आत्मनिर्भर भारतासाठी पतंजलिचे ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल

15 May 2020 11:18:36
Patanjali _1  H





फ्लिपकार्ट, अॅमेझॉनला टक्कर देणार स्वदेशी 'ऑर्डर मी'

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजलि आयुर्वेद स्वतःचा ई -कॉमर्स प्लॅटफॉर्म आणणार आहे. देशात तयार केलेली उत्पादने आणि स्वदेशी मालाची ऑनलाईन विक्री करणे, हा प्रमुख उद्देश असणार आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 'ऑर्डर मी', असे या प्लॅटफॉर्मचे नाव असणार आहे. पतंजलिची आयुर्वेदीक उत्पादने आणि अन्य अत्यावश्यक वस्तू ज्या दुकानांमध्ये विकल्या जातात, अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील.
 
 
 
फ्री होम डिलिव्हरी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी केल्यानंतर काही वेळातच वस्तूंची डिलिव्हरी केली जाणार आहे. त्यासाठी कुठलेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. पतंजलिचे १५००हून अधिक डॉक्टर यामाध्यमातून योगाभ्यास आणि इतर उपचारांची माहिती ऑनलाईन देणार आहेत. पुढील काही दिवसांत याची तयारी सुरू केली जाणार आहे.
 
 
व्होकल फॉर लोकल
पतंजलिचे सीईओ बाळकृष्ण यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहननांतर व्होकल फॉर लोकल होण्याची गरज आहे. त्या उद्देशानेच हा मंच तयार केला जाणार आहे. 'ऑर्डर मी' हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म केवळ स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीसाठीच असेल. किरकोळ दुकानदार, छोटे व्यापारी आणि उत्पादक व विक्रेते यांना एकत्र आणून व्यापक स्तरावर पुढे जाण्यासाठी योजना आणण्याची तयारी आम्ही करत आहोत.
 
 

एमएसएमईसाठी सुवर्णसंधी

आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटल्यानुसार, या मंचाद्वारे सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना एकत्रित आणण्यासाठी तसेच घरगुती वस्तूंच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. 'ऑरडर मी'चे अॅप अॅण्ड्रॉयड आणि आयओएस या दोन्ही स्टोरवर उपलब्ध असेल.
Powered By Sangraha 9.0