लोकमान्य गजाआड झाल्यानंतर... (उत्तरार्ध)

    दिनांक  16-May-2020 23:03:05
|

lokmanya tilak_1 &nbमंडालेत कॉलराची साथ पसरल्यानंतर टिळकांना मिकटिल्ला कारागृहात काही काळासाठी हलवण्यात आले. त्यावेळी त्यांचे स्वयंपाकी कुलकर्णीही सोबत होते. स्टेशनवर त्यावेळी हजारो टिळकभक्त जमले होते आणि ‘लोकमान्य टिळक महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. टिळकांच्या जयघोषार्थ जमलेली गर्दी पाहून मिकटिल्लाच्या जेलरने टिळकांना विचारले, “आपण कोणत्या देशाचे राजे आहात?” टिळक उत्तरले, “अहो, मी या साडेतीन देहाचा राजा नाही. माझे असे राज्य कोठून असणार?
मंडालेच्या कारागृहात असताना राजकारणाबद्दल लिहिण्या-बोलण्यास टिळकांना सक्त मनाई होती. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पत्रात राजकीय असे काहीच सापडत नाही. एकदा त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात एक शब्द असा होता की, ज्याचा अर्थ सुपरीटेंडंटला नीटसा लागेना. यात नक्कीच काहीतरी विशेष मजकूर टिळकांनी लिहिला असणार, या भीतीने त्यांनी टिळकांचे पत्रच रद्द ठरवले आणि टिळकांना चक्क दुसरे पत्र लिहायला सांगितले, केवळ त्या एका शब्दामुळे! पत्र परत पाठवल्याचे समजल्यावर टिळकांनी काढलेले उद्गार अर्थपूर्ण आहेत. ते म्हणाले, “परवशता शतगुणे करी जाच!” एरवी टिळक म्हटलं की, स्वराज्य एके स्वराज्य! पण, इथे मंडालेत मात्र ‘स्वराज्य’ शब्द उच्चारायला बंदी! म्हणूनच की काय, कुटुंबवत्सल टिळकांचे निराळे रूप या निमित्ताने टिळकांनी लिहिलेल्या पत्रातून तुम्हा-आम्हाला बघायला मिळते.
सत्यभामाबाईंचा मृत्यू टिळकांच्या जिव्हारी लागला हे मागे बघितलेच. आपण मंडालेत असलो तरी आपल्या माघारी मुलांची काळजी करायला त्यांची आई आहे, ही गोष्ट टिळकांच्या मनाला समाधान देत होती. पण, आता आईही या जगात नाही आणि बाप देशासाठी तुरुंगात गेलेला, अशा अवस्थेत टिळकांची मुले सैरभैर झाली. मुलांना टिळकांनी लिहिले, “अशावेळी तुमची आई जावी हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. आता मला सर्वात जास्त काळजी कशाची असेल, तर तुमच्या शिक्षणाची आणि प्रगतीची. मागे राहिलात तर तुमच्या आयुष्याचे नुकसान होईल.”

