नव्या जगाचे आशास्थान भारत

    दिनांक  17-May-2020 20:48:17   
|


Lava Company_1  

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या लावा इंटरनॅशनल या कंपनीने चीनमधून पाय काढता घेतला आहे. ही कंपनी आगामी काळात भारतात आपली गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीच्या माध्यमातून भारतात करण्यात येणार आहे.संकटकाळ आला असता दोन बाबी प्रकर्षाने समोर येत असतात. एक म्हणजे प्रस्थापित व्यवस्था सक्षम होते किंवा कोलमडते आणि दुसरे म्हणजे नवे नेतृत्व किंवा आशास्थान जन्मास येते. कोरोना या जागतिक संकटानंतर जगात आज दुसरी बाब प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. एक भारतीय म्हणून जग भारताकडे नवे आशास्थान म्हणून पाहत आहे, याचा नक्कीच अभिमान वाटतो. आजवर जगात अमेरिका पश्चात चीन हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कणा समजला जात होता. त्यामुळे चीनचे दक्षिण आशियातदेखील प्राबल्य वाढण्यास मदत झाली होती. यातूनच भारत विरोधी भूमिका घेणे, भारत विरोधी भूमिकेसाठी पाकिस्तानला साहाय्य करणे, जागतिक स्तरावर आपला दबदबा कायम करणे असे उद्योग चीनचे सातत्याने चालू असे. एकाप्रकारे चीनने आपल्या आर्थिक सक्षमतेच्या बळावर जागतिक राजकारण, सुरक्षा आणि ध्येयधोरणे यावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोरोना संकटाचा उद्गाता आणि आजवरच्या त्याच्या कृत्यामुळे जगाचा रोष आज चीनवर आहे. अशावेळी सद्विवेकी वर्तन, शांतता आणि संयम हे मूळ धोरण याला फाटा न देता भारताने जगात आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळे आज भारतास विश्व आदराचे स्थान मिळत असल्याचे सहज दिसून येते. 
 
कोरोना विषाणूसंदर्भात अमेरिकेत झालेले संशोधन आणि इतर माहिती चीनने चोरल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी नुकताच केला आहे. अमेरिकेच्या तपास संस्थांनीही असाच आरोप करत चीन सरकारकडून हॅकिंग होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यातच जगावर घोंघावणार्‍या कोरोना संकटात ‘खोटेपणा, दिशाभूल आणि लपवाछपवी’ करणारी माहिती प्रसारित करणे, जगभर संसर्ग पसरविणे याबद्दल अमेरिकेने चीनला जबाबदार धरल्याचेदेखील वृत्त आहे. यासाठी अमेरिकेने १८ मुद्द्यांची योजना तयार केली असून चीनमध्ये असणार्‍या आपल्या कंपन्या माघारी बोलविण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी अमेरिकेने भारताशी लष्करी संबंध दृढ करण्यास प्राधान्य दिले आहे. चीन सरकारने त्यांच्या स्वत:च्या नागरिकांना छळछावणीत टाकले, अमेरिकेचे तंत्रज्ञान चोरले आणि अमेरिकेच्या मित्रदेशांचीही स्वायत्तता धोक्यात आणली,’ असे मसुदा सादर करताना सांगण्यात आले आहे. त्यातच बीजिंगमध्ये २०२२मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धा मागे घेण्याची विनंती ऑलिम्पिक समितीला करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. या योजनेत प्रशांत महासागरात संरक्षण यंत्रणा निर्माण करणे, अमेरिकी लष्कराला तातडीने २० अब्ज डॉलरचा निधी देणे, भारत, तैवान आणि व्हिएतनामबरोबर लष्करी संबंध अधिक दृढ करणे, लष्कर उभारणीसाठी जपानला प्रोत्साहन देणे, जपान आणि दक्षिण कोरियाला लष्करी साहित्य पुरविणे, चीनमधील अमेरिकी उत्पादन कंपन्यांना माघारी बोलाविणे, चीनवरील अवलंबित्व कमी करणे, अमेरिकी तंत्रज्ञान चोरी करण्यापासून चीनला रोखणे, सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे, चिनी कंपन्यांवर निर्बंध आणणे, चीन सरकारवर निर्बंध आणणे, चीनमधील गुंतवणूक काढून घेणे अशा प्रकारच्या धोरणांचा समवेश करण्यात आला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या लावा इंटरनॅशनल या कंपनीनेदेखील चीनमधून पाय काढता घेतला आहे. ही कंपनी आगामी काळात भारतात आपली गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीच्या माध्यमातून भारतात करण्यात येणार आहे.
 
अमेरिकेने उचललेली पावले, भारतात येऊ इच्छिणार्‍या कंपन्या यांचा विचार केल्यास भारत आता जगासाठी आशास्थान म्हणून समोर येत आहे. संकटकाळात भारताने ज्या प्रगल्भतेने परिस्थिती हाताळली. तसेच, आजवर जागतिक स्तरावर भारताने भारताचे जे सादरीकरण केले त्याचीच परिणती म्हणजे आजचे भारताचे स्थान आहे असे वाटते. स्वदेशीला चालना आणि आत्मनिर्भरता यामुळे एक प्रकारे जगातील कोणत्याही राष्ट्रावर आगामी काळात भारत संपूर्णत: अवलंबून राहणार नाही याची खात्रीदेखील भारतीयांना मिळत आहे. त्यामुळे न करो पण भविष्यात पुन्हा असे काही संकट आल्यास भारताचे आज वाढलेले महत्त्व कमी होण्याची शक्यतादेखील यामुळे धूसर वाटते. त्यामुळे आशास्थान म्हणून जरी हिंदुस्तान समोर आला तरी, चीनच्या स्थितीत जसे सध्या स्थित्यंतरे दिसून येत आहेत. तसे भारताच्या बाबतीत तरी दिसणार नाहीत इतका प्रगल्भ विचार सध्या भारत नक्कीच करत आहे.

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.