णालयांमधील तांत्रिक आणि प्रशासकीय उणिवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पालिकेतीलच अधिकार्‍यांची सीईओम्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी कोरोनाचा हल्ला सुरू झाला. त्या हल्ल्याला तोंड कसे द्यायचे याची व्यूहरचना परदेशी यांनी केली. त्यांचे आरोग्ययोद्धेकोरोनावर खोलवर चढाई करत असतानाच परदेशी यांची सेनापतीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. कारण काय होते, तर शीव रुग्णालयात मृतदेहाच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ.



विरोधकांनी आपले काम केले असले तरी अशावेळी सत्ताधार्‍यांनी
, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना भक्कम पाठबळ देणे आवश्यक होते. कारण, कोरोनाविरोधातील लढ्याचा पाया परदेशी यांनी रचला होता. लातूर भूकंप असो, वा सांगली महापूर; तेथील लोकांचे जनजीवन सुरळीत करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या परदेशी यांनी कोरोनाच्या गुणाकाराच्या साखळीने मुंबईत रुग्णांचा आकडा किती जाईल, याचा अंदाज बांधूनच बीकेसी मैदानातील रुग्णालय आणि नेस्कोतील क्वारंटाईन सेंटरउभारण्याचे काम सुरू केले. मात्र, ही कामे पूर्णत्वास येत असतानाच परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. खरेतर आरोग्याला महत्त्व देणार्‍या परदेशी यांनी कोरोनाला हरवण्याचा चंगच बांधला होता. पण बदलीमुळे नाराज झालेले परदेशी लगेचच 14 दिवसांच्या रजेवर गेले. सरकारने आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी आत्मचिंतन केल्यास परदेशी यांच्यानंतर मुंबईत कोरोना जास्त फोफावलेला दिसेल. त्यामुळे योद्ध्यांची पळापळ होताना दिसत आहे. त्यांना जबरदस्तीने (नोटिसा देऊन) लढायला भाग पाडले जात आहे. त्यांच्या डोक्यावर आता आयएएस अधिकारी आणून बसविले जात आहेत. अशा व्यूहरचनेमुळे कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकता येईल का? संभ्रमावस्थाच पराभवाला आमंत्रण देणारी ठरु शकते.



पराभूत मानसिकतेच्या दिशेने...


कोरोना ही जागतिक महामारी आहे. हे संकट केवळ महाराष्ट्रावर किंवा एकट्या मुंबईवर कोसळलेले नाही. महासत्ताही कोरोनापुढे हतबल झालेल्या आहेत. अशा वेळी सर्वांना सोबत घेऊन या संकटाचा मुकाबला करता आला पाहिजे. मात्र
, राज्य सरकारमध्ये त्याचीच उणीव आहे. सत्ताधारी म्हणून नोकरशहांच्या मदतीने आपणच कोरनाशी लढा देत आहोत आणि विरोधक निव्वळ दोष दाखवायचे काम करत आहेत, असे चित्र राज्यकर्त्यांकडून रंगवले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 18 पक्षांच्या प्रमुखांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स (बैठक) घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानातून बोलत होते, तर इतर पक्षांचे प्रमुख मंत्रालयात जमले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना, “काय सांगू ? कसे सांगू? तुम्हीच माझे जवान! तुम्हीच कोरोनाला हरवायचे आहे!असे अनेकदा भावनिक आवाहन केले. आता मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिमंडळातील सर्वच सहकारी विरोधकांवर आणि केंद्र शासनाकडे बोट दाखवू लागले आहेत. बुद्धिबळाच्या पटात राजा, वजीर यांच्याबरोबरच प्याद्यांनाही महत्त्व असते. तसे राजकारणाच्या पटावरही आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर आता सर्वच बोलू लागले आहेत. विकास कामे आणि एखाद्या संकटाविरोधातला नियोजनबद्ध लढा ही सत्ताधार्‍यांची जमेची बाजू असते. मात्र, महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांत सगळेच वाचाळवीर होत चालले आहेत.



जयंत पाटील हे उत्तम राजकारणी आहेत. मात्र
, त्यांना आता सत्ताधारी असल्याचा विसर पडलेला दिसत आहे. काहीतरी बोलून विरोधकांना डिवचण्याचे काम ते करत आहेत. जयंत पाटील म्हणतात की, “काही लागले तर आम्हाला सांगा. सारखे राज्यपालांना भेटून त्यांना त्रास देऊ नका.मंत्री यशोमती ठाकूर यांनीही आता केंद्र सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे. त्याच वेळेस जयंत पाटील यांनी मुंबईत जूनपर्यंत रुग्णसंख्या 40 हजारांपर्यंत पोहोचेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. सत्ताधार्‍यांच्या वाचाळतेने कोरोनाला आवरघालण्याचा प्रश्न बाजूला राहतो. वाचाळतेने ते लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधार्‍यांची ही कोरोनाविरोधातील पराभूत मानसिकता आहे. जबाबदार या नात्याने त्यांनी कोरोनाविरोधातील लढा अधिक मजबूत करावा, हे उत्तम!

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@