प्रियांका वाड्रांचा बस घोटाळा – संबित पात्रांचा टोला

19 May 2020 17:28:27

patra_1  H x W:

प्रियांका वाड्रांचा बस घोटाळा – संबित पात्रांचा टोला


नवी दिल्ली: चारा घोटाळ्यात ज्याप्रमाणे ट्रकऐवजी स्कुटरचा नोंदणी क्रमांक देण्यात आला होता. त्याचप्रमाणे प्रियांकांनी आज बसऐवजी दुचाकी आणि रिक्षा यांचे नोंदणी क्रमांक दिले आहेत. ते पाहता प्रियांका वाड्रा यांनी लालू यादव यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सिद्ध होते, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रियांका गांधी – वाड्रा यांना सोमवारी लगावला आहे.

 

टाळेबंदीमुळे दिल्लीतच अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी बसेसची सोय करावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा यांनी उ. प्र. राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर प्रियांका यांनी मजुरांना स्वगृही घेऊन जाण्यासाठी काँग्रेस १ हजार बसेसची व्यवस्था करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर उ. प्र. प्रशासनाने काँग्रेसकडे त्या १ हजार बसेसच्या नोंदणी क्रमांकांची मागणी केली. काँग्रेसतर्फे काही बसेसचे नोंदणी क्रमांक राज्य सरकारकडे सोपविण्यात आले असता त्यापैकी बरेच नोंदणी क्रमांक हे दुचाकी गाडी, रिक्षा आणि सामानाची ने – आण करणाऱ्या वाहनांचे असल्याचे समोर आले.

 

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यावरून प्रियांका गांधी – वाड्रा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, चारा घोटाळ्यामध्ये ट्रकऐवजी स्कुटरचे नोंदणा क्रमांक देण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज झाली आहे. बसेसचे नोंदणी क्रमांक देण्याऐवजी दुचाकी गाड्या आणि रिक्षा यांचे नोंदणी क्रमांक काँग्रेसतर्फे देण्यात आले आहेत. प्रियांका वाड्रा यांनी लालू यादव यांच्याकडून त्याची प्रेरणे घेतली असल्याचा खोचक टोलाही पात्रा यांनी लगावला.

त्यानंतर पात्रा यांनी ट्विट करीत काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या बसेसचे नोंदणी क्रमांक हे प्रत्यक्षात मोटारसायकल, रिक्षा, चारचाकी गाडी, ट्रॅक्टर, रुग्णवाहिका यांचे असल्याचे सांगितले आहे.

 
 
 

योगी आदीत्यनाथ सरकारमधील मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनीदेखील काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या मुलांच्या म्हणजे प्रियांका गांधी – वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या या कृत्याचे उत्तर द्यावे. स्थलांतरीत मजुरांविषयी अशाप्रकारचे खालच्या दर्जाचे राजकारण करणे हे क्षमायोग्य नाही, त्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागावी. काँग्रेस पक्षाला मजुरांविषयी काहीही देणेघेणे नाही, त्यांना केवळ स्वत:ची प्रसिद्धी हवी आहे. फसवणूक करणे हे तर काँग्रेसचे धोरणच आहे. नॅशनल हेराल्ड, कोळशाची दलाली, जमिनींची प्रकरणे, राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा ही काँग्रेसच्या फसवणूकीची उदाहरणे असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0