स्थलांतरित मजुरांची व्यथा मांडणाऱ्या ‘कच्चे दिन’ लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

    दिनांक  21-May-2020 17:30:27
|

kacche din_1  Hयुट्यूबच्या माध्यमातून होणार चित्रपटाचे प्रदर्शन!


मुंबई : आज कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मजुरांचा प्रश्न आणि त्यांचे स्थलांतर ऐरणीवर आले असताना प्रख्यात बॉलीवूड दिग्दर्शक, निर्माते शैलेंद्र सिंग यांचा याच विषयावर बेतलेला चित्रपट ‘कच्चे दिन’ युट्युब चॅनेलवरून शुक्रवारी २२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. एका स्थलांतरित टॅक्सी ड्रायव्हरची ही कथा असून त्यात मुंबईच्या अनेक छटा टिपल्या गेल्या आहेत. ‘कच्चे दिन’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला.


दोन वेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळेल एवढे तुटपुंजे कामावणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका प्रख्यात अभिनेता दीपक दोब्रीयालने केली असून यात एक अगदी वेगळी अशी खिळवून ठेवणारी कथा साकारली गेली आहे. शहरातील विविध छटांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या स्थलांतरित टॅक्सीचालकाचा एका पोलिसाशी, एका दलालाशी आणि त्याच्या मैत्रिणीशी सामना होतो. त्याच्या टॅक्सीमध्ये राहिलेल्या एका टिफीनच्या माध्यमातून आयुष्य बदलून टाकणाऱ्या अशा एका घटनेला तो समोर जातो. काहीशी गुंतागुंतीची पण खिळवून ठेवणारी ही कथा उत्तरोत्तर अधिकाधिक रंजक बनत जाते. त्याचबरोबर मुंबई या ‘मॅक्झीमम सिटी’चे अर्धे कच्चे अंगही चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. त्यामुळे प्रत्येक मुंबईकर आणि वेगळ्या कथेची आस असलेल्या चित्रपटरसिकांनी पहावाच, असा हा लघुपट आहे.


दीपक दोब्रीयालबरोबरच यशपाल शर्मा, अश्रूत जैन, टीना सिंग आदींच्या भूमिकाही या लघुपटात आहेत. या लघुपटाने अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये वाहवा मिळविली आहे. २०१८ दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाला प्रोत्साहनपर विशेष महोत्सव पारितोषिक मिळाले होते. २०१८ च्या ‘नॉर्दन व्हर्जिनिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट फॉरेन फिल्म’ आणि ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हे पुरस्कार मिळवले आहेत. ‘व्हर्जिन स्प्रिंग सिनेफेस्ट’मध्ये लघुपटाला ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ हा बहुमान मिळाला होता. या चित्रपटाचा प्रीमिअर प्रेक्षक www.youtube.com/shailendrasinghfilms या युट्युब वाहिनीवरून २२ मे रोजी दुपारी १२ वाजता पाहू शकणार आहेत.


या चित्रपटाची निर्मिती केलेले शैलेंद्र सिंग हे त्यांच्या अनेक पुरस्कारविजेत्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आज सर्वत्र स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र ही कथा या मायानगरीत पाय घट्ट रोवून जीवनाचा लढा देणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरची आहे. परसेप्ट पिक्चर्सची स्थापना करणाऱ्या आणि ‘मकडी’, ‘पेज थ्री’, ‘ढोल’ यांसारखे ७० हूनही अधिक गाजलेले चित्रपट देणाऱ्या शैलेंद्र सिंग यांचा चित्रपट असल्याने या वर्ल्ड प्रीमियरबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.