पाकिस्तानला भयभीत व्हावेच लागेल- वायुसेनाप्रमुखांचा इशारा

18 May 2020 16:53:01

ACM_1  H x W: 0

पाकिस्तानला भयभीत व्हावेच लागेल- वायुसेनाप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली : भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ला झाल्यास त्यांना (पाकिस्तानला) भयभीत व्हायलाच हवे. मात्र, भयापासून स्वत:चा बचाव करायचा असल्यात भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणे त्यांना बंद करावे लागेल. कारण पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करण्याची वेळ आल्यास भारतीय वायुसेना त्यासाठी सदैव तयार आहे, असा इशारा वायुसेनाप्रमुख एअरचीफमार्शल आरकेएस भदौरिया यांनी पाकिस्तानला सोमवारी दिला.

 
वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया म्हणाले की, आमच्या भूमीवर जेव्हाही दहशतवादी हल्ला होईल, तेव्हा पाकिस्तानला भिती आणि चिंता वाटायलाच हवी. या भितीपासून मुक्ती हवी असेल तर त्यांनी भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणे थांबवायला हवे, अशा शब्दात त्यांनी पाकला तंबी दिली.

त्याचप्रमाणे सीमापार अथवा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ, लाँचपॅड उध्वस्त करण्यासाठी पुन्हा एखदा बालाकोटसारखा एअरस्ट्राईक करण्याची भारताची तयारी आहे का; या प्रश्नाचे उत्तर देताना वायुसेनाप्रमुख म्हणाले की, तशी परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय वायुसेना पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करण्यास २४ तास तयार आहे.

 

काश्मीरमधील हंदवाडा येथे या महिन्याच्या सुरुवातीस दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याचे पाच सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर पाकिस्तानविरोधात पुन्हा एकदा सर्जिकल अथवा एअरस्ट्राईकसारखी कारवाई करण्याची गरज असल्याचे वातावरण भारतात तयार झाले आहे. त्याचप्रमाणे या चकमकीनंतर भारत आपल्याविरोधात लष्करी कारवाई करेल, अशी भिती पाकिस्तानात निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तसे बोलूनही दाखविले होते.

 

दरम्यान, लडाखमध्ये चीनकडून भारतीय हवाई हद्दीचा भंग झाल्याविषयी ते म्हणाले की, या क्षेत्रात ज्या काही हालचाली झाल्या आहेत, त्या सर्वसामान्य नक्कीच नव्हत्या. अशा घटना घडतात तेव्हा त्यावर बारिक लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई केली जाते. त्यामुळे भारतीय हवाईहद्दीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने तो प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे भदौरिया यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0