‘कोरोना सुरक्षा ड्रेस’ ही काळाची गरज...

19 May 2020 20:04:38


PPE_1  H x W: 0


सध्या ज्या पद्धतीने पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी हे ‘कोरोना वॉरियर्स’ पीपीई किटच्या स्वरुपात वेगळा पोशाख वापरतच आहेत. पण, कोरोनापासून संरक्षणाचा औद्योगिक, कार्यालयीन, रस्त्यावर काम करणार्‍यांचा, दुकानदारांचा आणि ग्राहकांचा पोशाख हे सगळे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.


कोरोनामुळे सार्‍या जगाचाच एका नव्या युगात प्रवेश झाला आहे. सध्या जगातील प्रत्येक जण कोरोनावर लस किंवा औषध केव्हा तयार होणार, या एकाच काळजीत आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांत कदाचित कोरोनावरील रामबाण औषध सामान्य माणसापर्यंत पोहोचेल, असे वाटते. यापूर्वी ‘सार्स’, ‘स्वाईन फ्लू’ अशा काही साथीच्या आजारांनी काही प्रमाणात उपयोगी ठरलेल्या ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी औषधाचाही परिणाम हळूहळू दिसू लागला आहे. त्यामुळे अजून चार-सहा महिन्यांनंतर आपले पूर्वीचे जीवन सुरू होईल, अशी किमान अपेक्षा बाळगायला सध्या तरी हरकत नाही. दुसर्‍या बाजूला असाही विचार करून ठेवणे आवश्यक आहे की, सार्‍या जगाने ‘कोरोना युद्धातप्रवेश केला आहे. चीनमध्ये कोरोना विषाणू आपोआप निर्माण झाला, हे चीनने दिलेले जे कारण आहे, त्यावर जग विश्वास ठेवायला तयार नाही. ते खरेही असेल, पण गेल्या एक हजार वर्षांत मंगोलिया, चीन, जपान, कोरिया येथील काही लोकांनी लादलेली युद्धे किंवा युद्धासारख्या प्रयोगांनी काही लाख आणि काही कोटी अशा संख्येने बळी घेतले आहेत. ही त्यांची सवय दुर्लक्षिण्यासारखी नक्कीच नाही. हे आम्ही कोणती नवी भीती निर्माण करण्याच्या हेतूने सांगत आहोत, असे मानू नये. पण, जगातील प्रत्येक देशापासून ते महासत्तापर्यंतच्या देशांना आर्थिक क्षेत्रात पाच वर्षे मागे नेणार्‍या या संकटावर भाबडेपणाने विचार करुन चालणार नाही.
 

 
‘कोविड-१९’चे संकट सुरू झाल्यापासून या क्षेत्रात भारताने घेतलेली भूमिका आणि त्याला जगाकडून मिळणारा प्रतिसाद हा स्पृहणीय आहे. कदाचित औद्योगिक क्षेत्रात नवी क्षितिजे निर्माण होऊन भारताला अधिक लाभ होण्याची शक्यताही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. असे असले तरीही व्यक्तिगत पातळीवर, सार्वजनिक जीवनात यादृष्टीने अजून काही बदल करणे क्रमप्राप्त आहे. भारतात सध्या एका बाजूला कोरोनाचा तेजीने फैलाव होत असताना आगामी काळात मात्र भारतातील औद्योगिक उत्पादन भरारी घेईल, असे चित्र आहे. सध्याच्या मर्यादेत ‘सोशल डिस्टन्सिंग’ला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे आणि या संकटाशी सामना करताना ते तसे असणेही साहजिक आहे. पण, ५० वर्षांपूर्वी मानवाने जेव्हा चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा अशा अनेक शक्यता गृहीत धरून अंतराळवीरांचा पोशाख तयार करण्यात आला होता. सध्या दोन माणसे दोन फुटाच्या अंतरात आली तरी कोरोना व्हायरस उडी मारून दुसरीकडे जातो, अशा वेळी उपयोगी पडणारा आणि अपरिहार्यपणे निर्माण होणार्‍या गर्दीतही टिकणारा पोशाख तयार करणे सध्याच्या विज्ञानाला अशक्य आहे, असे वाटत नाही. अर्थातच, त्यावर ज्ञानी संशोधकांना प्रयोग करावे लागतील. यातून मार्ग काढण्यासाठी संपूर्ण अंग झाकण्यासाठी प्लास्टिकचा तयार ड्रेस पुढे आला तर त्याचा उपयोग होण्यासारखा आहे. नाकाच्या जागी श्वास घेण्यापुरती छिद्रे आणि शर्ट-पॅण्ट निराळी अशी काळजी घेतली, तर दिवसभर तो पोशाख वापरूनच काम करता येईल. म्हणजे जवळपास सध्याच्या पीपीई किटसारखा. पण, सर्वसामान्यांना सहज वापरता येईल असा. त्यात मानेच्या वरचा पण संपूर्ण डोके झाकणारा तो टोप पारदर्शक असेल, तर काम करतानाही त्याचा वापर करता येईल किंवा तो बाजूला काढूनही ठेवता येईल. प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाताना व बाहेर पडताना त्यावर ‘स्टरलायझेशन’चा फवारा मारला, तर त्याला अधिक सुरक्षितता येईल. चांगल्या प्लास्टिकच्या कापडाचा असा पोशाख तयार करणे हे त्या क्षेत्रातील मोठ्या उद्योगांना आजघडीला सहज शक्य आहे. या क्षेत्रातील ज्ञानी लोकांनी जर काही नमुने तयार करून दिले तर छोटे उद्योग किंवा साधे कलाकारही ते तयार करतील. काही ठिकाणी शर्टाचे स्वरूप गाऊनसारखे लागेल, उष्णतेच्या ठिकाणी काम करताना अजून काही निराळीच व्यवस्था करावी लागेल. यात अजूनही काही अडचणी किंवा सूचना येतील. पण, त्याचा विचार करून मार्ग काढावा लागेल.
 
