सेवेचे ठाई तत्पर...

    दिनांक  02-May-2020 00:18:11
|

Police Pune_1   
 
 
आपल्यासाठी झगडणारे हे देवदूत पाहून, नकळत हात जोडले जातात. ऊर अभिमानाने भरून येतो. विपरीत परिस्थितीत राहूनही सतत आपल्या संरक्षणासाठी कंबर कसून उभ्या असलेल्या या वीरांसाठी आपल्याला सध्या आपल्या घरी राहून, सहकार्य करायचे आहे. “सद् रक्षणाय खल निग्रहणाय” हे ब्रीद प्राणपणाने जपणाऱ्या या देवदूतांचे मनापासून आभार!!!

गेल्या ४० दिवसांहून अधिक काळ आपण सर्व विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत. दैनंदिन व्यवहारच नाही तर आयुष्यच थबकून गेलं आहे. दररोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आणि संक्रमित झालेल्यांचे आकडे वाचून मन सुन्न होत आहे. त्यातच, देवदूतासारखे म्हणून काम आणि सद्य परिस्थितील आपले आधार असलेल्या पोलीस, डॉक्टर, स्वच्छतादूत, यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या, आजारी व्यक्तींची पुरेशा व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे होणारी अडचण पाहून, विषन्नता अजून वाढत आहे.
तरीही रोज फेसबुक, इन्स्टासारख्या सोशल मीडियामुळे आपल्या सारख्यांचा वेळ सुसह्य जात आहे. अनेक घरांमधून नवनवीन पाककृती करण्याची चढाओढ लागल्याची भासत आहे. हे सर्व करताना, जी लोकं आपल्या एवढी भाग्यवान नाहीत. आपल्या घराव्यतिरिक्त कुठेतरी अडकली आहेत, ज्यांना अन्न पाण्याची भ्रांत आहे, जे आजारी आहेत, त्यांना विसरून कसे चालेल? आपल्या सर्वांसमोर अनेक प्रश्न, विवंचना आहेत. पण, वर उल्लेख केलेल्यांचे प्रश्न मला अधिक गंभीर वाटतात.

 
 
या उदासीन वातावरणात सकारात्मक उर्जेची प्रचंड गरज आहे. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा दुसरा कुठेतरी उघडलेला असतो. आशेचा किरण त्यातून डोकावत असतो. आपल्याला फक्त तो शोधण्याच काम करायचं असतं आणि हे काम एकमेकांना सहाय्य करत केल्यास लवकर होऊ शकतं. अगदी असच घडलं गेल्या काही दिवसांमध्ये. परिस्थिती आणीबाणीची होती. पण, योग्य वेळेस घटना घडत गेल्या आणि एकमेकांना निस्वार्थपणे मदत करत मानवतेची साखळी एक महत्वाचं काम करू शकली.
ही गोष्ट आहे, मूळच्या पुण्याच्या पण सध्या मुंबईत स्थायिक झालेल्या कुमारी मनाली गायकवाड यांची! एकवीस वर्षीय मनाली यांना थेलीसिमिया नावाच्या गंभीर आजारानं अवघ्या नऊ महिन्यांची असतानाच ग्रासलं. रुग्णाच्या स्थितीनुसार दर काही काळाने रक्त चढवावे लागते. मनालीला अनेक वर्ष दर १५ दिवसांनी असं रक्त द्यावं लागत होतं. तरीही या कालावधीत जिद्दीने आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून ती पुढील शिक्षण घेऊ लागली. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील विख्यात डॉ विजय रामानन यांच्या उपचारांमुळे हा रक्त देण्याचा कालावधीत वाढला. पण, थेलीसिमियाच्या रुग्णांना त्यांची औषध अगदी एक दिवसही चुकवून चालत नाही. त्याप्रमाणे सर्व खबरदारी घेतली जात होती.
 

