कोरोना योद्ध्यांना पाच दिवस काम, दोन दिवस आराम

    दिनांक  19-May-2020 18:37:42
|

corona _1  H xमुंबई
: कोरोना युद्धात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आता पाच दिवस काम आणि दोन दिवस आराम देण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही रुग्णालयाजवळच करण्यात येणार आहे. राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे.
मागील दोन ते अडीच महिने डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारी या संकटाशी दोन हात करत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता त्यांना विश्रांती म्हणून पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी देण्यात येणार आहे. हा निर्णय फक्त निवासी डॉक्टरांसाठीच लागू राहणार आहे. यापूर्वी तीन दिवस काम आणि एक दिवस सुट्टी देण्यात येत होती. नर्सेससाठीही हीच सुविधा देण्यात येणार आहे. मात्र प्रशासकीय काम करणाऱ्या किंवा सुपरविजन करणाऱ्या सिनियर डॉक्टरांसाठी ही सुविधा लागू राहणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.


डॉक्टर आणि नर्सेस यांच्या ड्यूटीबाबत महापालिकेने परिपत्रक काढल्यानंतर महापालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय(सायन) आणि बा. य. ल. नायर रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व अडचणींबाबत सोमवारी (१८ मे) वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आणि सर्व संबंधित अधिकारी यांच्याबरोबर म्युनिसीपल कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी काही महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले आहेत.


एकीकडे कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात येते. मात्र त्यांच्या व्यवस्थेबाबत काही निर्णय घेण्यात येत नाही. त्यामुळे यापुढे डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था रुग्णालयापासून जवळच करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेल्स व्यतिरिक्त, लॉज, हॉस्टेल्स, रिकाम्या वार्डमध्ये चांगली सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. कोरोनाशी लढणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना ३०० रुपये दैनंदिन भत्ता तसेच कायम कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२० पासूनचा भत्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. रिलायन्स कंपनीकडून १५०० रुपयांचे किराणा कूपन्स सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.


सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचा ५० लाख रुपयांचा विमा तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ५० लाखांचे विशेष अनुदान आणि शैक्षणिक अर्हतेनुसार कायस्वरुपी नोकरी देण्यात यावी अशी शिफारस महापालिका आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. कोरोनाविरोधात लढताना जीवाची पर्वा न करता अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रोजंदारी, बहुउद्देशीय कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत आयुक्तांकडे शिफारस करण्यात येणार आहे. तसेच ५५ वर्षांवरील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना आणि गरोदर महिलांना कोरोनाबाबतचे काम देण्यात येणार नसल्याचे मान्य करण्यात आले. सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई कीट, एन-९५ मास्क आणि ग्लोव्हज देण्यात येणार आहेत. बस/एसटीमधून कर्तव्यावर हजर राहणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग राखता येत नसल्यामुळे बस/एसटी वाढविण्यात याव्यात तसेच मध्यम, पश्चिम, हार्बर रेल्वे लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येणार आहे. मृत कोरोनाबाधिताचे शव बांधण्यासाठी विशेष प्रोत्सहन भत्ता १,००० रुपये परिपत्रकाप्रमाणे देण्याचे मान्य करण्यात आले. कोणत्याही कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्यास प्राधान्याने आपल्या रुग्णालयात दाखल करून उपचार देण्याचे मान्य करण्यात आले आहे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना कॉरंटाईन करण्याचे तसेच दुर्दैवाने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांना आपल्या रुग्णालयात दाखल करण्याचे मान्य करण्यात आले.
कामगार संघटनांचे शिष्टमंडळ
म्युनिसिपल मजदुर युनियनचे चिटणीस प्रदीप गोविंद नारकर, उपाध्यक्ष अनिल निरभवणे, मुकेशभाई करोतिया आणि के.ई.एम. रुग्णालय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अशोक शेडगे तसेच सर्व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, खाते प्रमुख, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सहप्रमुख कर्मचारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य कामगार कार्यकर्ते उपस्थित होते. सदर सभेचे आयोजन के.ई.एम. रुग्णालय, एमएलटी हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. भारमल आणि अधिष्ठात्यांनी कामगारांचे प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.