जबाबदारी घेतल्याने लोकप्रिय

    दिनांक  19-May-2020 22:38:37
|


PM modi global leader_1&n


सर्वच जागतिक नेत्यांना पछाडून तब्बल ६८ गुण मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत प्रथम क्रमांकावर राहिले तर बोरिस जॉन्सन तिसर्‍या, अँजेला मर्केल सहाव्या आणि डोनाल्ड ट्रम्प आठव्या क्रमांकावर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमागे त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा मोठा वाटा आहे.कोरोना महामारीशी अवघे जग झगडत असतानाच भारत सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता शिखरावर पोहोचल्याचे विविध संस्थांनी वेळोवेळी सादर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. अमेरिकेच्या
मॉर्निंग कन्सल्टकंपनीने नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या १० राष्ट्र व राष्ट्रप्रमुखांबाबत एक सर्वेक्षण केले आणि त्यात नरेंद्र मोदी अव्वलस्थानी असल्याचे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोल्त्सनारो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे अशा जगातील १० लोकशाही राष्ट्रांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता.

 


विशेष म्हणजे सर्वच जागतिक नेत्यांना पछाडून तब्बल ६८ गुण मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत प्रथम क्रमांकावर राहिले, तर बोरिस जॉन्सन तिसर्‍या, अँजेला मर्केल सहाव्या आणि डोनाल्ड ट्रम्प आठव्या क्रमांकावर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमागे त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा मोठा वाटा आहे. कारण, जगातील भौतिकदृष्ट्या विकसित आणि प्रगत देश कोरोनाशी लढायचे कसे, विजय मिळवायचा कसा यावर आपल्यापुरता विचार करत असताना नरेंद्र मोदींनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांनीच कोरोना पराभूत होऊ शकतो, अशी भूमिका घेतली. संपूर्ण जगाने एकत्र येऊन कोरोनाविरोधात आघाडी उघडली तर या भीषण संकटाचा मुकाबला करणे सहजशक्य असल्याचे मोदींनी जागतिक नेतृत्वालाही पटवून दिले. नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतरच जी-२० देशांची कोरोनाच्या संदर्भाने बैठक झाली व त्यात विविध उपाययोजनांची, परस्पर सहकार्याची चर्चा झाली. सार्क देश किंवा अलिप्ततावादी चळवळीतील देशांशीही मोदींना याच विषयानुरुप संवाद साधला आणि आपण सर्व एक असल्याची प्रचिती दिली. तसेच कोरोनामुक्तीसाठी साहाय्यभूत ठरणार्‍या औषधांवरील निर्यातबंदीही मोदींनी हटवली आणि जगातील अनेक देशांपर्यंत ती पोहोचवली. परिणामी, केवळ स्वतःच्या देशाचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा मानवतेच्या दृष्टीने सहानुभूतीने, समानुभूतीने विचार करणारा नेता प्रथमस्थानी येणे साहजिकच होते.मॉर्निंग कन्सल्टबरोबरच स्वित्झर्लंडच्या गॅलप इंटरनॅशनल असोसिएशनया आंतरराष्ट्रीय संस्थेने देशांतर्गत व जागतिक स्तरावर एक सर्वेक्षण केले. गॅलपने देशात केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ९१ टक्के भारतीय नागरिकांनी मोदी सरकार कोरोनाचा सामना उत्तमरित्या करत असल्याचे सांगितले, तर केवळ ७ टक्के नागिरकांनी टीका केली आणि २ टक्क्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमतः संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली होती आणि त्याची ९७ टक्के जनतेने त्याची प्रशंसा केली, तर गेल्या दोन आठवड्यांत गॅलपने जगातील २८ देशांत घेतलेल्या स्नॅप पोलमध्ये नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर होते. मोदी कोरोनाशी चांगल्याप्रकारे टक्कर देत असल्याचे ८३ टक्के लोकांचे मत होते, पण त्याचवेळी अन्य जागतिक नेते मोदींच्या आसपासही नव्हते.गॅलपने केलेल्या स्नॅप पोलमध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना ४९ टक्के, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ४२ टक्के, तर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना २३ टक्के लोकांनी पसंती दिली किंवा त्यांच्या कोरोनाविरोधातील उपाययोजनांची प्रशंसा केली. दरम्यानच्या काळात इप्सॉस इंडियानेदेखील कोरोना व मोदी सरकारया विषयावर एक सर्वेक्षण केले आणि त्यात नरेंद्र मोदींना ८७ टक्के लोकांनी उच्चगुणांकन दिले. आयएएनएस-सीव्होटरनेही याचवेळी केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे ७६.