बौद्ध वाङ्मयात ‘आर्य’

    दिनांक  16-May-2020 21:34:52
|


buddha_1  H x W


लौकिक संस्कृत/प्राकृत साहित्यात आर्य शब्द एखाद्या वंशाचा वाचक नव्हे, तर सद्गुणांचा वाचक म्हणूनच वापरला गेल्याचे मागच्या लेखात आपण पाहिले. हा शब्दप्रयोग बौद्ध वाङ्मयात देखील सगळीकडे अतिशय मोठ्या प्रमाणावर आढळतो. याचा आता एक धावता आढावा घेऊ.

 


बौद्ध तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी

 
 

भगवान बुद्धांचा जन्म कपिलवस्तूचा राजा ‘शुद्धोदन’ आणि राणी ‘माया’ यांच्या पोटी झाला. कपिलवस्तूच्या जवळचे ‘लुम्बिनी’ हे त्यांचे जन्मस्थान. दुर्दैवाने बाळंतपणानंतर अगदी थोड्याच दिवसात मायादेवींचे निधन झाले. त्यानंतर या तान्ह्या बाळाचे पालन-पोषण मायादेवींची बहिण ‘गौतमी’ हिने आईप्रमाणे केले. बाळाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवले. तरुणपणी यथावकाश सिद्धार्थचे लग्नही झाले. त्यानंतर एके दिवशी राजपुत्र सिद्धार्थ राजवाड्याच्या बाहेर फिरत असताना स्वाभाविकपणे बाहेरच्या जगातली सगळी दु:खे त्याला पहायला मिळाली. त्यामध्ये आजारपण, म्हातारपण, मरण अशा मानवी आयुष्याच्या सर्व स्थिती त्याने पहिल्या आणि आजवरच्या त्याच्या आयुष्यविषयक सुखमय कल्पनांना छेद गेला. मानवी आयुष्यातल्या अशा विविध दु:खांचे मूळ कशात आहे, त्याचा मुळासकट उच्छेद करणे शक्य आहे का, त्याचा योग्य मार्ग कोणता, इत्यादि प्रश्नांचे उत्तर शोधायला राजपुत्र सिद्धार्थाने सरळ राजवाडा सोडला आणि वनात प्रवेश केला. प्रदीर्घ तपश्चर्या आणि आत्मचिंतनातून शेवटी सिद्धार्थाने या प्रश्नांवर उत्तर शोधलेच. या ज्ञानप्राप्तीनंतर राजपुत्र सिद्धार्थ ‘भगवान बुद्ध’ म्हणून ओळखला जाऊ लागला. काय होती ही उत्तरे?

 

चार ‘आर्य’सत्ये

 

या प्रश्नांच्या उत्तरात भगवान बुद्धांनी अतिशय मूलगामी अशी चार ‘आर्य’ सत्ये सांगितली आहेत. बौद्ध त्रिपिटक साहित्यातील ‘सुत्तपिटक – संयुत्तनिकायपालि’ मधील ‘धम्मचक्‍कप्पवत्तनसुत्त’ या सुत्तात ही चर्चा आढळते. ही सत्ये मानवी जीवनात अतिशय श्रेष्ठ स्थानी आहेत. तथागत बुद्धांनी यासाठी ‘श्रेष्ठ’ शब्दाला समानार्थी ‘आर्य’ हा शब्द वापरला. पहिले सत्य म्हणजे जगात ‘दु:ख’ अस्तित्वात आहे, ही मान्यता. जर दु:खाचे अस्तित्वच स्वीकारले नाही, तर त्यापासून सुटकेचा मार्ग तरी कसा निघणार? त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेले पहिले सत्य आहे ‘दु:ख’. हे सांगताना तथागत म्हणतात,

 

“इदं खो पन भिक्खवे दुक्खं अरियसच्चं |”

 

अर्थात “हे भिक्षुंनो, दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे”.

