वांद्रे स्थानकाबाहेर पुन्हा मजुरांच्या गर्दीचा महापूर

    दिनांक  19-May-2020 17:02:24
|

bandra station_1 &nb

‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ गाठण्या धावले ‘श्रमिक’

मुंबई : वांद्रे टर्मिनस येथून बिहारसाठी सुटणारी ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ गाठण्यासाठी मुंबईतील परप्रांतीय श्रमिकांनी धाव घेतली आणि वांद्रे स्थानकात पुन्हा एकदा गर्दीचा महापूर पाहायला मिळाला. अशीच गर्दी १४ एप्रिल रोजी झाली होती. त्यावेळीही लॉकडाऊन संपणाच्या दिवशीच लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार असल्याची कुणकुण स्थालांतरीत मजुरांना लागली होती. त्यामुळे गर्दीचे लोंढे वांद्रे स्थानकाबाहेर जमले होते.
 
वांद्रे टर्मिनस येथून दुपारी १२ वाजता बिहार-पुरनियासाठी सुटणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी साधारणपणे १७०० जणांनी बुकिंग केले होते. त्यांना या ट्रेनने जाण्याची मुभा देण्यात आली. मात्र तरीही वांद्रे स्टेशनच्या बाहेर गर्दी झाली होती. ज्या लोकांनी या ट्रेनसाठीचे बुकिंग केले नाही, त्या स्थलांतरित मजुरांनीही गाडीत जागा मिळण्याच्या आशेने वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. गर्दीला आवरणे कठीण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले. अर्थात त्यांनी मजुरांना पांगविले.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. अशात स्थलांतरित मजुरांचे सर्वाधिक हाल झाले आहेत. त्यामुळे ते मुंबई सोडून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी आतूर झाले आहेत. सोमवारी समाज माध्यमांवरून संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आत्तापर्यंत ५ लाख मजुरांना त्यांच्या गावी पाठवल्याचे सांगितले. यापुढेही पाठवू असे ते म्हणाले. मात्र मजुरांच्या संयमाचा बांध आता फुटत चालला आहे. हालअपेष्टांमुळे काही अश्रू ढाळत आहेत, तर काही आक्रमक रूप धारण करण्याच्या मनःस्थितीत आहेत.
 
राज्य सरकारने केंद्राची संमती घेऊन श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. मात्र या ट्रेन्समधून आधी नोंदणी केलेल्या मजुरांनाच घरी पाठवण्यात येत आहे. अशात मंगळवारी बिहारला जाणाऱ्या ट्रेनसाठी सुमारे १७०० च्या आसपास मजुरांनी नोंदणी केली होती. त्यांना गाडीत प्रवेश देण्यात आला. मात्र ज्या मजुरांनी नोंदणी केली नव्हती त्यांची पोलिसांनी समज काढल्यानंतर ते माघारी परतल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.