भारताला व्हेंटिलेटर पुरवण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा!

16 May 2020 10:24:48

donald trump_1  


भारत-अमेरिका मिळून कोरोनावर लस शोधतील, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास


वॉशिंग्टन : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प भारताला व्हेंटिलेटर आणि कोरोनावरील लसीच्या विकासासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


कोरोनाविरोधाच्या लढाईत अमेरिका भारताला व्हेंटिलेटर देईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन सांगितले आहे. “कोरोनाविरोधाच्या लढाईत अमेरिका भारतासोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. मला सांगायला आनंद होत आहे की, अमेरिका भारताला व्हेंटिलेटर देणार आहे. याशिवाय भारत आणि अमेरिका एकत्र मिळून कोरोनावर लस विकसित करु. अदृश्य कोरोना विषाणूला नष्ट करु”, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.





यापूर्वी भारताने कोविड १९ च्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेला मदतीचा हात पुढे करत हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध दिले होते. अमेरिकेत कोरोनाचे संक्रमण आणि बळींचा आकडा सर्वाधित आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ८७ हजार जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख लोकांना त्याचे संक्रमण झाले आहे. अमेरिकेत नागरिकांकडून लॉकडाउन हटवण्यासाठी आंदोलने केली गेल्याचे दिसून आले होते. तसेच अमेरिका वारंवार चीनवर निशाणा साधत असून त्यांनीच कोरोनाची उत्पत्ती केल्याचा आरोप लावला आहे.


Powered By Sangraha 9.0