खुशखबर ! आयपीएल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता

    दिनांक  20-May-2020 18:30:47
|

IPL_1  H x W: 0
मुंबई : सध्या लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आले. तरी काहीठिकाणी लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली आहे. अशामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे यासाठीदेखील उपाययोजना करण्यात येत आहेत. अशामध्ये आयपीएल २०२०च्या आयोजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये आता एक चांगली बातमी आली असून आयपीएल या वर्षाच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत खुद्द बीसीसीआयच्या सदस्यानेच दिले आहेत. यामुळे क्रीडाप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
 
 
भारताचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले. आयपीएलसाठी कोणता कालावधी हा चांगला असेल, याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. आयपीएल स्पर्धा ही २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीमध्ये खेळवण्यात येऊ शकते, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. तरीही अद्याप याबाबत बीसीसीआयने अधिकृतरित्या या माहितीची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
 
“यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ही स्पर्धा जर झाली नाही तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आयपीएल स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. पण त्यासाठी भारतातील वातावरण नेमके कसे आहे, हे पहिल्यांदा पाहावे लागणार आहे. भारतामध्ये क्रिकेट कधी सुरु होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. कदाचित या गोष्टीला दोन किंवा चार महिनेही लागू शकतात. भारतातील परिस्थितीवर ते अवलंबून असेल. पण जर स्पर्धा खेळवायची झाली तर त्यासाठी मानसीकरीत्या सक्षम असणे गरजेचे आहे.” अशी माहिती अंशुमन गायकवाड यांनी दिली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.