ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णालयाबाहेर वृद्धाचा तडफडून मृत्यू !

    दिनांक  22-May-2020 15:23:50
|
Thane BJP Poster _1 


नारायण पवार यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष, कारवाईची मागणी


ठाणे : शहरात कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका व रुग्णालयांची व्यवस्था सपशेल फोल ठरत असताना किड्यामुंग्याप्रमाणे माणसाचा जीव जात असताना आंदोलन करू नये का ?, पोट दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहावा का ?, असा प्रश्न भाजपतर्फे विचारण्यात आला. गेले दोन दिवस या गोष्टीची पुरेपूर प्रचिती आली. ठाण्यात वागळे इस्टेट भागांत राहणाऱ्या एका वृद्धाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. दोन दिवस रुग्ण तात्कळत होता. जागेअभावी त्याला रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिला. सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 


पाचपाखाडीच्या रुग्णालयात आणल्यानंतर सामान्य कक्षात ठेवायचे कि अतिदक्षता विभागात न्यायचे, असा प्रश्न डॉक्टर आणि आरोग्य प्रशासनाला पडला होता. त्यातच उपचार वेळीच न मिळाल्याने वृद्धाने रुग्णालयाबाहेर प्राण गमवावे लागेल. भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. अपुऱ्या सोयी, भोंगळ कारभार, रुग्णांची रुग्णालया आवाराबाहेरची तडफड याबद्दल काहीच बोलायचे नाही का ?, असे म्हणत आंदोलन करायची ही वेळ नाही, असे म्हणणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 

किड्यामुंग्यांसारखे तडफडत आहेत रुग्ण !
ठाण्यात शांतीनगर येथे राहणाऱ्या एका ७० वर्षांच्या रुग्णाची प्रकृती अचानक खालावली. सलग दोन दिवस ताप येत होता. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांच्या मुलाने महापालिकेकडे रुग्णवाहिका मागवून दाखल करून घेण्याची विनंती केली. दरम्यान, प्रशासनाने काहीही कळवले नाही. रुग्ण अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या मुलाने रुग्णालयात फोन केला. मात्र, रुग्णालयातून आलेले उत्तर सुन्न करणारे होते. महापालिकेच्या डॉ. कोर्डे यांनी फोन केल्याशिवाय आम्ही कोणालाही दाखल करून घेणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी नगरसेवक नारायण पवार यांनी डॉ. कोर्डे यांच्याशी संपर्क साधून, रुग्णालयात वृद्धाला दाखल करण्याची देण्याची विनंती केली.


अखेर पाचपाखाडी येथील एका रुग्णालयात रात्री नऊच्या सुमारास सामान्य कक्षात जागा असल्याचे महापालिकेतून सांगण्यात आल्यावर रुग्णाला तेथे नेण्यात आले. मात्र, त्याला लगेचच दाखल करून न घेतल्याने त्यांची प्रकृती बिघडत होती. काही काळानंतर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज असल्याचे कबुल केले. मात्र, आमच्याकडे जागा नसल्याने तुम्ही दुसरीकडे जा असा सल्ला दिला. दरम्यान, उपचाराअभावी रुग्ण तडफडून मृत पावला. नगरसेवक नारायण पवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दखल घेण्याची मागणी केली आहे.पालकमंत्री शिंदेसाहेबांनी लक्ष घालूनही फरक पडत नाही !
इटलीमध्ये रस्त्यावर मृत्यू झाल्याचे चित्र आपण वृत्तवाहिन्यांमार्फत पाहिले होते. मात्र, अशीच स्थिती आता ठाण्यातही दिसू लागणार की काय अशी भीती नागरिकांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला खडसावले. होते मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. शहरातील रुग्णवाहिकाही रुग्ण आणण्यास पोहोचत नाहीत. त्यामुळे 'कोरोना सेल' नक्की काय काम करतो, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ठाण्यासारख्या ठिकाणी अशी अवस्था असेल नागरिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नगरसेवक पवार यांनी दिला आहे.रुग्णवाहिका नसल्याने रुग्णला घरी पाठवले नाही

ठाण्यात सध्या रुग्णावाहिकांची संख्या अचानक कमी झाली आहे. रुग्णांची ने आण करायची कशी, असा प्रश्न आहे. पाचपाखाडीतील एका रुग्णालयात गुरुवारी चार रुग्ण बरे होऊन घरी जाण्यासाठी तयार होते मात्र, त्यांना घरी पाठवण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकाच नसल्याने ते खितपत पडून होते. बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका अशामुळे वाढू शकतो, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे. खासगी रुग्णवाहिकेतून जाण्यासाठी तब्बल १५ ते २० हजार आकारण्यात येत आहे. या रुग्णाना घरी पाठवता न आल्याने अन्य कोरोना रुग्णांना जागेअभावी दाखल करून घेणे शक्य नाही. महापालिका व रुग्णालय यांच्यात समन्वय राहिलेला नसल्याचेही या पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.Narayan pawar _1 &nb

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.