 

दुसरे सत्य आहे ‘दु:खसमुदय’, अर्थात दु:खाचा उदय (जन्म) ज्यातून होतो, ते कारण. भगवान बुद्ध दु:खाचे मूळ कारण ‘तृष्णा’ आहे असे सांगतात.

 

“इदं खो पन भिक्खवे दुक्खसमुदयं अरियसच्चं | यायं तण्हा पोनब्भविका नन्दिरागसहगता तत्र तत्राभिनंदिनी |”

 

अर्थात “हे भिक्षुंनो, दु:खसमुदय हे दुसरे आर्यसत्य आहे. वारंवार प्राण्यांना जन्माला घालणारी (पौनर्भविका) तृष्णा हीच दु:खाचे मूळ कारण आहे. ही (काम, क्रोध वगैरे) विषयांच्या बाबतीत अनुराग (प्रेम) ठेवणारी आणि त्यांचे अभिनंदन करणारी आहे”. जगभरात आणि आपल्या संसारात अवती भोवती ज्या विविध गोष्टी-माणसे दिसतात, त्यांच्यामध्ये आपली आसक्ती असते. ही आसक्ती म्हणजेच ‘तृष्णा’, अर्थात ‘तहान’.

 

ही आसक्ती तहान अशी सहजासहजी मिटत नाही. खूप प्रयत्नांती एखाद्या साधकाला तृष्णेवर विजय मिळवता येतो, तिला रोखून धरता येते. अशी ती रोखून धरणे म्हणजेच ‘दु:खनिरोध’. हे आहे बुद्धांनी सांगितलेले तिसरे आर्यसत्य.

 

“इदं खो पन भिक्खवे दुक्खनिरोधं अरियसच्चं | यो तस्सायेव तण्हाय असेसविरागनिरोधो चागो पटिनिस्सागो मुत्ति अनालयो |”

 

अर्थात “हे भिक्षुंनो, दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य आहे. त्या तृष्णेपासून संपूर्ण (अशेष) वैराग्य, तिचा त्याग, तिचा विलय (प्रतिनिसर्ग), तिच्यापासून मुक्ती आणि तिला अजिबात थारा न देणे (अनालय) म्हणजे दु:खनिरोध”.

 

हा ‘दु:खनिरोध’ घडवून कसा आणायचा? त्यासाठी भगवान बुद्ध एक मार्ग (मग्ग / प्रतिपद्) सांगतात दु:खाला रोखून धरण्याकडे नेणारी वाट – अर्थात ‘दु:खनिरोधगामिनी प्रतिपद्’. हे झाले चौथे आर्यसत्य.

 

“इदं खो पन, भिक्खवे, दुक्खनिरोधगामिनी पटिपदा अरियसच्‍चं | अयमेव अरियो अट्ठङ्गिको मग्गो |”

 

अर्थात “हे भिक्षुंनो, दु:खनिरोधगामिनी प्रतिपद् हे चौथे आर्यसत्य आहे. हाच आर्य अष्टांगिक मार्ग आहे”. तथागतांनी या मार्गाच्या आठ अंगांचे वर्णन केलेले आहे. त्यामध्ये ‘सम्यक् दृष्टी’, ‘सम्यक् संकल्प’, ‘सम्यक् वाचा’, ‘सम्यक् कर्मान्त’, ‘सम्यक् आजीविका’, ‘सम्यक् व्यायाम’, ‘सम्यक् स्मृति’ आणि ‘सम्यक् समाधि’ ही आठ अंगे सांगितली आहेत. म्हणून हा ‘आर्य अष्टांगिक मार्ग’. लेखनाच्या मर्यादेमुळे याच्या खोलात जाणे सध्या आपण टाळूया. जिज्ञासूंनी याचा अधिक अभ्यास इतरत्र करावा.

