मुंबई महापालिका मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव

    दिनांक  15-May-2020 21:50:17
|

BMC_1  H x W: 0


मुंबई
: मुंबई महापालिका मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून मागील काही दिवसात तब्बल आठ ते दहा जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मुख्यालयातील वाढत्या रुग्णांमुळे मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


महापालिका कार्यालयांमध्ये शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. मुख्यालय आणि विभाग कार्यालयात सध्या सुमारे ७० ते ७५ टक्के कर्मचारी उपस्थित राहात आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण, वसई, विरार या या दूरच्या भागातूनही कर्मचारी उपस्थित राहत आहेत. मुंबईच्या तसेच मुंबईबाहेर रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये काही कोरोनाचे संशयित तसेच लक्षणे नसलेले रुग्ण असल्याने मुख्यालयात त्याची अनेकांना लागण झाली आहे.


पालिका मुख्यालयातील आपत्कालीन विभागात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर मुख्यालयातील सुरक्षा विभागातील तीन सुरक्षा रक्षकांचे चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. गुरुवारी आणखी दोन सुरक्षा रक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना नायर रुग्णालयात, तर एकाला कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मागील काही दिवसात मालमत्ता विभागात दोन, विकास नियोजनमध्ये एक, आपत्कालीन व्यवस्थापन विभागात दोन, सुरक्षा विभागात तीन, तर आयुक्त कार्यालयातील विश्लेषण अधिकारी एक असे एकूण आठ ते दहा कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दि म्युनिसिपल इंजिनिअर युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिली.
 
स्थायी समितीची बैठक पुढे ढकलली

पालिका मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शुक्रवारी होणारी स्थायी समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली. बैठक पुढे ढकलण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.