लोकमान्य टिळक आणि भारतीय उद्योगधंदे

    दिनांक  02-May-2020 23:10:32
|

lokmanya tilak_1 &nbबिझनेस नेटवर्कचा वापर पॉलिटिकल नेटवर्कवाढवण्यासाठी म्हणून टिळकांनी सगळ्यात आधी आपल्या देशात केला. शेतकरी, मजूर आणि व्यापारी या तिन्ही वर्गातील लोकांचा भारताच्या स्वातंत्र्यचळवळीसाठी टिळकांना पुढे फार उपयोग करून घेता आला आणि आपली राजकीय मते खर्‍या अर्थाने समाजाच्या सर्व स्तरात पोहोचविता आली. राजकीय आंदोलने करता करता उत्तम आणि यशस्वी व्यापार कसा करावा, याचा वस्तुपाठ टिळकांनी आपल्या कृतीतून घालून दिला. राजकीय साध्यासाठी साधन म्हणून उद्योगाचा वापर करून घेणार्‍या लोकमान्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेचं!


लोकमान्य टिळकांचे नाव घेताच
, त्यांची उत्सवप्रियम्हणून एक रूढ असलेली प्रतिमा सामान्यपणे अनेकांच्या डोळ्यापुढे उभी राहाते. तशी ती आहेच, पण त्याच्या जोडीला शेती, अर्थकारण याबद्दलच्या टिळकांच्या समृद्ध जाणिवांचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण मागील दोन भागांत केला. टिळकांना उत्सवाबरोबर उद्योगही तेवढाच महत्त्वाचा वाटला. राजकीय पारतंत्र्य नाहीसे करण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचा टिळकांनी जसा एक महत्त्वाचे साधन म्हणून उपयोग केला, तद्वत औद्योगिक क्षेत्रातील उन्नती हेही त्यांना राजकीय पारतंत्र्य निवारण्याचे एक महत्त्वाचे साधन कसे वाटले? याचीही चर्चा करूया!


डेक्कन सोसायटीत असताना टिळकांनी सार्वजनिक प्रश्नात लक्ष घालायला सुरुवात केली
, तेव्हा व्यापार्‍यांच्या बाजूने टिळक उभे राहिले. त्याला निमित्त झाले क्राफर्ड प्रकरणाचे. तिथपासून त्यांच्या उद्योगविषयक जाणिवा विकसित होऊ लागल्या, असे म्हणायला हरकत नसावी. त्यांनी उद्योगांविषयी नंतरच जाहीरपणे लेखनास आरंभ केलेला दिसेल. व्यापार आणि उद्योग क्षेत्रात टिळकांच्या वडिलांनाही रुची असल्याचे दिसते. त्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकार्‍याला पैसे उसने देऊ केले होते, तोच हा क्राफर्ड. जॉइंट स्टॉक कंपनीत टिळकांच्या वडिलांनी एक हजार रुपये याच
क्राफर्डमुळे गुंतवले होते. पुढे ते बुडाले
, पुन्हा मिळाले नाहीत.


