कालाय तस्मै नमः

    दिनांक  19-May-2020 22:24:37
|


ratnakar matkari_1 &


बालनाट्य, एकांकिकांपासून ते अगदी गूढकथांपर्यंत रसिकमनाचा नेमका ठाव घेणारे ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. एक हौशी चित्रकार आणि परखड वक्ते म्हणूनही मतकरी सुपरिचित होते. तेव्हा, अशा या रसिकप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कारकिर्दीवर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख...त्यांची अन् आपली पहिली ओळख होते
, ती पुस्तकांतून. निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अलबत्या गलबत्याअशा बालनाटकांमधून आपलं वयच मुळी ते असतं. माझंही तेच तसंच घडलं. १९६५-६७चा काळ होता. अक्षरं एव्हाना ओळखी पलीकडे जाऊन माझ्याशी मैत्री करू पाहात होती. वाचनाचा छंद वाढू लागला होता. पुस्तकातले संवाद मोह पाडत होते. जोडीला आकाशवाणीचं बालोद्यानकानांचा वेध घेऊ पाहायचं. अधूनमधून ते तिथंही भेटत राहायचे. मतकरींच्या वरील बालनाट्यांनी तर इतिहास घडवला होता. दिग्दर्शक, नाटककार यांची नावे लक्षात ठेवण्याइतकी समज आम्हा मुलांमध्ये जरी तेव्हा नसली, तरी पण दिलीप प्रभावळकर चेटकिणीच्या भूमिकेत होते, हे मात्र अजूनही स्मरते.पुढेही ते असेच भेटत राहिले. कधी कथांतून
, नाटकांतून, एकांकिकेतून, तर कधी कादंबरी, चित्रपटकथा यातूनसुद्धा आणि ही भेट पण अशी की, वाटायचं हा प्रसंग तर माझ्यावरच बेतलाय. माझं हे रहस्य यांना कसं कळलं बुवा? खरं तर वरील अनुभव हे फक्त माझेच नाहीत. मतकरींच्या प्रत्येक वाचकाचा अनुभव हा असाच असतो. रत्नाकर मतकरीम्हणजेच नावाप्रमाणेच मराठी साहित्यातील रत्नाकर’, खोल अथांग सागर. नावीन्यपूर्ण पद्धतीने केलेले आशयगर्भ लेखन. या एकाच व्यक्तिमत्वात लेखनाचे किती म्हणून पैलू दिसावेत? बालसाहित्य, बालनाट्य, आत्मचरित्रात्मक लेखन. माझे रंग प्रयोगहे तर नाट्य अभ्यासकाचे बायबल म्हणावे लागेल. याखेरीज वृत्तपत्रीय स्तंभलेखनही त्यांनी केले.रत्नाकर मतकरींना बालरंगभूमीचे अध्वर्यू मानावे लागले. बालरंगभूमीसाठी
, त्यातील प्रत्येक प्रयोगासाठी त्यांनी सुधा करमरकर, दिलीप प्रभावळकर, स्मिता पाटील, विजय कदम यांच्या समवेत लिटील थिएटर्सच्या माध्यमातून जीवतोड मेहनत केली. त्यांनी मधुमंजिरीया बालनाट्यापासून जी सुरुवात केली, अगदी तीन दशकांपेक्षाही जास्त अखंडितपणे. म्हणजे कोण्या एका बालरसिकापासून ते थेट त्याच रसिकाच्या नातवंडांपर्यंत ही नाट्यगंगा अखंडपणे वाहातच राहिली आणि त्याही पुढे जाऊन, त्याच गंगेच्या शाखा-उपशाखा रुपाने... १९५५ पासून अगदी काल-आजपर्यंत जणू कालवे, प्रवाह आदी स्फूर्तिदायिनी रुपाने पार झी टीव्हीच्या प्रसारणापर्यंत अविरत वाहतेच आहे.या प्रवाहातील किती म्हणून नाटकांची नावे घ्यावीत
