संभ्रमावस्थेतील प्रशासन

15 May 2020 22:31:10

BMC_1  H x W: 0




कोरोनाचे संकटच असे आहे की, त्याचा सामना करताना भल्याभल्यांची मती कुंठीत होत आहे. अशावेळी सर्व परिस्थितीचे संयमाने हाताळण्याची गरज आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्धचे युद्ध अटीतटीचे चालले असतानाच त्याच्या सरसेनापतीला हटवून ‘कोरोना योद्ध्यां’मध्येच संभ्रमावस्था निर्माण केली. त्यामुळेच प्रशासनाला कोरोना चाचणीचे नियम वेळोवेळी बदलावे लागत आहेत. ज्यावेळी प्रवीणसिंह परदेशी पालिका आयुक्त होते, तेव्हा रुग्ण सापडण्याची संख्या ४०० ते ७०० यादरम्यान होती. मात्र, परदेशी यांना आयुक्त पदावरून हटविल्यानंतर तीच संख्या ७०० ते १००० च्या दरम्यान गेली आहे. म्हणजे यात नवीन आयुक्त इकबालसिंग चहल यांचे काही चुकते आहे का, असे म्हणण्याचा अजिबात प्रयास नाही. कारण, प्रवीणसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही लढाई आहे. त्यांनी केलेल्या व्यूहरचनेनुसार लढा चालला होता. युद्ध मध्यावर आले असताना दोन्ही बाजूचे मोहोरे जखमी होतात, काही धारातीर्थी पडतात. त्याप्रमाणे बरे होणारे रुग्ण हा कोरोनाचा पराभव असतो आणि मृत पावणारे रुग्ण हो कोरोनाचा विजय असतो, तर प्रशासनाचा पराभव असतो. पण त्याचा दोष सरसेनापतीला देऊन चालणार नाही. कोरोनाशी होणारा लढा हा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनातर्फे लढला जात असतो. कोरोना चाचणीबाबत ‘आयसीएमआर’ने काही निकष घालून दिले होते. त्याचे तंतोतंत पालन होणे गरजेचे होते. तशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सुरुवातीला जे चाचणीसाठी येतील त्यांचीच तपासणी होत होती. त्यानंतर घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. संशयितांना १४ दिवस ‘क्वारंटाईन’ करण्याचे धोरण ठरविण्यात आले. आता तर चाचणीच्या निकषातच बदल करण्यात येत आहेत. पाच आणि सात दिवसांत लक्षणे न दिसल्यास त्या संशयिताला सोडण्यात येणार आहे. अशा वारंवार बदलणार्‍या निकषांमुळे शत्रूचे (कोरोनाचे) फावणार आहे. तो आपली चाल पद्धतशीररीत्या करणार आहे.



‘कोरोना’च होणार सोबती!



चीनमधील वुहान येथे कोरोनाचा पहिला संसर्ग सुरू झाला आणि तेथेच प्रथम कोरोना संपुष्टात आला. मात्र, काही दिवसांनी तेथे पुन्हा कोरोना रुग्ण सापडले. गोव्यामध्ये कोरोना संपुष्टात आला होता. मात्र, तेथे पुन्हा सहा रुग्ण सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोना २०२२ नंतर संपुष्टात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार कोरोना आता कायमचा सांगाती होऊ शकतो. त्याच्या संगेच आता जगायला शिकले पाहिजे. म्हणजे कुटुंबातील जे सांगाती आहेत, त्यांना चार हात दूर ठेवून वावरायचे आहे आणि ज्याला चार हात दूर ठेवायचे त्याला सांगाती घेऊन वावरायचे आहे. याच्यावर लस शोधण्याबाबत संशोधन चालले आहे. मात्र, ती लस सापडेल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मुंबईत ’टोसिलिजुमॅबट’ इंजेक्शन कोरोनावर रामबाण उपाय ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने ४०रुग्णांना हे इंजेक्शन दिले आहे. त्यातील ३० रुग्ण बरे होऊन त्यांना घरी जाऊ दिले आहे. मात्र, त्याबाबत अजून ठामपणे सांगता येत नाही. दरम्यान, भारत कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत चीनला मागे टाकण्याची भीती आहे. कदाचित अधिक रुग्ण आढळल्यास एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चीनमधील एकूण कोरोनाग्रस्तांपेक्षाही अधिक होईल. तेव्हा, आपली, आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे आणि सर्व सरकारी नियमांचे पालन करण्याशिवाय गत्यंतर नाही, हेच खरे!


- अरविंद सुर्वे 
Powered By Sangraha 9.0