डेक्कन सोसायटीचा राजीनामा दिल्यानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून टिळकांनी दोन प्रधान मार्ग निवडले. हे दोन्ही मार्ग उद्योगाचे आहेत. त्यांनी
लॉ क्लासच्या माध्यमातून शिकवणी वर्ग सुरु केले. भारतातला पहिला लॉ क्लासटिळकांनी काढलेला असावा बहुदा. आजकाल सगळीकडे ज्याचे पेव फुटलेले आहे, त्या खासगी क्लासेसचे जनक लोकमान्य टिळक आहेत, हे जाणीपूर्वक सांगतो. याला जोड म्हणून टिळकांनी लातूर येथे जिनिंग कंपनीची सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यात भागीदार म्हणून दोन मराठी माणसे जोडली. आबासाहेब परांजपे आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे ही त्यांची नावे. यांच्यासह टिळकांनी भांडवल गुंतवून व्यवसाय सुरु केला. आजकाल अशा व्यवसायाला आपण जॉइंट स्टॉक कंपनीम्हणतो. लॉ क्लासची जाहिरात त्या काळात केसरीत प्रसिद्ध होत असे. यातून जोडले गेलेले बहुतेक तरुण पुढे टिळकांच्या राष्ट्रीय विचाराने झपाटले. बिझनेस नेटवर्कचा वापर पॉलिटिकल नेटवर्कम्हणून टिळकांनी सगळ्यात आधी आपल्या देशात केला, हे मुद्दाम सांगायला हवे.एकदा स्वतंत्र झालेला देश सर्वार्थाने उभा राहायचा असेल
, तर आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण संपन्नता असावीच लागते, याची लोकमान्यांना पुरेपूर जाणीव झालेली दिसते. म्हणूनच शेती आणि अर्थव्यवस्था ज्या उद्योगावर अवलंबून आहे, त्या उद्योगाकडे आपला मोर्चा वळवून टिळक औद्योगिक पारतंत्र्याची चर्चा करतात. 1994 सालचा औद्योगिक पारतंत्र्यहा त्यांचा लेखच प्रसिद्ध आहे. टिळक लिहितात, “औद्योगिक पारतंत्र्य अथवा उद्योगासाठी दुसर्‍याच्या तोंडाकडे बघत बसणे या अनिष्ट अवदसेबद्दल आपल्या लोकात जितकी चर्चा होऊ लागावी तितकी अजून झाली नाही हे सर्वांस अहितकारक होय.कच्चा माल आम्ही तयार करायचा आणि प्रक्रिया करण्यासाठी तो परदेशात पाठवायचा
, यापेक्षा आपल्याच देशात त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले जायला हवेत.व्यापाराबद्दल टिळकांचे भाकीत होते की, “आम्हास लागत असलेले कापड मँचेस्टर येथे तयार व्हावे व चिनी-जपानी लोकांस लागत असलेले कापड आम्ही मुंबईस तयार करावे असला खो-खोचा व्यापार कधीही शाश्वत राहावयाचा नाही.आमचे उद्योगधंदे कसे ठार झालेया लेखात टिळकांनी भारतीय व्यापाराचा इतिहास मांडलेला दिसेल. केवळ शेतीवर अवलंबून न राहता, इतर उद्योगधंदे भारताच्या अर्थकारणात किती महत्त्वाची भूमिका बजावत, भारतातील नैसर्गिक साधनसंपत्ती, आणि मुबलक कच्चा माल याच्या जोरावर भारताने उद्योगाच्या क्षेत्रात कशी संपन्नता मिळवली होती; परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी धोरणामुळे आमच्या व्यापाराचे कसे नुकसान झाले, याबद्दल टिळकांनी केलेले लेखन तत्कालीन लोकांनी आतातरी व्यापारात लक्षपूर्वक उलाढाली करायला हव्यात, हे सांगण्यासाठी आहे.भांडवल नाही म्हणून उद्योगधंदे काढण्यात मागेपुढे पाहणार्‍यांना टिळक सांगतात
, “उद्योग काढल्याशिवाय भांडवल जमा होणार नाही किंवा यंत्रज्ञानही मिळणार नाही व दोन्ही असल्याव्यतिरिक्त उद्योगही निघणार नाहीत. तेव्हा तारतम्याने लहान प्रमाणावरच का होईना, पण निरनिराळे उद्योग निघाले पाहिजेत, म्हणजे भांडवल उभे राहील. परदेशाचे लोक व्याजाने आपणास रकमा देतील, परदेशस्थ लोकांचे यंत्रचातुर्य आपण चाकरीस ठेवू किंवा आपले लोक तयार करवून आणू. पण, यासाठी दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजेत, एक उद्योग करण्याची निष्ठा व प्रेम आणि दुसरे, प्रामाणिकपणा. या दोहोला धूर्तपणा व सन्मार्गगामी साहसप्रियता यांची जर संगती झाली, तर उद्योगाने वरती डोके काढण्यास फारशी शतके लागणार नाहीत. तरुणांनी इमान आणि विश्वास मनात ठेवून या कमी लागले पाहिजे, आणि शिक्षित तरुणांनी उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरले पाहिजे,” असे टिळक आग्रहाने सांगतात.टिळकांनी स्वराज्य
, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री घेऊन ब्रिटिशविरोधाचा लढा चालवला. त्याकडे लक्ष दिले तर समजेल की, परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यावर परिणामी भारतीय वस्तू वापरावी लागेल. भारतीय माल वापरायचा म्हणजे, भारतात नव्याने उभ्या राहिलेल्या उद्योगांना चालना मिळणार. राष्ट्रीय शिक्षणातील एक महत्त्वाचा घटक हा उद्योगाचे शिक्षण देणे हा आहे. भारतीय विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन शिक्षणाच्या मूलभूत धोरणात उद्योगांचा समावेश करावा, या मताचे टिळक होते. उद्योगाचे शिक्षण देऊन उद्यमशीलता वाढवावी, बहिष्काराच्या माध्यमातून स्वदेशी मालाला प्राधान्य देऊन देशी उद्योग उभारला जावा, या टिळकांच्या योजना त्यांच्या बहुआयामी द्रष्टेपणाची साक्ष देणार्‍या आहेत.