? छोट्या मित्रांच्या स्वप्नील जगात तितक्याच निरागसपणे रमणार्‍या या रत्नाकरांच्या खजिन्यात तब्बल २५ पेक्षा जास्त बालनाट्ये रत्नांप्रमाणेच मोठ्या दिमाखात झळकत आहेत. जातीच्या लेखकाला जेव्हा उत्स्फूर्ततेची साथ मिळते ना, तेव्हाच मग मतकरींसारखं दर्जेदार लिखाण जन्म घेतं. १९७० नंतरचा कालखंड थोडासा निराळा होता. नाट्यविषयक रूढ कल्पनांना छेद देणारी अनेक नाटके व नाटककार मानवी आयुष्यांच्या अनेक लपलेल्या व लपवलेल्या कंगोर्‍यावर आपल्या लेखनातून उघडपणे भाष्य करू पाहत होती. रत्नाकर मतकरींनीदेखील आपल्या एकांकिका व नाटकांमधून बदलत्या काळाची ही नसदेखील अचूक, पण हळूवारपणे दाबलेली दिसते.विशेषतः
एकांकिकाया प्रकारांतून मतकरींनी हा बदल समर्थपणे प्रकट केला. त्यांच्या कहाणी कुणा प्रेमिकांचीपोट्रेटया एकांकिकांनी तर उभा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. एकांकिकांची मांडणी त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रस्थापित रंगमंचीय आविष्काराला बाजूस सारून नवीन वास्तववादी पद्धतीची केलेली दिसते, तर कधी रंगमंचीय सांकेतिक, प्रायोगिक सूचक नेपथ्याला प्राधान्य दिले. महाविद्यालयीन युवा नट, नाट्यप्रेमी मंडळींचं हक्काचं दर्जेदार व्यासपीठ समजल्या जाणार्‍या पुरुषोत्तम करंडकव तशाच अन्य एकांकिका स्पर्धा यातून मतकरींच्या आशयघन नाट्य संहितांना त्या काळात जणू बहरच आला होता. मी खात्रीपूर्वक विधान करतो की, या पुढील ४० -४५ वर्षांच्या कालखंडातदेखील मतकरींच्या एकांकिका या माईलस्टोनमानल्या जातील.आता थोडंसं त्यांच्या नाट्यविषयक साहित्याकडे वळूया. यात लक्ष वेधून घेणारे नाटक
लोककथा ७८.’ शोषितांचं, श्रमिकांचं, दैन्य-दारिद्य्राचं, काळोखाच्या अंतरंगाचा अर्थ दाखवून देणारं, त्यातून निर्माण होणार्‍या किंवा होऊ शकणार्‍या भीषण भविष्याचं दर्शन आपल्या पुढे मोठ्या वास्तवपणे, ताकदीने घडवणारे नाटक. १९७८ साली लिहिलेलं हे नाटक. सुमारे ४२ वर्षांपूर्वीचे हे नाटक २० १९ साली सांगली केंद्रावर सादर होते व अंतिम फेरीदेखील गाठते. यावरूनच संहिता किती दमदार आहे, याचा विचार करावा. पण, हे एकच काय म्हणून? त्यांची सर्वच ३२ नाटके ही वेगवेगळ्या विषयांना, वैशिष्ट्यपूर्ण स्पर्श करताना दिसतात. बिर्‍हाड बाजल’, ‘सत्तांध’, ‘आरण्यक’, ‘इंदिरा’, ‘माझं काय चुकलंत्यांची ही व अशी अनेक नाटके कथानकातील वैविध्य आणि प्रयोगशीलतेची उदाहरणे म्हणून दाखवता येतील.तसं पाहिलं तर
