उबरनंतर ओलानेही केली १४०० कर्मचाऱ्यांची कपात

20 May 2020 14:58:41

OLA_1  H x W: 0


कोरोना संकटामुळे कंपन्यांना आर्थिक तोटा


मुंबई : ऑनलाईन कॅब सर्व्हिस देणाऱ्या ‘ओला’ कंपनीने कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे १४०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या दोन महिन्यांत कंपनीचा महसूल ९५ टक्क्यांनी खाली घसरला आहे. याबाबत सांगताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या दोन महिन्यांत राईड्स, वित्तीय सेवा व अन्न व्यवसायातून येणारे कंपनीचे उत्पन्न ९५ टक्क्यांनी कमी झाले आहे आणि यामुळे १४०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे कंपनीने ठरवले आहे.


अग्रवाल यांनी कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये हे स्पष्ट केले की व्यवसायाचे भविष्य ‘अत्यंत अस्पष्ट आणि अनिश्चित’ आहे आणि ‘निश्चितच या संकटाचा परिणाम आपल्यावर दीर्घकाळ होईल.’असे त्यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले, "विषाणूचा परिणाम विशेषत: आमच्या उद्योगावर मोठ्याप्रमाणात झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत आमची कमाई ९५ टक्क्यांनी घटली आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे या संकटाचा परिणाम आमच्या कोट्यवधी वाहनचालक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनावर झाला आहे.’


याआधी ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी ‘उबर’ने देखील ३००० लोकांना नारळ दिला आहे. मे महिन्यात कर्मचाऱ्यांसह उबरने जवळपास ४५ ऑफिस बंद करण्याची घोषणादेखील केली.
Powered By Sangraha 9.0