मनावर राज्य करणारा हसतमुख कलावंत...

    दिनांक  02-May-2020 23:45:31
|


viju khote_1  Hअभिनय कौशल्य, विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम संवादफेकीच्या जोरावर ज्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या, ते व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते विजू खोटे...


अभिनेते सुनिल बर्वे यांच्या
हर्बेरियमउपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू होती. जुनी पाच नाटके रंगभूमीवर पुन्हा येणार होती. या उपक्रमावर पुस्तक व्हावे, अशी इच्छा मी अभिनेते सुनिल बर्वे यांना बोलून दाखवली. त्यावेळी त्यांच्या पाचव्या नाटकाचे नियोजन सुरू होते. ते नाटक म्हणजे झोपी गेलेला जागा झाला.याच नाटकाच्या तालमीला माझी आणि विजूकाकांची पहिली भेट झाली. या नाटकात विजूकाका महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे करत होते. झोपी गेलेला जागा झालाया नाटकाच्या तालमीला मी बर्‍यापैकी हजर होतो. या नाटकात अनेक दिग्गज कलावंत काम करत होते. नाटकाच्या तालमीदरम्यान मला पहिल्यांदा अभिनेते विजू खोटे यांची ओळख झाली. त्यांचा साधेपणा, बोलण्यातला आदर आणि कामाची शिस्त बघून खूप भारी वाटले. सिनिअर कलावंत असून देखील त्यांच्या चेहर्‍यावर हा आविर्भाव दिसला नाही. साधी राहणी अन् उच्च विचारसरणीहे त्यांचे गुण कौतुक करण्यासारखे होते.झोपी गेलेला जागा झालाया नाटकात भरत जाधव, सतीश पुळेकर, भार्गवी चिरमुले, दिन्यार तिरंदाज, संतोष पवार, संपदा कुलकर्णी, धनश्री काडगावकर व सुनिल बर्वे काम करत होते. मला अजूनही आठवते, या तालमीला विजूकाका वेळेच्या आधी हजर असायचे. आपल्यामुळे कुणाला उशीर व्हायला नको किंवा आपल्यामुळे कुणाचा वेळ वाया जाऊ नये, असे त्यांना कायम वाटायचे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी वेळेच्या आधी हजर असायचे. मला कायम प्रश्न पडायचा, एक एवढा सिनिअर कलावंत इतका साधा कसा असू शकतो? तालमीच्या मध्यंतरात जो काही नाश्ता मागवला जायचा, त्यावर ते अक्षरशः तुटून पडायचे. कारण, त्यांना प्रचंड भूक लागायची आणि ते खाण्याच्या बाबतीत प्रचंड उत्साही असायचे. त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडायचे. मी त्यांना कायम विचारायचो, “सर, तुम्ही इतकं साधं कसे राहू शकता?” तेव्हा ते फक्त हसायचे आणि माझ्या प्रश्नाला बगल द्यायचे. पण, त्यांच्या या हास्याने मी कुठेतरी हरवून जायचो. ते कलाकार म्हणून उत्तम होतेच, पण माणूस म्हणून त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले होते.त्यांच्या चेहर्‍यावर मी कधी टेन्शन बघितले नाही. ते कायम हसतमुख असायचे.
