ऐन लॉकडाऊनमध्ये सीकेपी बँकेचा परवाना रद्द!

02 May 2020 11:50:20

\CKP Bank _1  H



सीकेपी बँकेचा तोटा वाढल्यामुळे आरबीआयचा दणका


मुंबई : सीकेपी सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने मोठा दणका दिला आहे. या बँकेचा परवाना गुरुवारी रात्री अचानक रद्द करण्यात आला. यामुळे बँकेतील ११ हजार ५०० ठेवीदारांच्या ४८५ कोटींच्या ठेवी संकटात आल्या असून सुमारे १ लाख २० हजार खातेदारांनाही याचा मोठा फटका बसला आहे.


दादरमध्ये मुख्यालय असलेल्या सीकेपी बँकेचा १०३ वर्षांचा इतिहास आहे. सीकेपी बँकेचा तोटा वाढल्यामुळे आणि रोख मूल्यात मोठी घट झाल्याने बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयने २०१४ मध्ये निर्बंध घातले होते. त्यानंतर या बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी ठेवीदारांनीही प्रयत्न केले. २०१५ मध्ये बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींचे भागभांडवलात रुपांतर केले. तरीही निर्बंध कायम आहेत. अन्य बँकांप्रमाणे बँकेला आर्थिक मदत मिळाल्यास बँक वाचू शकेल, यासाठी सरकारला अनेक पत्रे पाठविण्यात आली. ठेवीदारांच्या अनेक प्रयत्नांमुळे मार्च २०२० अखेरपर्यंत बँक नफ्यात आली. मात्र संचित तोटा असल्याने बँकेचा ताळेबंद तोट्यात दिसतो. पण वास्तवात बँक पुनरूज्जीवन होण्याच्या स्थितीत नक्कीच आहे. यामुळे ठेवीदारांवर रिझर्व्ह बँकेने अन्याय केल्याचे बँकेच्या ठेवीदार फोरमचे अध्यक्ष व माजी संचालक राजू फणसे यांनी सांगितले.


दरम्यान, २०१४ पासून बँकेवरील निर्बंधांना आरबीआय मुदतवाढ देत आहे. आताच ३१ मार्चला मुदतवाढ दिली होती. ती ३१ मे रोजी संपणार होती. त्याआधीच आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला.
Powered By Sangraha 9.0