‘आत्मनिर्भर भारता’साठी भारतीय सैन्य कटिबद्ध- लष्करप्रमुख जनरल नरवणे

    दिनांक  15-May-2020 15:35:26   
|

army chief_1  H

आत्मनिर्भर भारतासाठी भारतीय सैन्य कटिबद्ध- लष्करप्रमुख जनरल नरवणे

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय लष्कर सदैव कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानास यशस्वी करण्यासाठी लष्कराने नेहमीच साथ दिली आहे. लष्कराच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त ऑर्डर्स या भारतीय कंपन्यांना देण्यात येतात. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणे सहजशक्य आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी केले. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी चीनसोबत झालेला वादंगाचे निरसन झाले असून परिस्थिती सर्वसामान्य असल्याचेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

 

'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडिज अँड अ‍ॅनालिसीस'तर्फे (एमपी - आयडीएसए) 'कोव्हिड अँड इंडियन आर्मी – रिस्पॉन्सेस अँड बियाँड' या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी विषयावर मार्गदर्शन केले. एकाचवेळी दोन्ही आघाड्यांवर युद्ध करण्याची क्षमता असल्याचा पुनरुच्चार यावेळी लष्करप्रमुखांनी केला.

 

आत्मनिर्भर भारत ही अतिशय महत्वाची संकल्पना असून ते लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय सैन्यदले सदैव कटीबद्ध आहेत. लष्कराचे उदाहरण सांगायचे तर लष्कराच्या विविध मागण्यापैकी सुमारे ७० ते ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मागण्या या आम्ही भारतीय कंपन्यांकडे नोंदवितो. मेक इन इंडियावर आम्ही सुरुवातीपासूनच भर देत आलेलो आहोत. त्यामुळे संरक्षणक्षेत्रासंबंधी सांगायचे तर या क्षेत्रात आत्मनिर्भऱ होणे सहजशक्य आहे. त्याचप्रमाणे यापुढे तंत्रज्ञान हस्तांतरण करणे आणि संबंधित उत्पादनाची निर्मिती भारतातच करणे यावर भऱ दिला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ए.के. २०३ या रायफल्सचे तंत्रज्ञान रशियाकडून प्राप्त झाले असून आता या रायफल्सची निर्मिती भारतात केली आहे. रशियाप्रमाणेच इस्रायलसह अन्य देशही भारतासबोत तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे संरक्षणक्षेत्रात भारतीय उत्पादकांना मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे जनरल नरवणे म्हणाले.

 

सैन्यदले अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्वाचे योगदान देत असल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, देशातील वातावरण सुरक्षित असेल तर देशात उद्योगधंदे आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर यशस्वी होते आणि त्यामध्ये सैन्यदले महत्वाची भूमिका बजाविता. उदाहरणादाखल सांगावयाचे तर भारतीय सैन्यदलांनी सर्जिकलस्ट्राईक आणि एअरस्ट्राईक करण्यापूर्वीच्या घटनांमुळे शेअर बाजार घसरला होता, मात्र सर्जिकलस्ट्राईक आणि एअरस्ट्राईक झाल्यानंतर शेअरबाजार वधारल्याचे चित्र दिसले होते. त्यामुळे आर्थिक विकास आणि सैन्यदले यांचा परस्परसंबंध आहे. त्याचप्रमाणे सैन्यदलांच्या कॅटॉन्मेंट देशात विविध ठिकाणी आहेत, तेथील भांडारांसाठीची खरेदी ही स्थानिक बाजारातून होते, अन्य व्यवहारही स्थानिक पातळीवर होतात, त्यातून मोठी उलाढाल होते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) प्रकल्पांमध्ये ८० टक्के कामगार हे स्थानिक असतात, त्यामुळे स्थानिक पातळीवर अन्य पुरक रोजगारही निर्माण निर्माण होतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये सैन्यदलांचे योगदान विसरून चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