टिळकांचे सर्वसाधारण म्हणणे असे आहे की
, “आता इंग्रजी राज्यात जो तो उठतो तो शिक्षणानंतर नोकरीच्या मागे धावतो. उच्चवर्णीय लोक नांगर हाती घेऊन मातीत शेती करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अशावेळी सरकारी नोकर्‍या कमी होऊ लागल्या तर भारतीय तरुणांनी नव्याने व्यापाराकडे लक्ष दिले पाहिजे. कुणीतरी नोकरी देईल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतः उद्योग उभारून नोकर्‍या निर्माण करण्यात खरे शहाणपण आहे,” असे टिळक आग्रहाने सांगतात. जमशेदजी टाटा यांच्यावर टिळकांनी केसरीत लिहिलेला मृत्युलेख फार वाचनीय आहे. बॉम्बे स्वदेशी को-ओप. स्टोअर्सही एक फार महत्त्वाची कंपनी होती. जमशेदजी टाटा आणि लोकमान्य टिळक या दोघांच्या संकल्पनेतून तिची स्थापना झाली. तिच्या सुरुवातीच्या काही करारपत्रात टिळकांची स्वाक्षरी आहे. दरम्यान त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यांना सक्रीय प्रोत्साहन दिले. टिळक शेअर मार्केटमध्येही सक्रीय होते. शेअर्स बद्दलचा टिळकांचा अभ्यास परिपूर्ण होता.उत्तम दर्जाचा आणि सातत्याचा व्यापार करायचा तर त्यासाठी मुबलक माणसे हाताशी हवीत. केवळ भांडवलाच्या जोरावर काम होणे शक्य नाही
, सोबतीला कुशल कामगार वर्ग हवाच. टिळकांचे भारतातील कामगार वर्गाशी निराळे नाते आहे. सातत्याने त्यांनी कामगारांचे प्रश्न केसरीतून मांडलेले दिसतील. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंडमधील मजूर पक्षासोबत टिळकांचे संबंध चांगले होते ते यामुळेच! कामगारांच्या बाबतीत पुढे भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते श्रीपाद अमृत डांगे यांनी टिळकांकडून प्रेरणा घेतली, हे नमूद केले पाहिजे. तरीही टिळकांचे कामगार आणि व्यापारी यांच्याबद्दलचे धोराण मार्क्सच्या धर्तीवर आधारलेले आहे, असा तर्क करणे अतिशयोक्ती ठरेल. व्यापारी किंवा मालक आणि कामगार यांच्यात संघर्ष निर्माण न करता, परस्परपूरक समन्वय घडवून आणणारी कामगार नीती टिळकांनी भारतीयांना सांगितलेली आहे. दुर्दैवाने, आपले तिच्याकडे अजिबात लक्ष नाही. टिळकांना सहा वर्षांच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाल्यावर मुंबईच्या गिरणी कामगारांनी केलेला सहा दिवसांचा आक्रमक संप टिळकांची कामगार वर्गातील लोकप्रियता सांगतो.


भारताचे अर्थकारण शेती आणि उद्योगावर अवलंबून आहे
, हे ठामपणे सांगणारे लोकमान्य टिळक शेतीच्या मुद्द्यावरून तळागाळातील शेतकर्‍यापर्यंत केसरीच्या माध्यमातून पोहोचले आणि भारताच्या व्यापारावर कृतिशील कार्य करून त्यांनी मजुरांच्या प्रश्नात लक्ष घातले. शेतकरी आणि मजूरवर्ग हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. व्यापारी वर्ग हा आर्थिकदृष्ट्या संपन्न होता. या तीनही वर्गातील लोकांचा भारताच्या स्वातंत्र्यचळवळीसाठी टिळकांना पुढे फार उपयोग करून घेता आला आणि आपली राजकीय मते खर्‍या अर्थाने समाजाच्या सर्व स्तरात पोहोचविता आली. राजकीय साध्यासाठी साधन म्हणून या बाबींचा वापर करून घेणार्‍या लोकमान्यांच्या बुद्धीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!

- पार्थ बावस्कर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.