गूढकथांच्या ‘राजा’ची कोरोनाशी झुंज अपयशी!

    दिनांक  18-May-2020 09:19:25
|

ratnakar matkari_1 &


ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मतकरींच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

गेले काही दिवस रत्नाकर मतकरी यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेकअप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. या चाचणीचा निकाल सकारात्मक आल होता. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात दाखल आले होते, तिथेच त्यांचे देहावसान झाले.

रत्नाकर मतकरी यांनी १९५५ मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 'वेडी माणसं' या एकांकिकेपासून लेखनाची सुरुवात केली. ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रसारित झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी सुरु झालेला लेखनाचा प्रवास ८१ व्या वर्षापर्यंत अव्याहतपणे सुरु होता. मात्र या कोरोनारूपी राक्षसाशी लढण्यात ते अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा पसरली असून बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.