३ टक्के नागरिकांनी मोदी सरकारवर विश्वास असल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच टाइम्स नाऊऑरमॅक्स मीडियानेही अशाप्रकारचे सर्वेक्षण मर्यादित स्तरावर केले होते. त्यात देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद या सहा महानगरांतील नागरिकांचा समावेश केला होता व त्यातही ७१ टक्के नागरिकांनी मोदी सरकार उत्तम काम करत असल्याचे म्हटले होते. सर्वेक्षण संस्थांबरोबरच संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही नरेंद्र मोदी सरकारच्या कोरोनाविरोधातील धाडसी पावलांची प्रशंसा केली होती. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही मोदींचे कौतुक केले तर ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओफॅरल यांनी नरेंद्र मोदी महामानव किंवा सुपरमॅनअसल्याचे म्हटले होते.पण
, एवढ्या मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी लोकप्रिय कसे झाले, काय आहेत त्याची कारणे, याचाही विचार केला पाहिजे. कोरोनाने देशात प्रवेश केला त्यावेळी रुग्णसंख्या अतिशय कमी होती, पण जगातील अनेक देशांत अगदी काही दिवसांतच त्याने हाहाकार माजवल्याचे चित्र दिसत होते. संबंधित देशांतील सरकारांना अवचित आलेल्या कोरोना महामारीशी दोन हात कसे करावे, संक्रमण कसे रोखावे, हे स्पष्ट होत नव्हते. इटली, अमेरिका, इराण, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, ब्राझील आदी देशांत माणसे पटापट मरत होती, काही ठिकाणी तर मृतदेहांसाठी पुरेशा शवपेट्याही उपलब्ध होत नव्हत्या. पण, मोदींनी कोरोनासंकटामुळे कोणती परिस्थिती ओढवू शकते, याचा पुरेपूर विचार केला आणि आधी एक दिवसाच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी टाळी-थाळीनाद करायला सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मोदींनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली व पुढे एका सायंकाळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे आभार मानण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन केले. कोरोनाचे संकट नेमके काय हेदेखील त्यांनी सर्वांना पटवून दिले आणि नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने मोदींच्या आवाहनाला अफाट प्रतिसाद दिला. मोदींनी अगदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केले तरी त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास अढळ असल्याचे यादरम्यान दिसून आले.केंद्र सरकारने याच काळात काही आर्थिक पॅकेजेसचीही घोषणा केली. आरोग्य क्षेत्र
, शेती, बांधकाम क्षेत्र, संघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि आताचे २० लाख कोटींचे पॅकेज यातून मोदी सरकारने कोरोनाच्या भीषण आपत्तीवेळी आपण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले. तसेच अन्य देशांत अडकलेल्या हजारो भारतीयांनाही परत मायदेशी सुखरुप आणले. कोरोना व लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानातून देशाला व देशातील प्रत्येकाला सावरण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी घेत असल्याचे यातून स्पष्ट झाले. परिणामी समस्या कितीही मोठी असो, नरेंद्र मोदी त्यातून देशाला बाहेर काढतील, याची खात्रीही जनतेला सरकारच्या कृतीतून पटली. त्यात काही त्रुटी किंवा उणीवा असू शकतील, पण अन्य विकसित-प्रगत देशांच्या तुलनेत आज भारत कोरोनाशी व आर्थिक आव्हानाशीही उत्तमरित्या झुंज देत असल्याचे जनतेला समजते आहे. मोदींची लोकप्रियता अशाप्रकारे जबाबदारी घेण्यातून तयार झालेली आहे, ही व्यक्ती डगमगणार नाही, आपल्याला संकटात टाकून पळ काढणार नाही, याची जाणीव जनतेला झालेली आहे. म्हणूनच जिथे जागतिक आपत्कालीन परिस्थितीत अन्य राष्ट्रप्रमुखांची लोकप्रियता कमी झाल्याची उदाहरणे आढळतात तिथेच मोदींची लोकप्रियता अजूनच शिखरावर पोहोचल्याचे दिसते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.