आपला देश मोठ्या लोकसंख्येचा, म्हणजे मोठ्या गर्दीचा आहे. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरही ‘सोशल डिस्टन्सिंग’चा आग्रहही धरावाच लागेल. पण, वरील कोरोना सुरक्षा पोषाखामुळे ती समस्या सुकर होईल. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे प्रयत्न सध्या जागतिक पातळीवर सुरू आहेत, ते स्पृहणीय आहेत. पण, हा व्हायरस पसरण्याचा जो स्वभाव आहे व जो वेग आहे, तो पाहता पुन्हा औद्योगिक कामे व सामान्य माणसाची कामे सुरू करण्यासाठी सध्याच्या प्रयत्नांना फार मर्यादा आहेत. त्यांना हातमोज्यासह असणार्‍या या अशा ड्रेसचा उपयोग होईल. अनेक कारखान्यांत काम करताना त्या ठिकाणचा अंग झाकणारा ड्रेस असतो. त्याचप्रमाणे हा पोशाख वापरुन कामे करता येतील. काही औद्योगिक प्रकल्पाच्या व्यवस्थापनांनी यात पुढाकार घेणे उपयोगाचे ठरेल. कोरोनाच्या निमित्ताने काही अनपेक्षित बाबी पुढे आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे जागतिक आरोग्य संघटनाही गैरसमज पसरवू शकते. दुसरे असे की, अशा साथीच्या वेळी कोणता देश लहान नाही आणि कोणी मोठा नाही, अशी स्थिती होऊ शकते. कोरोनाचे संक्रमण आल्यावर जे देश सावध होते, त्यांचे नुकसान तुलनेने कमी झाले. कोरोना हा तर चीनचा जगावरील हल्ला आहे, असे मानणारेही देश आहेत. बाराव्या शतकात मंगोलियाच्या चेंगीस खानने जगाला बेसावध ठेवून केलेेले आक्रमण युरोपच्या पश्चिम टोकाला म्हणजे रोम आणि स्पेनपर्यंत पोहोचले होते. भारतावर आक्रमण करून काही शतके मुक्काम करणारे मुघल हे मंगोलियन होते. दुसर्‍या महायुद्धात जपाननेही तशीच स्वप्ने बघितली होती. त्यात मोठा नरसंहारही झाला होता. चीनचा इतिहास भारताला माहीत आहे आणि तो नक्कीच विसरण्यासारखा नाही.
कोरोना येण्यापूर्वी जगाचा जो इतिहास होता, तोच आज आहे. त्यामुळे त्या इतिहासाच्या आधारे आज विचलितता यावी, असे काही नाही. पण, कोरोना महामारी सुरू असताना सर्व औद्योगिक क्षेत्रे सुरू असणे आणि जगाला गरज असलेल्या बाबी त्या त्या देशांना निर्यात करणे ही आज काळाची गरज आहे. भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. कोरोनाला तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ आवश्यकच आहे. अशावेळी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा मुद्दा वैज्ञानिकांनी तशा स्वरुपाचा पोशाख आणि जागोजागी ‘सॅनिटायझेशन शॉवर’ याने सोडविता आला पाहिजे. गेल्या २०-२५ वर्षात भारतीय शास्त्रज्ञ तरुणांनी जगातील जी वैज्ञानिक आव्हाने पेलली आहेत, त्यात हे आव्हान फार मोठे नाही. सध्या ज्या पद्धतीने पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी हे ‘कोरोना वॉरियर्स’ अशा स्वरुपाचा पोशाख वापरतच आहेत. पण, कोरोनापासून संरक्षणाचा औद्योगिक पोशाख, कार्यालयीन पोशाख, रस्त्यावर काम करणार्‍यांचा पोशाख, दुकानदारांचा पोशाख आणि ग्राहकांचा पोशाख हे सगळे निराळे असेल. अनेकांना असेही वाटणे साहाजिक आहे की, अशा धोक्यापेक्षा घरीच बसलेले बरे. साठींनंतरच्यासाठी तोही पर्याय असू शकेल. पण, सार्‍या जगातील औद्योगिकरण अडचणीत असताना हे आव्हान स्वीकारणे आवश्यक आहे. आगामी काळात चीनमधील १०० लक्ष कोटींची औद्योगिक गुंतवणूक पहिल्या टप्प्यातच बाहेर पडण्याच्या पवित्र्यात आहे. पाठोपाठ अजून १०० लक्ष कोटीचा गुंतवणुकीचा दुसरा टप्पा चीन सोडण्याच्या पवित्र्यात आहे. अन्य कोणत्या देशाचा पर्याय पुढे येण्याच्या आत त्यांचे उत्पादन भारतात सुरू झाले पाहिजे. भारतीय शास्त्रज्ञांनी जगभर पेललेली आव्हाने पाहिली तर हे आव्हान त्यांच्या टप्प्यातील आहे. अनेक जाणकारांचे म्हणणे असे की, कोरोनाची लस अगदी चार-पाच महिन्यांत येईल. पण, मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात भारताला भेट दिलेल्या जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो याचे म्हणणे आहे की, “कोरोनाची लस येण्यास अजून दोन वर्षे लागणार आहेत.” प्रत्यक्षात ती लस लवकरच येईलही, पण जगात सुरू झालेले ‘विषाणू युद्धाचे वादळ’ लगेच संपेलच असे नाही. त्याचा सामना करणारे ‘मन’ तयार करणे हे खरे आव्हान असणार आहे.
 
