पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपले

    दिनांक  15-May-2020 10:54:07
|

Rain_1  H x W:


मुसळधार पावसादरम्यान वीजपडून दोघांचा मृत्यू


मुंबई : राज्यात शुक्रवारी अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. यात नाशिक जिल्ह्यातील पुरणगाव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये देखील वीज पडून एकाचा मृत्यू तर तीन कामगार जखमी झाले. आजच्या पावसाने पुणे, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, परभणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली.


गारांसह वादळी वारा सुटल्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावरील नागरिकांची तपासणी करण्यासाठी उभारलेले शेडचे पत्रे उडून गेले. शेडमधील लॅपटॉप आणि इतर साधन सामुग्री पावसात खराब झाल्याने मोठे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करताना याठिकाणी नागरिकांची तपासणी केली जात होती. नांदेडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू तर तीनजण जखमी झाले. हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी गावात ही घटना घडली. शेतात काम करत असताना वीज पडून २७ वर्षीय कपिल कदमचा मृत्यू झाला. दरम्यान, पुरणगाव येथेही वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.


परभणीच्या गंगाखेड, पालम तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी जमा केलेला कापूस आणि अन्य काही शेतमालाचे नुकसान झाले आहे. शिवाय आंबा, मोसंबी, चिकु आदी फळबागांना ही याचा मोठा फटका बसला. जनावरांचा चाराही मोठ्या प्रमामावर भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न ही उद्भवू शकतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.