कोव्हिड योद्ध्यांना ‘वंदे मातरम’ व्हिडीओद्वारे मानाचा मुजरा!

21 May 2020 16:32:56
Vande Mataram_1 &nbs


सलील कुलकर्णी यांचे संवेदनशील संगीत; आर्या आंबेकरचा भावपूर्ण आवाज

मुंबई: ‘कोविड’ या अनपेक्षित अशा जागतिक महामारीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण आपापल्यापरीने सामाजिक जाणीव व्यक्त करत इतरांना मदत करत आहे. या महासंकटाच्या काळात ज्यांना ‘कोविड योद्धे’ म्हटले जाते ते पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय सेवक यांचे योगदान मोठे आहे. हे सर्व स्वतःच्या जीविताला असलेला धोका पत्करून आपल्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढावे व त्यांना मनाचा मुजरा करावा म्हणून भारतातील मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात निर्माते आणि परसेप्ट लिमिटेडचे संस्थापक, बॉस एन्टरटेन्मेंट, सनबर्न कार्यक्रम आदींची सुरुवात करणारे शैलेंद्र सिंग आणि उद्योगपती ऋषी सेठिया यांनी एकत्र येवून एक मानवंदना लघुपट निर्माण केला आहे. प्रख्यात संगीतकार सलील कुलकर्णी यांनी तो संगीतबद्ध केला असून आघाडीची पार्श्वगायिका आर्या आंबेकर हिने त्यातील ‘वंदे मातरम’ गीत गायले आहे.


हा दोन मिनिटांचा व्हीडीओ म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला मानवंदना असून त्यात मुंबईतील पोलिसांचे विविध मूड आणि सेवेतील क्षण टिपले गेले असून त्या ज्या कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत आहेत, त्याचे चित्रण आहे. ‘वंदे मातरम’च्या धुनीवर हा व्हिडीओ चित्रित झाला असून त्याचे संगीत संयोजन प्रख्यात संगीतकार, गायक व कवी सलील कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे. ‘सारेगामा मराठी लिटल चॅम्पस्’ गाजवलेली आजची आघाडीची पार्श्वगायिका आर्या आंबेकर हिच्या आवाजामुळे या मानवंदना चीत्राफितीला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. या चित्रफितीचे संकलन मनन कोठारी यांनी केले आहे.


या चित्रफितीचे लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र सिंग यांनीच केले आहे. या चित्राफितीबद्दल ते म्हणतात, “महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस जे काम करत आहेत, त्याची झलक पूर्ण भारताला देण्याचा माझा मानस यामागे आहे. हे शूरवीर आज घरी जावू शकत नाहीत किंवा कुटुंबाला वेळ देवू शकत नाहीत. या व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण जगातील भारतीयच आपल्या या पोलिसांना मानवंदना देत आहेत.”



Powered By Sangraha 9.0