क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी वानखेडे स्टेडियम मागणी!

16 May 2020 12:10:34

Wankhede Stadium_1 &


मुंबई महानगर पालिकेचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र


मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होते आहे. मुंबईत वाढत्या रुग्ण संख्येमुळे आता जागा अपुरी पडत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण वाढला आहे. यासाठीच मुंबई महानगरपालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा देण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे.


वानखेडे स्टेडियमचे रुपांतर महापालिकेच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी आणि कोरोना व्हायरस एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी एक सेंटर बनवण्याचा बीएमसीचा मानस आहे पालिकेने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमला विलगीकरण सेंटरमध्ये रूपांतरित करण्याच्या मागणीचे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिले आहे. या मैदानाचा वापर मुंबईच्या ‘ए’ प्रभागात राहणाऱ्या आपत्कालीन कर्मचार्‍यांसाठी आणि कोविड-१९ पॉझिटिव्ह रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी केला जाईल, असे या पत्रात म्हटले आहे.


या जागेचे जे काही भाडे असेल तेही बीएमसीकडून वेळोवेळी दिले जाईल असेही या पत्रात लिहिले आहे. बीएमसीने पुढे म्हटले आहे की, हे अधिग्रहण तात्पुरते असणार आहे आणि त्यामुळे या मैदानाबाबत कोणताही कायदेशीर हक्क बीएमसीकडे राहणार नाही. वानखेडेमधील क्लब हाऊस, हॉल, हॉटेल ,इतर खोल्या यांचा वापर महापालिकेला रुग्णखाटा ठेवण्यासाठी होईल, असे या पत्रात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0