चंद्रपुरात हजारो मजुरांचे रस्त्यावर आंदोलन

02 May 2020 14:00:06

chandrapur_1  H



मजुरी मिळत नाही; रेशनही संपल्याने कामगार संतप्त


चंद्रपूर : चंद्रपुरात हजारो बांधकाम मजूर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मजुरी नाही, रेशनही संपले, त्यामुळे गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी जवळपास १५०० मजुरांनी महामार्गावर येऊन ठिय्या मांडला. हे सर्व मजूर चंद्रपूरच्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाचे काम करत आहेत. सर्वजण उत्तर प्रदेश-बिहार-बंगालचे मजूर आहेत.


चंद्रपूर -बल्लारपूर वळण मार्गावरील या इमारतच्या बांधकामाचे कंत्राट शापूरजी -पालनजी यांच्याकडे आहे. इथले बांधकाम दीड महिन्यांपासून बंद आहे. मात्र इथला मजूर वर्ग काम नसल्याने आणि मजुरी मिळत नसल्याने संतापला आहे. सोबतच कंपनीने आश्वारसन दिलेले रेशनदेखील अदा झाले नसल्याने या संतापात भर पडली.


आज सुमारे पंधराशे बांधकाम मजूर अचानक चंद्रपूर- हैदराबाद महामार्गावर आले आणि त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तातडीने पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोबतच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी देखील मजुरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दीड महिन्यात कंपनीतर्फे केवळ आश्वासने दिली गेली आहेत, त्यामुळे आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला मुभा द्या अशी मागणी या कामगारांनी केली आहे. काम नाही- मजुरी नाही- रेशन नाही यापेक्षा गावाकडे कुटुंबासोबत राहू असे या कामगारांचे म्हणणे आहे.
Powered By Sangraha 9.0