हर्बेरियमया पुस्तकाच्या निमित्ताने मी अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात विजू काकांची मुलाखत घेण्याचे भाग्य मला मिळाले होते. त्यामुळे मी खूप खुश होतो. मुलाखतीचा दिवस ठरला. वेळ ठरली. ही मुलाखत फोनवर शक्य नसल्याने त्यांच्या राहत्या घरी त्यांनी मला मुलाखतीसाठी बोलावले. मी गेलो आणि आमची मुलाखत सुरू होणार, तेवढ्यात त्यांनी मला पश्न केला.काय खाणार तू?” मी लाजल्यासारखा काहीच बोललो नाही. त्यांनी मला प्रश्न केला, “असं कसं? पहिल्यांदा घरी आलास. काहीतरी खाल्लं पाहिजे.मी काय बोलणार? तेव्हा ते म्हणाले, ‘’इथे गावदेवीला बटाटेवडा आणि भजी खूप चांगली मिळतात. थांब, मी त्याला फोन करून विचारतो. भजी किंवा बटाटावडा गरम आहे का?” त्यांनी माझ्यासमोर तत्काळ फोन काढला आणि चक्क बटाटावड्याची ऑर्डर दिली. मी फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो. मी ऑफिसमधून दमून भागून आलो होतो. माझी भूक त्यांनी ओळखली असावी. मी काही विचारणार, तेवढ्यात काका म्हणाले, ‘’अरे, मी कुठे काय पळून चाललो की काय, नंतर बोलू.अगोदर खाऊन घेऊ.त्यांचा हा साधेपणा खूप भारी होता. त्यांनी मुलाखत दिली आणि दोन दिवसानंतर शिवाजी मंदिरला झोपी गेलेला जागा झालानाटकाचा प्रयोग होता. तेव्हा मी माझी मुलाखत त्यांना वाचून दाखवली. ती त्यांना प्रचंड आवडली. मला म्हणाले,“चांगलं लिहितोस रे तूआणि पाठीवर शाबासकीही दिली. काका जितके रुबाबदार, भारदस्त वाटायचे, तेवढेच ते मनाने आतून कोमल होते.विजूकाकांचं बालपण खूप मस्त होतं. त्यांना जे बालपण अनुभवयाला मिळालं
, त्याबाबत ते स्वतःला खूप लकी समजायचे.आत्तापर्यंत त्यांनी ज्या मराठी-हिंदी सिनेमात कामे केली, यापाठीमागे त्यांचे कुटुंब व त्यांचा आधार त्यांना होता. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. तसेच मानसशास्त्रया विषयात काकांना खूप रस होता. त्यांचे पाऊल इंडस्ट्रीत पडले, तेच अभिनयात छाप उमटवण्यासाठीच! तो काळ कॉमेडियन्सचा होता. चित्रपटाच्या गोष्टीत हिरो-हिरोईनसोबत विनोदी भूमिका करणार्‍यांनाही समांतर महत्त्व होते. त्यामुळे केवळ प्रेक्षकांना हसवणे, हा एकच उद्देश न ठेवता, तेव्हाच्या लेखक आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाला साजेशा विनोदी भूमिका सजवल्या. त्यात विजूकाका एकदम फिट्ट बसले. वडील नंदू खोटे यांचा चित्रपट वारसा त्यांना लाभला. तेव्हापासून आजतागायत त्या पडद्याने त्यांची साथ सोडली नाही.१९६४ला आलेल्या
या मालकपासून अगदी आताच्या २०१८ मधील जाने क्यू दे यारोया चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिका करणारे विजूकाका शोलेचित्रपटाद्वारे घरोघरी पोहोचले. अंदाज अपना अपनामधील गलती से मिस्टेक हो गयाया रॉबर्टच्या डायलॉगने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. नंतर चित्रपटाच्या नायकानेच कॉमेडी करायची, असा ट्रेंड आला आणि तिथून कॉमेडियन्सचा उतरता काळ सुरू झाला. व्हिलनचा लेफ्ट हँडअसा लौकिक पसरेल, इतक्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही मुख्य व्हिलनचे काम मात्र विजूकाकांना कधीच मिळाले नाही. जबान संभाल केया गाजलेल्या मालिकेत त्यांची भूमिका चांगलीच गाजली. सशक्त अभिनय आणि विविध भाषांची सरमिसळ करणारी सशक्त संहिता यामुळे ही मालिका टेलिव्हिजन विश्वात मैलाचा दगड ठरली. प्रत्येक पिढीतले लोक त्यांना ओळखतात आणि हाच त्यांचा खर्‍याअर्थाने पुरस्कार आहे, असे मला वाटते.