त्यांची कन्या मथु अभ्यासात हुशार होती. मात्र, रामभाऊ आणि बापू या दोघांचेही शिक्षणात फार लक्ष लागत नाही, हे वाचून टिळक अस्वस्थ होत. आपले भाचे धोंडोपंत यांना लिहिलेल्या पत्रातून मुलांच्या प्रगतीपुस्तकाच्या नोंदी टिळक प्रत्येक सहा महिन्याला मागवत. त्यांच्या अभ्यासाला गती यावी यासाठी उपायही सांगत. अभ्यासाबरोबर मुलांच्या व्यायामातही कुठलीही कसूर ठेवू नये, याबद्दलही टिळक कटाक्षाने लिहित. मुलांचे वजन आणि उंची किती वाढली, याबद्दल टिळकांनी एका पत्रात विचारले आहे. मंडालेच्या तुरुंगातून टिळकांच्या मुलाने लिहिलेल्या पत्रात इंग्रजीच्या व्याकरणाच्या दोन चुका काढलेल्या सापडतील. रामभाऊने लिहिलेल्या आठ ओळींमध्ये व्याकरणाच्या दोन चुका आहेत, असं सांगून टिळकांनी त्या चुका कोणत्या आहेत आणि त्या दुरुस्त कशा कराव्या, हेही लिहून पाठवलेले दिसेल. इतिहास, गणित, इंग्रजी आणि संस्कृत हे विषय मुलांना सोप्या पद्धतीने कसे शिकवावेत, याबद्दल काही विशेष टिप्स टिळकांनी एका पत्रात मुलांच्या शिक्षकांसाठी खास लिहून पाठवलेल्या सापडतील. सोबत त्यांनी मुलांना कळकळीने केलेला उपदेश असा आहे की, “मुलांनो, कष्ट करा आणि विविध विषयांवर प्रभुत्व मिळवा, म्हणजे तुम्हाला चिरंतन टिकणारे सुख मिळेल. आपण काही श्रीमंत नाही, पण विद्या हे आपले बलस्थान आहे आणि शिक्षणाकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर जगात तुम्हाला कुणीही विचारणार नाही.”


मंडालेत कॉलराची साथ पसरल्यानंतर टिळकांना मिकटिल्ला कारागृहात हलवण्यात आले. त्यावेळी त्यांचे स्वयंपाकी कुलकर्णीही सोबत होते. मंडालेच्या स्टेशनवर त्यावेळी हजारो टिळकभक्त जमले होते आणि ‘लोकमान्य टिळक महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. अत्यंत गुप्ततेने टिळकांना हलवण्याचा सरकारचा बेत फसलाच. टिळकांच्या जयघोषार्थ जमलेली गर्दी पाहून मिकटिल्लाच्या जेलरने टिळकांना विचारले, “आपण कोणत्या देशाचे राजे आहात?” टिळक उत्तरले, “अहो, मी या साडेतीन देहाचा राजा नाही, माझे असे राज्य कोठून असणार?” तुरुंगवासाच्या काळात दादासाहेब खापर्डे यांची भेट टिळकांना सुखवणारी वाटली. दादासाहेब टिळकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत जवळपास दोन वर्ष विलायतेला खटपट करत होते. टिळक लिहितात, “रा. खापर्डे यांची मी खूप दिवस वाट पहात होतो. ते आले आणि गेले. या तुरुंगवासातील कंटाळवाण्या आयुष्यात त्यांची भेट स्वप्नासारखीच वाटली. त्यांनी माझ्यासाठी जे केले त्याहून जास्त दुसरे कुणीही करू शकले नसते. त्यांनी केलेल्या प्रयत्नात यश आले नाही याचे कारण ती केस टिळकांची होती!”एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगायला हवी. काही विशेष अटी-शर्ती लादून टिळकांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणून त्यांची शिक्षा कमी करता येऊ शकली असती किंवा ‘राजकारणात पडणार नाही‘ वगैरे अटी मान्य करून टिळक स्वतःची मुक्तता करूनही घेऊ शकले असते. टिळकांना तसा सल्लाही देण्यात आला होता. पण, या सगळ्यावर सखोल विचार करून टिळकांनी लिहिले, “तुरुंगातून सुटल्यानंतर इतर सर्व नागरिकांना मिळायला हवे असे स्वातंत्र्य मला मिळायला हवे. तुम्ही सुचवलेल्या अटी मान्य केल्या आणि मी सुटलो तरी मला तुमच्यामध्ये मेलेल्या माणसासारखे राहावे लागेल. केवळ कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी मी कधीही जगलो नाही, तर सदैव समाजासाठीचे असलेले माझे कर्तव्य बजावण्यासाठी जगलो हे सर्व तुम्हीं जाणताच. सुटल्यानंतर मुक्त नागरिक म्हणून मला राहाणे पसंत आहे. आता अटी आणि शर्ती लादून जनतेच्या कार्यापासून सरकार मला दूर ठेवणार असेल, तर ते मला नको. समान पातळीवरील देवाणघेवाण हवी. दया नको.”


