भारत कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील : डॉ हर्षवर्धन

    दिनांक  19-May-2020 16:23:19
|

WHO _1  H x W:जागतिक आरोग्य परिषदेत भारतातील कोरोना साथीवरील उपाययोजना व परिस्थितीचा आढावा याविषयी चर्चा करण्यात आली
जिनिव्हा :
सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या ७३व्या आरोग्य परिषदेला सुरुवात झाली. यावेळी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला जागतिक ऐक्य आवश्यक आहे. कोरोनामुळे विकसनशील देशांमध्ये आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. भारताने योग्यवेळी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलले आहे. आम्ही अजूनही शिकत आहोत. आम्हाला खात्री आहे की आम्ही येणाऱ्या काळात अधिक चांगले काम करू. यापूर्वी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, आपण सर्वांनी या साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी घेऊन काम केले आहे. ते म्हणाले की, हा आजार नियंत्रण आल्यानंतरच याचा तपास केला पाहिजे. तथापि, ते न्याय्य असले पाहिजे. अनेक प्रयत्नांनंतरही तैवान जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होऊ शकला नाही.


कोरोनाचा सामना करण्यासाठी चीन २ वर्षात १५हजार कोटी देईल

जिनपिंग यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढील दोन वर्षांत २अब्ज डॉलर्स (सुमारे १५ हजार कोटी रुपये) जाहीर केले. चीनमध्ये कोरोनाची लस तयार केल्यास ती जागतिक स्तरावर सार्वजनिक वस्तू म्हणून घोषित केली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.आरोग्यविषयक मुद्यांवर लढा दिला जाऊ शकत नाही: मॅक्रॉन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, आम्ही कोरोना विषाणू विरूद्ध लढा देण्यासाठी जागतिक दृष्टिकोनाचे महत्त्व यावर जोर दिला. जर आपण लस बनविली तर प्रत्येकाला ती उपलब्ध झाली पाहिजे. जोपर्यंत हा आजार काहींसाठी धोका असेल,तोपर्यंत या आजाराचा प्रत्येकास धोका असणार आहे. आरोग्याविषयक लढा दिला जाऊ शकत नाही किंवा ते विकले जाऊ शकत नाही.मर्केल यांनी डब्ल्यूएचओचा बचाव केला

जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्कल यांनी डब्ल्यूएचओचा बचाव केला. त्यात आणखी सुधारणा करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, डब्ल्यूएचओ ही एक जागतिक संस्था आहे. जिथे सर्व एकाच सूत्रामध्ये येतात. आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपण आपले कार्य कसे सुधारू शकतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोना साथीवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.