 

‘मध्यम’ मार्ग: यातल्या आठही अंगांचे वर्णन ‘सम्यक्’ शब्दाने केले आहे, त्याचा अर्थ आहे ‘मध्यम’ मार्ग, म्हणजे मधला पर्याय. याचे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात,

 

“द्वे भिक्खवे अन्ता पब्बज्जितेन न सेवितव्या | कतमे द्वे? यो चायं कामेसु कामसुखल्लिकानुयोगो हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो | यो चायं अत्तकिलमथानुयोगो दुक्खो अनरियो अनत्थसंहितो|”

 

अर्थात “हे भिक्षुंनो, निवृत्तिमार्गावर चालणाऱ्या माणसाने (प्रव्रजित) दोन टोकांच्या आहारी जाऊ नये. कोणती दोन टोके? एक टोक आहे काम्य गोष्टींच्या भोगाची इच्छा सतत मनात ठेवणे. हे विषयांच्या आहारी जाणे आहे. हीन, गावंढळपणाचे (ग्राम्य), अध्यात्मापासून लांब नेणारे, अनार्य आणि अनर्थकारक आहे. दुसरे टोक आहे शरीराला अत्यंत कष्ट देणे. हे सुद्धा दु:खकारक, अनार्य आणि हानीकारक आहे.” अशा दोन्ही टोकांना जाणे भगवान बुद्धांनी वर्ज्य केले आहे. या ऐवजी यांच्या मधला मार्ग पत्करावा, असे सुचविले आहे. हे सांगताना या दोन्ही टोकांचे वर्णन तथागत ‘अनार्य’ असे करतात. हा शब्द ‘हीन दर्जाचे’, ‘टाकाऊ’ अशा अर्थी वापरलेला दिसतो. म्हणून मधला मार्ग (मध्यमप्रतिपद्) हा ‘अनार्य’च्या विरुद्ध, म्हणजेच ‘आर्य’ अष्टांगिक मार्ग म्हणून सांगितला आहे.

 

बौद्ध तत्त्वज्ञानाच्या बाबतीत याहून अधिक खोलात जाणे सध्या इथे अप्रस्तुत होईल. संपूर्ण बौद्ध साहित्यात हा ‘आर्य’ शब्द असा जागोजागी आढळतो. भगवान बुद्धांच्या जीवनकार्याची थोरवी आणि त्यांचे अलौकिकत्व यांच्याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. तर मग त्यांनी स्वत:चे म्हणून असे हे जे तत्त्वज्ञान सांगितले, त्यात श्रेष्ठ तत्त्वांचे वर्णन करताना ‘आर्य’ शब्द का वापरला असेल बरे? साधनेच्या मार्गावर त्यांनी दोन टोकांच्या भूमिका त्याज्य म्हणून सांगितल्या. तिथेही त्यांनी ‘अनार्य’ शब्द का वापरला असेल बरे? भगवान बुद्धांचा हा काळ प्रचलित मान्यतेनुसार इसवी सनपूर्व ६व्या शतकातला. युरोपीय आणि पाश्चात्त्य संशोधकांच्या मतानुसार इसवी सनपूर्व १८व्या शतकातच परकीय अथवा आगंतुक आर्यवंशीय लोकांचे भारतात स्थलांतर / आक्रमण होऊन गेलेले होते. तर मग त्याच्या नंतरच्या काळात होऊन गेलेल्या लोकांना ‘आर्य’ शब्द परकीय वंशवाचक म्हणूनच माहित असायला हवा होता. त्या ऐवजी साक्षात भगवान बुद्ध तो शब्द श्रेष्ठ गुणांचा निदर्शक म्हणून का वापरतात? याचे साधे उत्तर इतकेच आहे, की हा शब्द इसवी सनाच्या १९व्या शतकापर्यंत एखाद्या विशिष्ट वंशाचा वाचक म्हणून कधी वापरला गेलाच नाही. शब्दार्थाची ही अफरातफर १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच पुढे झालेली दिसते. ती कोणी आणि का केली? ते अगदी उघड गुपित आहे! ते जाणण्याची पात्रता तथागत बुद्ध आपल्याला देवोत!

 
 

- वासुदेव बिडवे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.