शोलेमधील कालिया असो किंवा अंदाज अपना अपनामधील रॉबर्ट; आपल्या कसदार अभिनयाने ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. शोलेचित्रपटातील त्यांचा कालिया तर आजही लोकांच्या मनात घर करून आहे. परंतु, या भूमिकेसाठी त्यांना किती मानधन मिळाले होते माहीत आहे का? विजू खोटेंनी अजरामर केलेल्या या भूमिकेसाठी त्यांना २५०० रुपये देण्यात आले होते. विजूकाकांना कालियाची भूमिका कशी मिळाली, याविषयीचा किस्सा स्वत: एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितला होता. ‘’मला संध्याकाळी ४च्या सुमारास रमेश सिप्पी यांचा फोन आला. त्यांनी मला ऑफिसला भेटायला बोलावले. मी खारला त्यांच्या ऑफिसला पोहोचलो. तेव्हा ते म्हणाले, “भूमिका फार छोटीशी आहे. एकदा तू ६ मिनिटांसाठी पडद्यावर दिसशील आणि दुसर्‍यांदा ७ मिनिटांसाठी...याचाच अर्थ संपूर्ण चित्रपटात पडद्यावर तुझी केवळ १२ मिनिटांची भूमिका असेल. भूमिका जरी फार कमी वेळेची असली तरी ही भूमिका तुझं आयुष्य बदलणार आहे. तू जरी पडद्यावर १०-१२ मिनिटं दिसलास तरी येणार्‍या कित्येक पिढ्यांसाठी ही भूमिका तुझी ओळख ठरेल,” असं ते म्हणाले.विजू खोटेंनी देखील लगेच या भूमिकेसाठी होकार कळवला आणि सिप्पींनी दिलेल्या शब्दाप्रमाणे या भूमिकेने इतिहास रचला.शोलेमध्ये कालियाची प्रसिद्ध भूमिका साकारणारे अभिनेते विजू खोटे यांचे ७७व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले. त्यांनी आतापर्यंत हिंदी आणि मराठी मिळून जवळजवळ ४०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. शोलेचित्रपटातील विजूकाका यांचा डायलॉग सरदार आपका नमक खाया हैखूपच हिट झाला होता. आजदेखील फॅन्स शोलेचित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक करतात. अलीकडचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट व्हेंटिलेटरया चित्रपटात देखील त्यांनी छोटीशी, पण अत्यंत खुमासदार अशी व्यक्तिरेखा साकारली होती, जी रसिकांच्या मनात ठसली. अभिनय कौशल्य, विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम संवादफेकीच्या जोरावर त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या.हिंदी व मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आजवर केलेल्या सिनेमा
, मालिका व नाटकाचा प्रभाव हा कायमच जाणवतो. वडील नंदू खोटे यांच्या नाट्यतालमीत खर्‍याअर्थाने त्यांच्या अभिनयाची जडणघडण झाली. कमळीनावाच्या एका मराठी चित्रपटाचे गीतलेखन मी करत होतो. या चित्रपटात विजू काकांची पण एक महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाची शूटिंग गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सुरू होती. यावेळी काकांसोबत पूर्णवेळ थांबायची संधी मला मिळाली होती. शूटिंगच्या त्या दोन दिवसांत काका मला आणखी जवळून ओळखता आले. जेवढी काळजी ते त्यांच्या भूमिकेची घ्यायचे, तेवढीच त्यांच्या आजूबाजूला काम करत असलेल्या सहकार्‍यांची घ्यायचे. सीन संपला तरी व्हॅनिटीमध्ये न जाता, सेटवरच थांबायचे व आवर्जून बारकाईने लक्ष द्यायचे. त्यांचे हे कामाबद्दलचे प्रेम पाहून काम करायला आणखी बळ मिळायचे. सेटवर कुणी उपाशी नाहीये ना? कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? याची ते आवर्जून चौकशी करायचे. हसरा स्वभाव असल्याने मिश्कीलपणे मस्करी करत काम करायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत असताना कोणालाच कंटाळा यायचा नाही. ते मिळून मिसळून राहायचे. कधी भेदभाव करत नव्हते. त्यांच्या या सर्व आठवणी माझ्या या मनात मी साठवून आहे. एक जबरदस्त हसतमुख अवलिया अनेकांच्या मनावर राज्य करून गेला एवढं मात्र नक्की! आता ते आपल्यात नाहीत, उरल्या आहेत फक्त त्यांच्या आठवणी. अशा सर्वगुणसंपन्न कलावंताला हा मानाचा मुजरा!!!

- आशिष निनगुरकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.