टिळक मंडालेत असताना इकडे मात्र स्वराज्याची चळवळ पुरती थंडावली असली, तरी टिळक तुरुंगात आहेत याचे सामान्य लोकांवर फार खोल परिणाम झाले. लोकमान्य गजाआड झाल्यानंतर मुंबईतला मजुरांचा ऐतिहासिक संप सहा दिवस चालला, सरकारकडून तो सहजी आटपेना. भारतात सभा-निदर्शने होणे स्वाभाविक होतेच, पण भारताबाहेरच्या ‘न्यू एज’ने लिहिले की, “अटकेपूर्वी टिळक एका पक्षाचे नेते होते. आता ते लोकनेते आणि राष्ट्रीय हुतात्मा ठरले आहेत.” पोलीस कमिशनर गेल तर आपल्या वरिष्ठांना कळवून मोकळे झाले, “घरोघर टिळकांचे फोटो भिंतीवर लावले गेले असून लोक घरोघर टिळकांची पूजा करू लागले आहेत.” इकडे सामान्य लोकांनी टिळकांच्या शिक्षेचा निषेध म्हणून आपापल्या परीने काही प्रतिज्ञा कसोशीने पाळल्या. श्री. म. माटे यांनी आपले आवडते नाटक न पाहण्याची प्रतिज्ञा केली. टिळकांना शिक्षा झाली, ही बातमी सासवडच्या शाळेतील मराठीच्या महादेव सुभेदार मास्तरांना समजली. मास्तर वर्गात आले. पोरांना समजेल अशा रीतीने अत्यंत दु:खाने सद्गदित आवाजात त्यांनी ही बातमी मुलांना सांगायला सुरुवात केली आणि सांगता सांगता मास्तर हुमसून हुमसून रडूच लागले. ते पाहून पोरांच्या डोळ्यात धारा वाहू लागल्या.मास्तर कसेबसे सावरले आणि शाळा सुटल्यावर त्यांनी गावातील मंदिरात मुलांना जमायला सांगितले. शाळा सुटली. पोरे एखाद्या बाणासारखी मंदिराच्या दिशेने धावली. गंभीरपणे आणि अतिशय स्फूर्तीदायी शब्दात मास्तरांनी पोरांना टिळकांचे सगळे चरित्र सांगायला सुरुवात केली. पोरांच्या हृदयालाच त्यांनी हात घातला, शेवटाला आल्यावर भयकंपित स्वरात आल्यावर मास्तरांनी सगळ्यांना विचारले, “टिळक देशासाठी तुरुंगात गेले, ते आता सहा वर्षं तुरुंगात खडी फोडणार! पण, तुम्ही त्यांच्यासाठी, या आपल्या मातृभूमीसाठी काय करायला तयार आहात?” पेटलेली पोरं म्हणाली, “मास्तर तुम्ही सांगाल ते आम्ही करू!” पोरांच्या डोक्यावर विलायती टोप्या होत्या. मास्तर म्हणाले, “मग आपापल्या डोक्यावरच्या विलायती टोप्या द्या फेकून इथे, आणि पेटवा त्यांची होळी!” पोरांनी एकाएकी डोक्यावरून टोप्या काढल्या आणि जमिनीवर फेकल्या. ‘टिळक महाराज की जय’ म्हणत पुढच्याच क्षणी सगळ्या विलायती टोप्या जळून भस्म झाल्या. हा जयघोष करतांना पोरांची मने पेटत्या होळीपेक्षा जास्तच पेटली असतील, नाही का! पुढे, पोरांच्या घरी ही बातमी समजल्यावर व्हायचे ते झालेच. जागरूक पालकांनी सभा भरवली आणि महादेव सुभेदार मास्तरांना गावातून ताबडतोब हद्दपार केले. दुसर्‍या दिवशी पोरं सकाळी उठली तेव्हा मास्तर गाव सोडून निघून गेलेले. पोरांच्या मनावर वज्राघातच झाला. दिवसभर पोरं शाळेत न जाता संगमेश्वराच्या देवळात मास्तरांच्या आणि टिळकांच्या आठवणीत आसवं गाळीत होती. दुसर्‍या दिवशी शाळेच्या दारापाशी पोरांना अडवले गेले आणि कालच्या गैरहजेरीचा प्रसाद म्हणून छडीचे जोरदार फटके मारले गेले. यापैकी एक पोरगा मनाशी स्वतःलाच म्हणाला, “देशासाठी टिळक सहा वर्षांची शिक्षा भोगणार. मग आम्हाला टिळकांसाठी छडीचा एकेक फटका खायला काय हरकत आहे?” हा पोरगा होता, अत्र्यांचा बाबू! होय, आता महाराष्ट्र त्यांना ‘आचार्य अत्रे’ म्हणून ओळखतो!