‘निओ मॉडर्निझम’च्या नावाखाली दहशतवाद
 

चीन या ना त्या प्रकारे जगावर आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, अशी शक्यता दोन निरनिराळ्या संदर्भात यापूर्वी पुढे आली होती. ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी चार वर्षांपूर्वी एका मुलाखतीत पुढील चार वर्षांत चीनमधून निघालेला व्हायरस जगाची युद्धजन्य परिस्थिती तयार करतील आणि त्यात वीस ते तीस लाख लोक मरतील, असे बोलून दाखवले होते. दुसरे असे की, जगातील काही मुस्लीम दहशतवादी संघटना आणि चीन हे ‘निओ मॉडर्निझम’ या नावाखाली जगात एक संघटना उभी करत आहेत. सध्या ते निओ मॉडर्निझमया नावाखाली जगात निराळाच दहशतवाद पसरवण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी युरोप आणि अमेरिका या खंडात आपला प्रभाव निर्माण केला आहे. तेथील तरुण पिढी त्याच्या मागे जाऊ लागली आहे. या विषयावर ब्रिटनमधील एक विदुषी काटी हॉपकिन आणि राजीव मल्होत्रा यांची एक मुलाखत युट्युबवर आहे त्याचप्रमाणे ‘निओ मॉडर्निझमवरही बरेच वाङमय उपलब्ध आहे.

- मोरेश्वर जोशी

Powered By Sangraha 9.0