नाटकहा बेभरवशाचा कारभार असं मानलं जातं. आरंभशूर नाटककार, नाट्यवेडे गाजराची पुंगी वाजली तर वाजलीया न्यायाने वागतात. असे लोक आसपास लाखांनी सापडतील. पण, मतकरींनी हे साहित्यसेवेचे व्रत की घेतले व्रत हे नच अंधतेनेम्हणजे डोळसपणे घेतले होते; अन्यथा २० वर्षांपर्यंत इमानेइतबारे जी मानाची बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली, ती आतासारखे स्वेच्छा निवृत्तीचे कोणतेही विशेष फायदे मिळत नसूनही १९८३-८४च्या सुमारास त्यांनी सोडली नसती. बँकेच्या सेवा कालखंडातही त्यांनी तेथे मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना, त्याद्वारे नियमितपणे नामवंत गायक, वादक, साहित्यिक चर्चा, व्याख्याने, काव्य संमेलनादी कार्यक्रम, त्याचे नियोजन, आंतरबँक नाट्य स्पर्धा, त्यात सहभाग, सातत्याने पारितोषिके मिळवणे अशी भरीव कामगिरी केलीच होती. आज त्यांचे समकालीन बँक अधिकारी सुभाष बापट, मोहन संकपाळ हे याबाबत भरभरून बोलतात, माहिती देतात. इतकी की, तो एक स्वतंत्र लेखनाचा विषय होईल.अखेर १९८३
-८४च्या सुमारास त्यांनी पूर्णवेळ साहित्यसेवेस वाहून घेतले. फलस्वरूप, अ.भा. नाट्य परिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार १९७८, उत्कृष्ट पटकथा- दादासाहेब फाळके पुरस्कार १९८६, राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार १९८९, नाट्यव्रती पुरस्कार १९९९, साहित्य बाल अकादमी पुरस्कार अशा अनेक गौरवांनी सन्मानित केले गेले. याशिवाय १९८३ साली, भारत सरकारची सांस्कृतिक विभागाची मानाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली होती. वास्तविक पाहता, नाटककार नाटक सोडून अन्य साहित्य प्रकार क्वचितच हाताळताना दिसतो. अशा अपवादात्मक साहित्यिकांमध्ये रत्नाकर मतकरींचा समावेश करावा लागेल. गूढकथाया काहीशा दुर्लक्षित कथाप्रकाराला मतकरींच्या आगळ्या-वेगळ्या लेखनशैलीने वाचकाभिमुख केले, यात शंका नसावी. एखाद्या थंडगार रात्री, शेकोटीभोवती मित्रमंडळींत जेवणावळसारख्या कथेचं वाचन किंवा श्रवण करावं. मतकरींच्या धक्कातंत्रामुळे अंगावर कसा, सर्रकन काटा येतो. तर असं हे प्रत्ययकारी लेखन. जौळकादंबरीवर माझं काय चुकलंसारखं नाटक अन् माझं घर माझा संसारचित्रपट निर्माण होतो आणि या तीन्ही क्षेत्रात मतकरी आपला ठसा उमटवून जातात....
आणखी काय लिहायचं? खरं तर त्यांनीच आपल्यासाठी इतकं काही लिहून ठेवलंय की, त्याचा ठाव घ्यायला हे आयुष्यही पुरणार नाही... पण, असंच अधूनमधून पुस्तकांमधून ते भेटत राहतीलच... कदाचित १७ मेसारखा दुष्ट दिवस यापुढेही आपल्या उर्वरित आयुष्यात येत राहील. मन उगाचच कातर होईल. मग पुनः त्यांना आठवायचं, त्यांच्या साहित्यात पुनः पुन्हा डोकवायचं. त्यातूनच कधी मित्र म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून, कधी कोड्यागत वाटणार्‍या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांची उत्तरं मिळतील का, हे त्यांच्याच साहित्यातून, त्यांनाही हुडकत राहायचं... बस्स! आता इतकंच आपल्या हातात...
कालाय तस्मै नमः।

- राजेंद्र थिटे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.