महाराष्ट्रातील मानी माणसे मात्र आपापल्या परीने निषेध व्यक्त करत होतीच. कुणी कोटावर काळ्या पट्ट्या लावून फिरू लागले. टिळक तुरुंगात गेल्याने कुणी साखर खाण्याचे सोडले, तर कोणी टिळक सुटेपर्यंत पायात जोडे न घालण्याचा निश्चय केला. राम गणेश गडकरी म्हणू लागले, “टिळक मंडालेत गेल्यापासून समोरून येताना पाहून तोंडातली बिडी टाकून द्यावी असा एकही पुढारी सगळ्या पुण्यात उरलाच नाही.” टिळकांच्या नसण्याने कवींच्या शब्दांना हुंदके फुटले, गोविंद कवी दु:खभराने विचारू लागले,
आमुचा वसंत कुणी नेला,
टिळक विठोबा केंव्हा येईल पुण्यपुर पंढरीला?

टिळक विठोबा परतण्यासाठी 1914चा जून महिना उजाडण्याची भक्तांना वाट पाहावी लागलीच. मध्यरात्रीच्या किर्र अंधारात टिळकांना विशेष व्यवस्था करून कुणालाही खबर लागू न देता गायकवाडवाड्यासमोर आणून सोडले. वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी राखण करणार्‍या भय्याने टिळकांना ओळखलेच नाही. टिळकांनी स्वतःचा अस्सलपणा पटवून देऊन मगच आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. भरला संसार सत्यभामाबाईंच्या खांद्यावर सोडून टिळक मंडालेत गेले. सहा वर्षांनी परतल्यावर त्यांच्या स्वागताला, त्यांना डोळे भरून बघायला त्यांचे कुटुंब, अर्धांगिनी मात्र वाड्यात राहिली नाही. बाई गेल्यानंतर टिळकांनी धोंडोपंतांना सांगितले होते, “तिच्या ज्या काही वस्तू असतील, त्या एकत्रितपणे एका कपाटात ठेवून द्या. त्याची अजिबात नासधूस करू नका, काळजी घ्या.” ते तुरुंगातून घरी आल्यानंतर ज्या कपाटात आपल्या बाईंच्या सगळ्या वस्तू जमवून ठेवल्या होत्या, त्या कपाटाकडे टिळक गेले असतील का? ते कपाट उघडून बाईंच्या त्या जिनसा टिळकांनी डोळे भरून बघितल्या असतील का? त्या पाहताना टिळकांच्या डोळ्यात एखादातरी अश्रूंचा थेंब आला असेल का? की, या सगळ्या केवळ कविकल्पनाच!

- पार्थ बावस्कर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.