भारतीय सैन्यदले बदलत्या परिस्थितीप्रमाणे नव्या युद्धतंत्रांचा अवलंब करीत असल्याचे सांगत जनरल नरवण म्हणाले की, बदलांचा वेग हा दररोज वाढतो आहे. त्यामुळे बदलांना वेळीच आत्मसात करणे गरजेचे असून तसे न केल्यास अपयशाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भारतीय सैन्यदलांची पुनर्रचना करण्यावर सध्या भर दिला जात आहे. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी थिएटर कमांड या संकल्पनेवर सध्या काम करण्यात येत असून. येत्या काही दिवसांमध्ये इंटीग्रेटेड एअर डिफेन्स कमांड आकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेज बॅटल ग्रुप या संकल्पनेचाही सध्या अभ्यास सुरू आहे. आपल्या तळावरून १२ ते ४८ तासांच्या कालावधीत आवश्यक त्या ठिकाणी पोहोचणे हे त्यांचे वैशिष्ट्य असणार आहे. त्याचप्रमाणे बदलते तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचाही वापर सैन्यदलांमध्ये वाढत असला तरी त्याचा परिणाम मनुष्यबळावर फारसा होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

कोरोना संकटाचा सामना करण्यास सैन्यदले सज्ज

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लष्करासह नौदल आणि वायुदलही सज्ज आहे, असे जनरल. नरवणे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीवर सैन्याचे पहिल्या दिवसापासून लक्ष आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास लष्कर आणि सैन्यदले सज्ज आहेत. सैन्यदलांना संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यास आमचे प्राधान्य आहे, कारण ते सुरक्षित राहिले तरच देशाचे संरक्षण ते पूर्ण क्षमतेने करू शकतीस. विशेष म्हणजे सैन्याचे ऑपरेशनल युनीट्स हे अद्याप संक्रमणापासून दूर आहेत. त्याचप्रमाणे सैन्य मुख्यालयासह विविध भागातील सैन्य छावण्यामध्येही आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. कोव्हिड विशेष इस्पितळांची निर्मिती करणे, आयसोलेशन, क्वारंटाईन कक्षांची निर्मिती आणि स्थानिक प्रशासनास सर्व प्रकारची मदत करणे यासाठी सैन्यदले नेहमी सज्ज आहेत. मदतकार्ये करण्यातही सैन्यदले पूर्ण क्षमतेने कार्यरत असून अनेकवेळा लष्करापेक्षा नौदल आणि वायुदलाने आव्हानात्मक कामगिरी यशस्वी केली आहे. अर्थात, सैन्यदलांच्या जबाबदारीचे स्वरूप पाहता प्रत्येकवेळी सामाजिक अंतराचे पालन करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे सध्या देशात अनेक निर्बंध असले तरिही सैन्याचे दैनंदिन व्यवहार, प्रशिक्षण हे कॅन्टान्मेंट भागातच होत असल्याने त्यावर परिणाम झाला नसल्याचे जनरल नरवणे यांनी नमूद केले. अर्थात परिस्थिती पाहता सैन्याचा बजेटवर त्याचा परिणाम होणे अपरिहार्य आहे. त्याविषयी आताच भाष्य करणे कठीण असले तरी साधारणपणे २० टक्क्यांच्या आसपास कपात होऊ शकते. मात्र, परिणाम वेतन आणि भत्त्यांवर होणार नाही. अन्य मार्गांनी म्हणजे सैन्य तुकड्यांच्या हालचालीमध्ये काही काळ कपात करून किंवा त्यांचा कालावधी वाढवून खर्चात कपात साध्य केली जाईल. दरवर्षी सुमारे २०० ते ३०० अशा हालचाली होत असतात.

'टूर ऑफ ड्यूटी' ठरणार अभिनव संकल्पना

देशातील सर्वसामान्य नागरिकांना लष्करी सेवेचे मोठे आकर्षण असते. मात्र, प्रत्येकालाच लष्करी सेवेत येणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी 'टूर ऑफ ड्यूटी' ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. याद्वारे तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना लष्करी सेवा बजाविण्याची संधी दिली जाणार आहे. लष्करी सेवेमुळे शिस्त आणि आणि वक्तशिरपणाची सवय त्यांना लागेल आणि तीन वर्षे लष्करी सेवेचा अनुभव हा तरुणांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविणारा असेल. लष्करी सेवेनंतर कोणत्याही क्षेत्रात जाण्याची मुभा असेल. त्यामुळे ज्याही क्षेत्रात ते जातील, तेथे त्यांना लष्करी सेवेचा अनुभव हा महत्वाचा ठरेल, असे जनरल नरवणे यांनी सांगितले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०० अधिकारी आणि १००० जवानांची भर्ती केली जाऊ शकते, लवकरच त्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.