'महाराष्ट्र बचाव' आंदोलनात लाखो नागरिकांचा सहभाग

    दिनांक  22-May-2020 21:19:09
|

maharashtra bachao_1 


निष्क्रीय राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाच्या  कार्यकते व राज्यभरातील  स्थानिक नागरिकांसह एकूण पावणे नऊ लाख लोक आंदोलनात सहभागी मुंबई :  कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आणि सामान्य माणूस हतबल. अशा स्थितीतही निष्क्रीय असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अडीच लाख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘माझे अंगण, रणांगण’, अशी घोषणा देत ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे हे अभिनव आंदोलन केले.कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यातील महाविकास आघाडीच्या निष्क्रीयतेमुळे सामान्य माणूस हतबल झाला आहे. अशा स्थितीत राज्य सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाला जनतेकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामळे जनतेतील तीव्र अस्वस्थता स्पष्ट झाली आहे. पक्षाच्या सुमारे अडीच लाख कार्यकर्त्यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबिय आणि स्थानिक नागरिकांसह एकूण पावणे नऊ लाख लोक या अभिनव आंदोलनात सहभागी झाले. पक्षाकडे सायंकाळी उशीरा बूथ, तालुका व जिल्हा शाखांकडून सविस्तर अहवाल आले. त्यातून समोर आलेली आकडेवारी अशी : राज्यातील एकूण ५७२ पक्षीय मंडलांमधील ६५,५६५ बूथमध्ये आंदोलन झाले. एकूण १६०१६ गावे किंवा केंद्रांमध्ये कार्यकर्ते व स्थानिक लोक सहभागी झाले. एकूण अडीच लाख कुटुंबांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांसह सहभागींची संख्या ८,७५,४८७ झाली.maharashtra bachao_1 देवेंद्र फडणवीस मुंबई येथे म्हणाले की, राज्यात कोरोनाचे गंभीर संकट असताना राज्य सरकारची निष्क्रियता दिसत आहे. रुग्णांना उपचार मिळत नाहीत. रुग्णालये शोधत रस्त्यावर फिरावे लागत आहे. सरकारी रुग्णालयात जागा नाही आणि खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत. सर्व महानगरांमध्ये कोरोनाचा कहर आणि राज्य सरकारकडून पुरेशी तयारी नाही. मुंबईतील आव्हान पेलण्यासाठी ठोस पावले नाहीत. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी जनतेसाठी पॅकेज दिले पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्वतःहून जनतेला एक पैसा दिलेला नाही. शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक अशा सर्वांसाठी राज्य सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले पाहिजे.maharashtra bachao_1 


चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हे आंदोलन सरकार अस्थिर करण्यासाठी नाही. लोकांच्या वेदना मांडण्याला कोणी राजकारण म्हणत असले तरी आम्ही वेदना मांडणार. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन घराबाहेर पडले तर यंत्रणा हलेल आणि परिणामकारक काम होईल. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला त्याला साठ दिवस झाले पण राज्यातील सरकार प्रभावी काम करत नाही. भाजपा सहकार्य करतानाच या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहे.


देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, आ. राहुल नार्वेकर, माजी आ. राज पुरोहित मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालय येथील आंदोलनात सहभागी झाले होते. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे कुटुंबियांसोबत आंदोलन केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (दहिसर, मुंबई), माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर (चंद्रपूर), एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर, जळगाव ), पंकजाताई मुंडे (वरळी, मुंबई), गिरीश महाजन (जामनेर), राधाकृष्ण विखे पाटील (लोणी), विजया रहाटकर, हरिभाऊ बागडे व भागवत कराड (औरंगाबाद), रविंद्र चव्हाण (डोंबिवली ), आशिष शेलार (वांद्रे), गिरीश बापट (पुणे), सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख व जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), राम शिंदे (चौंडी), जयकुमार रावल (धुळे), कपिल पाटील (भिवंडी), पूनम महाजन (विलेपार्ले), गोपाळ शेट्टी (बोरिवली) यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, खासदार व आमदारांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी हे आंदोलन केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.