 
मधल्या काळात मनालीच्या वडिलांची बदली मुंबईत झाली. पुण्याहून उपचार, औषध, यात मात्र खंड पडला नाही. मात्र, गेल्या ४० दिवसांमध्ये परिस्थिती पूर्ण पालटल्यामुळे मनालीच्या औषधांचा मोठा प्रश्न तिच्या आणि कुटुंबीयांसमोर होता. अशातच, एक प्रयत्न म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याकडे मदत मागण्यात आली. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपर्क करून विषय समजावून सांगितला आणि औषध मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. मुंबईतील मोठमोठ्या फार्मासिस्टकडे चौकशी केली. बऱ्याच ठिकाणी, “स्टाँकिस्ट बंद असल्यामुळे औषध उपलब्ध नाही.” असे उत्तर मिळाले.मुंबईत अनेक मोठमोठ्या मेडिकल स्टोअरची चेन असणाऱ्यांकडे चौकशी करूनही औषधं मिळाली नाहीत. पाच दिवस महानगरपालिकेच्या मोठ्या रुग्णालयात चौकशी करूनही कुठेच औषधं मिळत नव्हती. ही औषधं मोजक्याच ठिकाणी उपलब्ध असतात. पर्यायी औषधं एका ठिकाणी मिळत होती पण ती मनालीला योग्य परिणाम देणारी नसल्यामुळे घेता येण्यासारखी नव्हती. वाहतुक, पोस्ट, कुरियर, सर्वच बंद... पुण्याहून मुंबईत औषधं आणायची कशी??? मोठा यक्षप्रश्न होता. औषधं मिळाली नाहीत, तर मोठ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल! दरम्यान फक्त पुण्यातच दोन ठिकाणी औषध मिळते, हे समजले. एकूण काय, तर पुणे गाठायचे कसे? औषध इथवर आणायचे कसे? इकडेच सर्व प्रश्न अडून बसले होते. यामध्ये अजून ३ दिवस गेले. मनालीकडे आता एकाच दिवसाची औषधं होती...!
 
 
इतक्यात एक आशेचा किरण दिसला. काही मदत होते का? म्हणून ३० एप्रिलला संध्याकाळी ४ वाजता विकास देशमुख या कार्यकर्त्याने थेट पुण्याचे पोलीस कमिशनर डॉक्टर के. व्यंकटेशन यांना whatsApp वरून अडचण सांगितली. त्याची दाखल घेत वेळ न दवडता कमिशनर के. व्यंकटेशन यांनी एसीपी पहिलवान विजय चौधरी यांना परिस्थिती सांगितली. केवळ तीस सेकंदात समोरून एसीपी चौधरी यांनी दूरध्वनीवरून, “पुणे पोलिस आहेत ना, काळजी करू नका. औषध वेळेत मिळतील.” असे सांगितले. त्यांचा आश्वासक आवाज ऐकून, मदत मिळणार याची सर्वांना खात्री पटली. तरीही स्वाभाविकच मनालीच्या आईच्या मनाची घालमेल थांबत नव्हती. इकडे पुण्यात एसीपी चौधरी यांनी हिराबाग चौकातून औषधे घेतली आणि ती मुंबईला पाठवण्याच्या दृष्टीने टोल नाका गाठला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांची ते चौकशी करू लागले. एवढ्यात अजून एक देवदूत, नेमक्या वेळी प्रकट झाला. एका पोलिसाच्या हातातील औषधाची पिशवी बघून, काहीतरी गंभीर असणार, हा तर्क करत, एटीएसचे रघुनाथ पवार यांनी आपली गाडी थांबवली. सर्व घटना समजताच, त्यांनी मनालीच्या घरचा पत्ता घेऊन गाडी त्या दिशेने वळवली. रात्री ८ वाजता म्हणजे अवघ्या ४ तासांत मनालीच्या हातात तिची औषधं आली. एटीएसचे रघुनाथ पवार यांनी अगदी मनालीच्या घरी जाऊन ही मदत केली!
 


 
या अशा घटना मनातील नैराश्य दूर करतात. आपल्यासाठी झगडणारे हे देवदूत पाहून, नकळत हात जोडले जातात. ऊर अभिमानाने भरून येतो. विपरीत परिस्थितीत राहूनही सतत आपल्या संरक्षणासाठी कंबर कसून उभ्या असलेल्या या वीरांसाठी आपल्याला सध्या आपल्या घरी राहून, सहकार्य करायचे आहे. “सद् रक्षणाय खल निग्रहणाय” हे ब्रीद प्राणपणाने जपणाऱ्या या देवदूतांचे मनापासून आभार!!!
 
 
- वैदेही वैद्य

Police Pune_2  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.