‘अफलातून टायमिंग’चा स्टेशन मास्तर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2020
Total Views |

kishore pradhan_1 &n


नव्या कलाकारांचे कौतुक करणारे, वरकरणी गंभीर दिसणारे, पण आतून तितकेच खट्याळ आणि अंगभूत अभिनयाच्या जोरावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे उत्तम विनोदी अभिनेते म्हणजेच किशोर प्रधान.



साधारण २०१३चा हा अनुभवप्रसंग. एका दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता.त्या कार्यक्रमासाठी अनेक लेखक व मान्यवर उपस्थित राहणार होते. ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते, ती व्यक्ती वेळेच्या आधी येऊन थांबली होती. एकदम साधे राहणीमान. सुरुवातीला मी त्यांना ओळखलेच नाही. जेव्हा प्रकाशन झाले आणि ते बोलायला लागले, तेव्हा मला त्यांच्यात दडलेला खरा कलाकार दिसला.आपण कसेही दिसत असलो, तरी आपले ज्ञान व कला ही सर्वश्रेष्ठ असते, हे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. नंतर मला कळले की, ते स्वतः उत्तम वाचक असल्याने त्यांना अशा कार्यक्रमांना हजेरी लावायला आवडते. त्यावेळी पण ते कुठलेही मानधन न घेता, स्वखर्चाने त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रेक्षकांना निखळ हसविण्यासाठी तुमच्या देहबोलीतून, एखाद्या सहज बोललेल्या वाक्यातून, टाकलेल्या निव्वळ कटाक्षातून किंवा चेहर्‍यावरील भावांतून प्रेक्षकांना हसविता येते, हे आपल्या सशक्त आणि सहज अभिनयाने सिद्ध करणार्‍या, उदारमतवादी व गर्व नसणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे माणूसप्रेमी कलावंत किशोर प्रधान.


किशोर प्रधान या दिग्गज अभिनेत्याचा जन्म दि.१ नोव्हेंबर १९३६ रोजी नागपूरच्या प्रतिष्ठित, सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचं होतं. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाटकवेड्या.त्या नाट्यछटा लिहिणार्‍या आणि बसविणार्‍या होत्या. त्या काळात त्या नाटकातून काम करायच्या. नाटक बसवायच्या. विदर्भ साहित्य संघासाठी त्यांनी ‘एकच प्याला’ बसविले होते. घरी नाटकाच्या तालमी चालायच्या. प्रधान यांचे वडील अमृतराव प्रधान (त्या वेळच्या ‘अमृत फार्मसी’चे मालक) यांचाही पत्नीला पूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचं बाळकडू मिळालं. घरातल्या नाटकाच्या तालमी पाहात ते मोठे झाले. नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केलं आणि नंतर मुंबईत येऊन त्यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची ‘रिसर्च स्कॉलरशिप’ मिळविली आणि ‘मास्टर ऑफ सोशल सायन्सेस’ ही पदवी मिळवून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी महाविद्यालयात असताना वेगवेगळ्या स्पर्धांमधून, अनेक एकांकिकांमधून व नाटकांमधून कामं केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही त्यांनी अनेक बालनाट्ये आणि नाटके केली. पुढे ते ‘ग्लॅक्सो कंपनी’त नोकरी करु लागले. पण, अंगातली कला आणि नाटकाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात सतत नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून, वांद्य्राच्या एमआयजी कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी ‘नटराज’ ही नाट्यसंस्था सुरु केली आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करायचं ठरवलं.




नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की, ‘एमआयजी’ कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बस स्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून त्यांनी पसंत केले. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याचकडे आली. आधी पसंत केलेल्या तीन-चार नायिकांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळे भीतभीतच किशोर प्रधान आपल्या तीन-चार मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण, त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यांत कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर हे नाटक आलं, प्रयोग तुफान रंगला. तो पाहून श्याम फडके यांनी नवीन नाटक लिहून दिलं, ते म्हणजे ‘काका किशाचा.’ त्या नव्याकोर्‍या नाटकाचं दिग्दर्शन किशोर प्रधान यांनीच केलं. त्या काळातल्या अनेक स्पर्धांमधून त्या नाटकाला अभिनय, दिग्दर्शनासाठी भरघोस पारितोषिकं मिळाली. नाटकाच्या प्रसिद्धीमुळे ’यशवंत पगार’ हे नाट्यनिर्माते प्रधानांकडे आले आणि त्यांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याविषयी निमंत्रण दिलं. नाटकाचे सुमारे 200च्यावर व्यावसायिक प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ असायचा. ‘काका किशाचा’ या नाटकामुळे त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर नाटकातून काम करण्यासाठी आणि नाटक बसविण्यासाठी बोलावणी येऊ लागली.



