धारावीतील पाच हजार उद्योग ठप्प ; शासनाचे दुर्लक्ष

    दिनांक  17-May-2020 16:20:26
|

dharavi_1  H x
मुंबई : लॉकडाऊनमुळे घरात कोंडून घेण्याची वेळ, उद्योगधंदे बंद मुळे उपासमार आणि लॉकडाऊन उठण्याची शाश्वती नसल्याने परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या राज्यात स्थलांतर केल्यामुळे धारावीतील सुमारे पाच हजारांहून अधिक उद्योग ठप्प होणार आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून मुंबईसह राज्यात सर्वत्र उद्योगधंदे ठप्प आहेत. धारावीतील सुमारे पाच हजारांहून अधिक उद्योगधंदे ठप्प आहेत. या उद्योगात काम करणाऱ्या परराज्यातील मजुरांनी कोरोना आणि उपासमारीने मरण्यापेक्षा गावी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या स्थलांतरामुळे येथील लघुद्योगांपुढे पेच निर्माण झाला आहे. ते पुढे अधिक काळ ठप्पच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. येथे दररोज ५० च्या आसपास रुग्ण सापडत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या भीतीने रोजगार बंद झाल्याने येथील मजुरांनी स्थलांतर केले आहे. हे उद्योग पुन्हा सुरू होतील की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लॉकडाऊनची पहिली घोषणा झाली तेव्हा एकवीस दिवसांनी उद्योग सुरू होतील यासाठी मजुरांनी वाट पाहिली. मात्र पुन्हा ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा होताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. काही कामगारांनी येथील कोणत्याही यंत्रणेला न कळविता थेट गावचा रस्ता धरला. कोणा मिळेलत्या वाहनाने गावाकडे मार्गक्रमणा केली, तर कोमा कुटुंबकबिल्यासह `पाऊले चालती मायभूमीची वाट` अशा प्रमाणे गावचा रस्ता धरला.
 
येथील मजूर असंघटित आहे. प्रशासनाकडे त्यांची नोंद नाही. त्यामुळे अनेक कामगारांनी गावाकडचा रस्ता धरला, तर काहींनी रस्त्यात रखडपट्टी नको म्हणून शासनाच्या मान्यतेने गावी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या धारावीतील १ लाख ३० हजार मजुरांनी गावी जाण्यासाठी संबंधित कार्यालयात फॉर्म भरले आहेत. त्यामुळे येथील मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहेत. धारावीतील घराघरात लघुद्योग आहेत. यात लाखो मजूर काम करीत आहेत. दररोज १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. उद्योग बंद असल्याने ही उलाढाल ठप्प आहे.
शासनाचे दुर्लक्ष
 
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीकडे पाहिले जाते. पण धारावीला आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात नाही, अशी या भागातील उद्योगधंद्याच्या मालकांची खंत आहे. आतापर्यंत सुमारे २ लाख मजुरांनी स्थलांतर केल्याचे समजते. धारावीत राहणाऱ्या सुमारे १२ लाख लोकसंख्येपैकी बहुतांश नागरिक लघुद्योगाशी जोडलेले आहेत. मात्र मजूरच नसल्याने आणि स्थलांतर केलेले मजूर लवकरच परतण्याची शक्यता नसल्याने येथील उद्योगधंदे ठप्प होण्याची शक्यता आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.