लोकगीत गायिका मालती कुडू यांचे निधन

    दिनांक  20-May-2020 11:36:14
|
malti kudu_1  H

‘वसईचा नाका’, ‘या वडाला विळा कोणी मारलाय गं’ यासारख्या ठसकेबाज गाण्यांसाठी त्या होत्या प्रसिद्ध!


खानिवडे : ‘वसईचा नाका’, ‘या वडाला विळा कोणी मारलाय गं’ अशा ठसकेबाज गाण्यांच्या गायिका मालती मधुकर कुडू यांचे हृदयविकाराने १९ मे रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ठाण्यातील गोडबोले इस्पितळात नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरु असताना त्यांची प्राण ज्योत मावळली. वसई तालुक्याच्या पूर्व भागातील नवसई गावच्या रहिवाशी असलेल्या मालती मावशी सद्ध्या वाडा येथे राहत होत्या.


वसई तालुक्यातील नवसईसारख्या एका छोट्याश्या गावात राहून ग्रामीण ठासाच्या लयबद्ध गाणी गाणाऱ्या गायिका मालती मधुकर कुडू या त्यांच्या आवाजातील ‘वसईचा नाका नाक्यावर धक्का’, ‘या वडाला विळा कोणी मारलंय ग’ आदी गाण्यांसह खास गौरी गणपतीच्या ठसकेबाज गीतांच्या कॅसेट खूप प्रसिद्ध झाल्या. ग्रामीण भागात महिलांमध्ये फेर धरून नाचताना गाण्यात येणाऱ्या गीतांना आपल्या कर्ण मधुर आवाजाने साज चढवून कोकणपट्ट्यासह पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळवली. त्यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत .


त्यांचे वैशिष्ठय म्हणजे त्यांनी अनेक ग्रामीण गीते स्वतः रचली, स्वतःच साज चढविला व स्वतःचा आवाजही दिला. त्यांच्या आवाजातील गीते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, हौस मौजेच्या कार्यक्रमात, लग्न समारंभात, गौरी गणपतीच्या उत्सवात रात्र जागर करताना ऐकली जातात. तर त्यांच्या खास ठेक्याच्या ध्वनिफीत गाण्यावर नाच केला जातो. रेती वाला नवरा पाहिजे फेम जगदीश पाटील , गायक अनंत पांचाळ आदींसह त्यांनी आपला आवाज सर्वदूर पसरवला. एका शेतकरी कुटुंबातील बेताचे शिक्षण असणाऱ्या मालती बाईंचा प्रासंगिक पण उद्बोधक गाणी स्वतः रचून चाल लावण्यात व चढ्या आवाजाच्या ठसक्यात गाण्याचा हातखंडा होता. त्यांच्या जाण्याने रसिक एका ग्रामीण गायिकेला मुकले आहेत. अत्यंत हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्या आगरी, कोळी, कुणबी, वाडवळ व भंडारी समाजासह आदिवासी विभागात सुपरिचित होत्या. मालती कुडू यांच्या जाण्याने वसई पूर्व भागात शोककळा पसरली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.