बीडमध्ये वनवासी कुटुंबातील तिघांची हत्या; प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही!

    दिनांक  18-May-2020 13:50:11
|
Beed_1  H x W:पारधी कुटुंबातील दोन मुलांची त्यांच्या वडिलांसाहित हत्या; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा कुटुंबाचा आरोप


बीड : महाराष्ट्रातील बीडमध्ये बऱ्याच वनवासी समाजाचे वास्तव्य आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु असून या संकटामुळे समाजातील अनेक घटकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच काळात वनवासीसमाजावर अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बीडमध्ये पारधी समाजाच्या एका कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे.


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील बाबू आणि त्यांची दोन मुले प्रकाश व संजय या तिघा बापलेकांची १३ मे रोजी शेतीच्या वादातून तलवार आणि कुऱ्हाडीचे वार करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. एलआरओने पोस्ट केलेल्या व्हिडीओत या कुटुंबीयांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. हत्येनंतर न्याय मागणाऱ्या या कुंटुंबाला त्रास दिला गेल्याने भीतीने त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील कर्त्या पुरुषांचा जीव घेतल्यानंतर, स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला गेल्याचे त्यांनी सांगितले.

या कुटुंबातील वंदना यांनी आपली आपभिती व्यक्त केली आहे. ‘गावतील लोकांनी मारहाण करत आम्हाला गावाबाहेर काढले आहे. लहानमुलांसह आम्ही रानावनातून भटकत आहोत. आमच्या मागे ते लोक गाडीने येत असून ते आम्हाला त्रास देणार आहेत. रात्रभर दारू पिऊन त्या लोकांनी कुटुंबाला त्रास दिला आहे. जवळच्या पोलीस ठाण्यात या कुटुंबाने मदतीची विनंतीदेखील केली मात्र तिथून त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला गाववाले त्रास देत असून आम्हाला दुसऱ्या गावी पोहचवा अशी मागणी पोलिसांना केली. मात्र आत रात्र झाली आहे आता तुम्ही घरी जा, उद्या सकाळी बघू, असे उत्तर पोलिसांनी दिले. सकाळी पुन्हा पोलिस ठाण्याकडे जात असताना गावकऱ्यांनी त्यांना मारण्यास सुरुवात केली,’ असे या कुटुंबाने म्हंटले आहे.


लहान मुलांसह हे कुटुंब रानावनातून पायपीट करत असून, जवळ खाण्यास पुरेसे धान्यदेखील नसल्याने आपलं पुढे काय होणार ही चिंता त्यांना लागून राहिली आहे. त्याचबरोबर हे प्रकरण प्रशासनाकडून दाबले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. एलआरओने या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री, आदिवासी भटके विमुक्त आयोग यांनापत्र लिहित या प्रकरणी चौकशी व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी मदत मागितली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.