’कल्पनेचा खेळ’, ’काका किशाचा’, ’घरोघरी मातीच्या चुली’, ’तीन चोक तेरा’, ’ती पाहताच बाला’, ’पळता भुई थोडी’, ’प्रीतिच्या रे पाखरा’, ’बेबी’, ’भुतावळ’, ’मिळाली परी तरी ब्रह्मचारी’, ’या घर आपलंच आहे’, ’रात्र थोडी सोंगं फार’, ’लागेबांधे’, ’हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ’जेव्हा यमाला डुलकी लागते’, ’झाकली बाई सव्वा लाखाची’, ’तात्पर्य’, ’ती पाहताच बाला’, ’ब्रह्मचारी असावा शेजारी’, ’मालकीण’, ’मालकीण दार उघड’, ’युवर्स फेथफुली’, ’लागेबांधे’, ’लैला ओ लैला’, ’संभव-असंभव’, ’हनिमून झालाच पाहिजे’, ’हँड्स अप’ अशी अनेक व्यावसायिक नाटके त्यांनी सादर केली. काही नाटके दिग्दर्शित केली, तर काही नाटकांमध्ये उत्कृष्ट अभिनयाबरोबरच कल्पक दिग्दर्शनही केलं. मराठी नाटकांबरोबरच त्यांनी 18 हून अधिक इंग्रजी नाटकांत अप्रतिम भूमिका केल्या. ’आत्माराम भेंडें’ सारख्या दिग्गज कलाकारासोबत त्यांची विशेष जोडी जमली. त्या दोघांनी मिळून अनेक नाटकं गाजवली. याच कालावधीत त्यांना मराठी चित्रपटाच्याही ‘ऑफर्स’ येत होत्या. पण, तेव्हा मराठी चित्रपटांचं चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचं.


तसंच ते सलग काही दिवस असल्याने नोकरीतून रजा घेऊन जाणं शक्य नसल्याने त्यांनी तेव्हा चित्रपट नाकारले. नोकरीमुळे त्यांना नाटकांचे जास्त प्रयोग करता येत नव्हते. एकदा त्यांनी मेकअपरूममधील चर्चा ऐकली आणि नाटकांचे प्रयोग थांबविले. कारणही तसेच होते. नाटकावर जगणार्‍या अनेकांना किशोरकाकांनी खूप प्रयोग करावे असे वाटायचे. पण, नोकरीमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. जेव्हा त्यांना ही गोष्ट कळली की, आपण आपली हौस पूर्ण करण्याच्या नादात बॅकस्टेज कलाकारांचे नुकसान करतोय, तेव्हा त्यांनी नाटक सोडण्याचा निर्णय घेतला. पण, निवृत्तीनंतर मात्र त्यांनी ’उचला रे उचला’, ’कशाला उद्याची बात’, ’खिचडी’, ’गॉड ओन्ली नोज’, ’छोडो कल की बातें’, ’जब वी मेट’, ’जिगर’, ’डॉक्टर डॉक्टर’, ’नवरा अवली बायको लव्हली’, ’नवरा माझा ब्रह्मचारी’, ’नाना मामा’, ’प्राईम टाईम’, ’फॅमिली कट्टा’, ’त्याचा बाप तिचा बाप’, ’भिंगरी’, ’मस्ती एक्सप्रेस’, ’मामा भाचे’, ’मास्तर एके मास्तर’, ’मीराबाई नॉट आऊट’, ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ’रफ्तार’, ’रानपाखरा’, ’रूल्स-प्यार का सुपरहिट फॉम्युला’, ’लगे रहो मुन्नाभाई’, ’लाडीगोडी’, ’लालबाग परळ’, ’वन रूम किचन’, ’वरचा मजला रिकामा त्याचा’, ’शहाणपण देगा देवा’, ’शिक्षणाच्या आईचा घो’, ’शेजारी शेजारी’, ’सिटी ऑफ गोल्ड’, ’स्टेपनी’, ’हॉर्न’, ’ह्यांचा काही नेम नाही’ अशा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांना मनमुराद हसायला लावलं. त्यातही, ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधला खट्याळ म्हातारा, ‘जब वुई मेट’ मधला ‘स्टेशन मास्तर’ प्रेक्षकांच्या कायमचा लक्षात राहिला. या भूमिका छोट्या असल्या तरी ते त्या भूमिकांमधून आपली छाप पाडून गेले.


मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर दूरदर्शनवरून ‘निरोप’ हे पहिलं मराठी नाटक सादर झालं, त्यात किशोर प्रधान यांची भूमिका होती. पुढे दूरदर्शनच्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. याकुब सईद यांच्यासमवेत सादर झालेल्या ‘हास परिहास’ कार्यक्रम ते होते. दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘गजरा’ हा कार्यक्रम त्यांनी त्यांची अभिनेत्री पत्नी ’शोभा प्रधान’ यांच्यासह सादर केला. ’अदालत’, ’जबान संभाल के’, ’सीआयडी’अशा काही मालिकांमधूनही त्यांनी छोटा पडदा उजळवून टाकला. किशोर प्रधान आणि अभिनेते विजू खोटे यांची मैत्री भन्नाट होती. ते दोघे अनेक सिनेमांमध्ये एकत्र झळकले. जेव्हा शूटिंग नसायचे, तेव्हाही ते भेटायचे. विजूकाकांना खाण्याची प्रचंड आवड असल्याने ते किशोर प्रधान यांना सोबत घेऊन विविध हॉटेलात जायचे. तसेच किशोर काकांचे आणखी एक लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे विनोदी अभिनेता समीर चौघुले. समीर चौघुले यांचे इंग्रजी रंगभूमीवरचं पाहिलं पाऊल पडलं ते भरत दाभोळकर लिखित-दिग्दर्शित ’मंकी बिझनेस’ या नाटकात. किशोर प्रधान या अभिनेत्याची ‘रिप्लेसमेंट’ म्हणून. किशोर सरांना थोडा ताप आला होता, त्यामुळे समीर यांना तो प्रयोग करायला मिळाला. तेव्हा ते खूप चिंतेत होते. इंग्रजी नाटक, त्यात समीरजी मराठी मीडियमचे. आजूबाजूला विहंग नायक, विजू खोटे, भरत दाभोळकर ही मातब्बर आणि ज्येष्ठ मंडळी आणि सर्वात मोठं टेन्शन होतं की, किशोर प्रधानांसारख्या ज्येष्ठ दिग्गज नटाने 500 प्रयोग चोपून साकारलेली भूमिका समीरजी करणार होते. प्रयोगाच्या आधी दहा मिनिटे नाटकाचा मॅनेजर आला आणि त्याने समीर चौघुले यांच्या हातात फोन दिला आणि म्हणाला, “किशोर सर आहेत.” तेव्हा किशोर सर फोनवर समीर यांना म्हणाले, “तू तालमीत मस्त काम करतोयस, असं भरत (दाभोळकर) म्हणाला. मी हात जोडतो. प्लिज इतकंही छान काम करू नकोस की, मला घरी बसवतील. माझे ही होमलोन, कारलोन आणि इतर ईएमआय आहेत, प्लिज...” या वाक्यानंतर समीरजी खूप हसले आणि क्षणभरात ते रिलॅक्स झाले आणि तो प्रयोग यादगार झाला. त्या नंतर समीरजी आणि किशोरकाका यांची मैत्री ही कायमची जुळली. त्यानंतर मग दोघांनी ’तमाशा मुंबई स्टाईल’, ’कॅरी ऑन हेव्हन’, ’बेस्ट ऑफ बोटम्सअप’ अशी अनेक नाटके केली.



‘ग्लॅक्सो’मध्ये 28 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर 1994 मध्ये किशोर प्रधान ‘ऑर्गनायझेशन अ‍ॅण्ड मेथड’ विभागाचे ‘अखिल भारतीय व्यवस्थापक’ या पदावरून निवृत्त झाले. नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी, दौरे त्यांनी केले. नाटकाविषयीचं प्रेम त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नसे. अफलातून टायमिंग आणि अंगभूत अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून स्वत:चा वेगळा ठसा उमटवणार्‍या या ज्येष्ठ विनोदी अभिनेत्याने जगाच्या रंगभूमीवरून दुर्दैवाने १२ जानेवारी २०१९ रोजी कायमची ‘एक्झिट’ घेतली.अनेक नवीन कलावंतांच्या मराठी नाटकाला आवर्जून येऊन कौतुक करणारा, वरकरणी गंभीर दिसणारा, पण आतून तितकाच खट्याळ असणारा ज्येष्ठ मित्र, अभिनेते किशोर प्रधान म्हणजे भन्नाट माणूस. प्रेक्षकाची नस ओळखून त्याला हसायला लावणे हे मोठे आव्हान विनोदी अभिनेत्यासमोर असते. हे आव्हान जो लीलया पेलतो आणि प्रेक्षकांना निखळ हसवितो, आनंद देतो तो खरा विनोद आणि तोच खरा विनोदी अभिनेता, असं मानणार्‍या या जबरदस्त अभिनेत्याला मानाचा मुजरा...


- आशिष निनगुरकर
@@AUTHORINFO_V1@@